Friday 14 July 2023

तुम जैसी औरतें सहनशीलता की मूरत होती है

पुन्हा एक लोकल मधील २० वर्षीय मुलीवरील बलात्काराची बातमी वाचली. गेल्या काही दिवसांत अशा बातम्या वाढल्या आहेत. क्रुरतेची सिमा गाठली जातेय रोज. या सगळ्याकडे डोळसपणे पहायला शिकवणारी दिल्लीची निर्भया केस ही माझ्या आयुष्यातली पहीलीच. किती अमानवी वागतात माणसं अस वाटायच तेव्हा. आणि या पेक्षा भयंकर अजुन काय वागेल कोणी? असं वाटल्यावर ११ वर्षांत रोज ’याही पेक्षा अजुन किती भयंकर वागणुक मिळणार आहे एखाद्या मुलीला’ असं वाटणार्‍या घटनांची साखळीच तयार झाली. कोणाला चाकुने भोसकुन मारण्या पलीकडे जाऊन आपणच प्रेम करत असलेल्या व्यक्तीचे तुकडे करण्यापलीकडे अजुन काय बघायच राहिलंय असं वाटलं तेव्हा पुन्हा एकदा माणसं किती क्रुर असतात हे दाखवणारी मुंबईचीच मिरा रोडची घटना समोर आली. खरंतर अशा खुप घटना वेगवेगळ्या शहरांत घडल्या आहेत. त्यातले हे मोजकेच उदाहरण. पण आता अशा घटना कानावर आल्या की एक मुलगी म्हणुन, स्त्री म्हणुन मन सुन्न व्हायला होत. डोळे भरुन यायला लागतात. कोणावर प्रेम केल्याची, जीव लावण्याची ही अशी शिक्षा मिळावी? अचानक ही क्रुरतेची परिसिमा गाठण्याची वेळ कशी येते? आजवर अनेकांनी एकतर्फी प्रेम केलेलं असतांना त्यात अशी अधिकाराची ’माझी नाही तर कोणाची नाही’ ही हुकुमशाहीची भावना कधी पासुन आपले मुळं रुजवायला लागली आहे?
आजकालची बदलती जिवन शैली पाहीली तर सोशल मिडीया, त्यावर दिसणारी फसवी प्रेमाची प्रतिमा, चित्रपटातली नायकाची रावडी भुमिका पाहणार्‍या मुली वरवरच्या सौंदर्याला दिखाव्याला भाळायला लागल्या आहेत. प्रियकरा बद्दलची त्यांची अपेक्षा एकाच वेळी दोन विरुध्द टोकांची आहे. तो हळवा, प्रेमळ तर हवा आहेच पण त्याच बरोबर त्याने खंबीर, थोडसं स्टायलीश, रावडी कबीर सिंग सुध्दा असायला हवं असतं. पण वरवर खुप सोज्ज्वळ वाटणारी माणसं आतून बर्‍याचदा फसवीच निघतात. मुलींना हे कळायला फार उशीर लागतो. कुठलीही गोष्ट मिळे पर्यंतच आपण ती मिळवण्याची धडपड करत असतो. एकदा की ती वस्तु आपल्या ताब्यात आली की तीचं आकर्षण कमी व्हायला लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. इथे पुरुषांसाठी ही वस्तु एखादी मुलगी किंवा स्त्रीया असतात. एकदा आपली झाली की पुर्ण मक्तेदारी आपलीच, या आविर्भावात ते वागायला लागतात आणि इथेच मुलींची प्रेमाची नशा फिकी पडायला लागत असावी. 'हाच आहे का तो चेहरा ज्याच्या आपण इतके प्रेमात होतो' असं वाटुन त्या बिथरतात. पण समंजसपणा, पडती बाजु घ्यायला तर समाजाने शिकवलेलं असतंच. त्याचा वापर इथे केला जोतो. त्याचं ऐकलं, त्याच्य मनाने वागलं तर सुधरेल, आपण प्रेमाने सुधरवु सगळं, अशा भावनिक गुंत्यात एकदा मुली अडकल्या की तिथुन परतीचा मार्ग खडतरच असतो. कारण जे जीव लावतात ते जीव घेत नाही कधीच हे कळायला उशीरच होतो.
मुळातच प्रेम आकर्षण काहीही असलं तरी नात्यात एका शरिरसंबंधानंतर गोष्टी बदलायला लागतात. पुरुषांकडून वागण्यात कोरडेपणा, निष्ठुरता यायला लागलेली असते. मग बायका चुकत नाहीत का? कायम पुरुषच चुकीचे का? तर असं बिलकुलच नाही. आम्हीही चुकतो. नेहेमी एकच बाजु चुकीची नसते किंवा बरोबरही कुणाचचं नसतं. पण अजुनही काही अपवाद सोडले तर प्रियकाराचे तुकडे केले, चाकुने ’सपासप’ वार केले, बलात्कार करुन मरालया रस्त्यात सोडले, व्हिडीओ बनवुन पुढे कित्येक महिने एखाद्या पुरुषावर अत्याचार केला अशा किती घटना ऐकतो आपण? बायकांचा स्वभावच मुळात सोशिक, सहनशील असतो. त्यांना त्रास झाला, राग आला तर त्या मनस्ताप करून घेतील, वेळ पडली तर देतीलही. अगदीच सहन होण्यापलीकडे गेल्या गोष्टी तर स्वत:च जीवही देतील. पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या जीवावरच उठणार नाहीत. त्यांनी जीव लावला की त्यांच्यातली प्रियसी संपुन ती जागा ममत्वाची भावना घ्यायला लागते. याचाच गैरफायदा पुरूषांकडून घेतला जातो. आपण कसेही वागलो तरी आपली बायको, प्रियसी आपल्याला काहीही करणार नाही ही भावना बळावली की अधिकारवानीला सुरुवात व्हायला लागते. देवदास चित्रपटात देवदास, चंद्रमुखी नावाच्या वेश्येला ‘‘तुम जैसी औरतें सहनशीलता की मूरत होती है.’’ हे वाक्य याच काळासाठी म्हंटलेलं असावं का?
हे सर्व वाचत असतांना अनेकांना वाटेल की आपण असे नाही, आपण असं वागत नाही अशी जाणिव होऊन कितीतरी पुरुष सुटकेचा सुसकारा सोडत असतील. पण मरण फक्त देहाचं असतं का? जेव्हा पुरुषांकडुन नात्यात कोरडेपणा यायला लागतो तेव्हा बायकांच मनातुन खच्चीकरण व्हायला सुरुवात झालेली असते. नात्यातुन फक्त प्रेमाची अपेक्षा करत असताना ते ही नाकारलं गेलं की रोज कणाकणाने मरतात बायका. अशावेळी तुम्ही पुरुष म्हणुन जिंकलेले असतात. पण त्याचवेळी तुम्ही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, याचीही जाणिव यतकिंचीत तुम्हाला नसावी हीच खंत आहे.

Monday 6 March 2023

गवळी पिंपळी: मुलींना शिक्षणाचा मूलभूत हक्क देणारे गाव

'ताई, आमच्या गावचा जावई व्हायला मुलाला भाग्य काढावं लागतंय. असंच कोणालाही मुलगी देत नाही आम्ही आमची...' माझ्या समोर चहाचा कप धरत उभ्या असलेल्या मावशी ठसक्यात बोलल्या. अंगात साधी साडी, वय चाळिशीच्या जवळपास असेल. पुरुष मंडळी समोरच असल्याने डोक्यावरचा पदर ढळू न देण्याची गावाकडची पद्धत सांभाळत हळुवार पण आत्मविश्वासाने बोलत आमचा पाहुणचार करणारी ती बाई पाहून या असं का बोलताय म्हणून मी प्रश्नार्थक नजरेने गोंधळून त्यांच्याकडे बघितलं. त्यांना ते समजल्या सारखं त्यांनीच पुढे बोलणं सुरु ठेवलं... 'अहो, आमच्या गावातली लग्नाची मुलगी ही किमान पोस्ट ग्रॅज्युएशन तरी शिकतेच. त्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यात आमच्या गावची मुलगी सून किंवा बायको म्हणून घरात यावी असं प्रत्येकाला वाटत. तालुक्याच्या शाळेचे मास्तर लोकंसुद्धा आमच्या गावच्या पोरींना शिकवायला उत्सुक असतात. आहेतच हुशार आमच्याकडच्या सगळ्या पोरी... एक वेळ आमचे पोरं शिकत नाहीत बघा, पण पोरी नाव काढता आमच्या शिक्षणात..त्यामुळे आम्हाला हुंडा सुध्दा जमवावा लागत नाही' असं बरच काही सांगत त्या पुढे कितीतरी वेळ भरभरून बोलत राहिल्या..
काही दिवसांपूर्वी जवळच्या मित्राच्या लग्नासाठी सोनपेठ तालुक्यातल्या गवळी पिंपळी गावात जाणं झालं. तेव्हाचा हा प्रकार. तालुक्यापासून ३-४ किलोमिटर आत जावं लागतं, गावात जायला दळणवळणाची सोय तर सोडाच पण रस्ताही नाही. फारतर २-२५० कुटुंबांची वस्ती आणि १२००-१३०० लोकसंख्या असलेलं हे गाव. त्यामुळे जिथे प्रत्येक कामासाठी या लोकांना सोनपेठ किंवा परभणी जवळ करावं लागतं त्या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी एवढा पुढाकार खरंच घेतला जात असेल का असं कुतुहल या मावशींच बोलणं ऐकुन कोणालाही वाटलं असतं. पण दिवसभरात गावातल्या इतर मंडळींशी बोलतांना समजलं की आपल्या मुलींनी खुप शिकावं म्हणून इथले पालक आग्रही आहेत. मी स्वत: अशाच छोट्या गावातून आलेली असल्याने आणि मुलींच्या शिक्षणाविषयी अशा अनेक छोट्या - छोट्या वाड्या वस्त्यांतले लोक किती उदासीन असतात हे खूप वेळा अनुभवून माहिती असल्याने मुलींना किमान शिक्षण घेण्याची मोकळीक दिलेली बघणं म्हणजे खरंच कौतुकास्पदच आहे. आजही माझ्याच बरोबरीच्या अभ्यासात हुशार असलेल्या कितीतरी मुलींचे लग्न त्यांची मर्जी विचारात न घेताच लावून दिले जातात. त्यातही मराठवाड्यात जिथे अजूनही बालविवाहासारख्या प्रथांबद्दल जनजागृती करण्याची कसरत प्रशासनाला घ्यावी लागते तिथे मुलींना शिक्षणासारख्या मुलभुत हक्काबद्दल एवढं स्वातंत्र्य मिळणं आजच्या जमान्यातही कौतुकाचंच आहे.
या मुली पुढे नोकरी करतात की नाही किंवा या शिक्षणाने त्यांच्यात स्वत:च्या हक्कांसाथी बोलण्याची हिंमत येते की नाही हा पुढचा भाग झाला. कारण आजही महिला दिन साजरा करतांना आपल्याला महिलांच्या प्राथमिक हक्कांविषयी बोलावं लागत असेल तर त्यानंतर येणार्‍या स्वातंत्र्याचा पल्ला गाठायला खूप काळ लोटावा लागणार आहे. तोवर मात्र आपल्याला महिला सबलीकरणात पुढाकार घेणार्‍या गवळी पिंपळी सारख्या अजून गावांची जास्त गरज आहे.

Tuesday 8 March 2022

'तो इन मर्दो को किस बात का गुरुर?’


‘सर्व स्तरांतील महिलांचे प्रश्न सारखेच असतात, असं म्हणून सगळ्याच महिलांना तू एकाच पारड्यात कसं बसवते?’ हा प्रश्न काही वर्षांपूर्वी मला माझ्या ‘व्हायवा’च्या वेळी विचारला गेला होता. आज अडीच-तीन वर्षं उलटून गेल्यावरही या प्रश्नाचं वेगळं काही उत्तर मला सापडत नाही. आर्थिक परिस्थितीवरून किंवा शैक्षणिक पात्रतेवरून महिलांचं होणारं दमन वेगळं आहे, किंवा ती शिकली म्हणून पूर्ण स्वतंत्र झाली, असं अजून तरी कुठे बघायला मिळालेलं नाही.
दरवर्षी ‘जागतिक महिला दिन’ जवळ आल्यावर महिलांचा उदोउदो करण्यासाठी सज्ज झालेल्या अनेकांना पाहून मला पुन्हा हा प्रश्न आठवतो आणि जाणवते ती पुरुषी विचारांनी, पुरुषप्रधान संस्कृतीने कुठे न कुठे फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी बाईची केलेली गळचेपी. अशी घुसमट, गळचेपी अनादी काळापासून थोड्याफार फरकानं सारखीच असल्याचे दिसते. यासाठी ‘महाभारता’तील द्रौपदीचं उदाहरण पाहता येईल. लग्नानंतर पाच पुरुषांचा पती म्हणून तिला स्वीकार करायला लावताना जसा तिच्या भावनांचा विचार केला गेला नाही, तसाच सारीपाटात तिची बाजी लावतानाही केला गेला नाही. पुढे झालेले वस्त्रहरणसुद्धा स्त्री उपभोगाची आणि विजय मिळवण्याची ‘वस्तू’ समजूनच झाले.  
आज काळाबरोबर चांगली नोकरी, उत्तम पगार, घरची श्रीमंती हे सगळं अनेकींना मिळालं आहे. पण नोकरी करायला मिळाली, घरी आर्थिक सुबत्ता आली, म्हणजे आपण स्वतंत्र झालो, हा विचार किती केविलवाणा आहे! तसं पाहता, स्वत:च्या नोकरीतली बढती घ्यायची की नाही, किंवा नव्या नोकरीतून आलेली संधी स्वीकारायची की नाही, हे किती महिला घरातल्या पुरुषांना न विचारता ठरवू शकतात? किंवा अविवाहित, घटस्फोटीत, एकट्या राहणाऱ्या किती महिलांचा समाजाकडून सहज स्वीकार केला जातो, हे वेगळ सांगायला नको!
पुरुषाशिवाय महिलांचं वेगळं अस्तित्व आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीकडून कायम नाकारलं गेलं आहे. पण मुळातच बारकाईनं अभ्यास केला तर लक्षात येतं की, फक्त काही सामाजिक आणि शारीरिक गरजेपोटी बाईलाही पुरुष आयुष्यात हवे असतात. मात्र हा कमीपणा मान्य नसल्यानं पुरुषांकडून तिला निसर्गत:च मिळालेलं श्रेष्ठत्व बळाचा वापर करून दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो.
याचं अजून एक उदाहरण म्हणजे अगदी औरंगाबादसारख्या स्मार्ट सिटी बनू पाहणाऱ्या शहरातही माझ्यासारख्या एकट्या मुलीला राहण्यासाठी घर मिळणं दुरापास्त होतं. हा अर्थात केवळ माझा एकटीचाच अनुभव नसून माझ्यासारख्या एकटीनं नोकरीसाठी मोठ्या शहरात राहणाऱ्या अनेकींचा अनुभव आहे. ‘एकटी मुलगी राहणार’ या विचारानेच अनेक पुरुष आपले कैवारी बनतात. शिवाय एकटी मुलगी म्हणून बदलणाऱ्या सूचक, बोचऱ्या नजरांनाही कित्येक वेळा सामोरं जावं लागतं. ‘ती एकटी काही करू शकत नाही. कमावते, नोकरी करते म्हणून काय झालं, आमच्या मदतीची तिला गरज पडेलच’, हे विचार तर न संपणारे.
पण लॉकडाऊनच्या काळात जेव्हा पुरुष घरात बसून होते, तेव्हा अनेक ठिकाणी महिलांनी घराचा आर्थिक भार कणखरपणे सांभाळला. या काळात सर्वाधिक अत्याचार महिलांवरच झाल्याचे अनेक सर्वेक्षणांतून समोर येऊनही कुठेच न डगमगता खंबीरपणे उभ्या राहिलेल्या या स्त्री जातीला खरंच पुरुषी आधाराची किती गरज असणार आहे!
घरातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. उच्चशिक्षित, लाखोंनी पैसा कमावणाऱ्या महिलांना ‘बाहेरचं जग वाईट आहे, त्याची तुला कल्पना नाही’, हे वाक्य प्रेमाचा टॅग लावून का होईना ऐकवलं गेलं नाही, अशा महिला बोटावर मोजण्याइतक्याच सापडतील. हेच सगळं कमी शिकलेल्या, नोकरी न करता घर सांभाळणाऱ्या महिलांच्या बाबतीतही होतं. मग कोणत्या वर्गातली महिला स्वातंत्र्य उपभोगताहेत असं म्हणायचं?
मुळातच ही जी मोडकीतोडकी मोकळीक मिळाली, त्याला स्वातंत्र्य तरी म्हणता येईल का? तिने सोशिक, समंजस असावं, प्रेमात आणि संसारात जे त्याग करावे लागतील, ते तिनेच करायचे असतात, हेच संस्कार कायम माझ्यासारख्या अनेकींवर पूर्वीपासून होत आले. त्यामुळे मनाला पटत नसतानाही तोंडातून ‘ब्र’सुद्धा न काढता महिला सहज पडती बाजू घेतात. हे औदार्य पुरुषांमध्ये मात्र फारच कमी दिसतं. उलट स्वत:च्या पराभवाचं खापरही अनेक पुरुष घरातील बाईच्या माथी टाकून मोकळे झालेले दिसतात.
दुसरा मुद्दा अत्यंत संवेदनशील आणि क्वचित बोलला जाणारा आहे. खरं तर स्त्रिया जात्याच स्वभावानं फार हळव्या असतात. त्यामुळे जे बाहेरच्या जगात मिळत नाही, ते प्रेम, स्वातंत्र्य, आदर त्या आपल्या जोडीदारात शोधतात. काही अंशी त्यांना ते मिळत असलं तरी चार भिंतीतही जोडीदारासोबत कितपत मोकळ व्हायचं यालाही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. किमान भारतात तरी! त्यामुळेच अजूनही स्वत:च्या लैंगिक भावनांबद्दल बोलण्याचं धारिष्ट्य स्त्रिया करत नाहीत. आपण खूष नाही, हे कळालं की, जोडीदार रागवेल किंवा चांगल्या घरातल्या बायका ‘तसल्या’ भावना बोलून दाखवत नाहीत वगैरे वगैरे. आणि जर बोलून दाखवलंच तरी तिच्या इच्छेचा, अपेक्षेचा किती विचार केला जातो?
आपल्याला जसं जगावंसं वाटत, तसं जमत नसलं तरी, ‘मला असं वाटतं..’, हे सांगणं आजही महिलांना जमत नाही. स्वत:च्या भावना सांगतानाही घाबरणाऱ्या महिला मग समोरच्याचा अंदाज घेत; अंधारात चाचपडत जगत राहतात. मात्र ज्या अशा विषयाला तोंड फोडून खऱ्या स्त्री-मुक्तीची विचारधारा पेरण्याचा प्रयत्न करत, स्वत:च्या मनानं जगण्याचं धारिष्ट्य दाखवतात, त्यांना ही पुरुषी व्यवस्था ‘समाजविघातक’ ठरवून मोकळी होते. याची अनेक उदाहरणं बघायला मिळतात.
‘शक्ती, संपत्ती और सदबुद्धी ये तिनो औरतें हैं, तो इन मर्दो को किस बात का गुरुर?’ अशी स्त्रियांची महती सांगणारा ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमामधला आलिया भटचा एक संवाद सध्या सगळीकडे चर्चेत आहे. खरं तर स्त्री-स्वातंत्र्याचा सगळा मुद्दाच ‘मर्द का गुरुर’, ‘पुरुषी अहंकार’ यावर टिकून आहे. जिथं आपल्या अहंकाराला धक्का बसणार नाही, तेवढंच स्वातंत्र्य या पुरुषसत्ताक समाजानं महिलांना देऊ केलं आहे. पुरुषांमध्ये महिलांना काबुत ठेवण्याची लालसा, हाव तयार होते, ती या अहंकारामुळेच.
गंमत म्हणजे, मी माझ्या बायकोला, मुलीला, प्रेयसीला हवं तसं वागण्याची मोकळीक दिली आहे, हे सांगतानाही पुरुष आपला अहंकार कुरवाळत असतो! आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीकडून जोवर हा अहंकार गोंजारला जातो, तोवरच तीला त्याच्याकडून स्वातंत्र्य मिळतं. एकदा तो दुखावला गेला की, त्याची जागा ‘पुरुषी विकृती’ घ्यायला लागते. या विकृतीचे परिणाम आपण आपल्या आजूबाजूला रोज बघतो. या सगळ्यावर समाजमाध्यमांचाही खूप पगडा असलेला दिसतो.
वर्षातून एकदा ‘जागतिक महिला दिनी’ तिच्या कामाचं, कर्तृत्वाचं, बाईपणाचं कोडकौतुक करून तीला मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव करून देणं, याला ‘पुरुषी अहंकार’ सुखावण्याचाच भाग म्हटला तर खोटं ठरणार नाही. मात्र यात वाईट काही असेल तर ते हे की, महिलांना हे आभासी स्वातंत्र्यच खरं वाटून याची भुरळ पडते. या आभासी पुढारलेपणाच्या पांघरुणाखाली मिळणाऱ्या स्वातंत्र्यात अजून किती काळ त्यांना आपलं अस्तित्व शोधावं लागणार आहे, कोण जाणे!

Monday 8 March 2021

"बये, महामाये, आता तरी ओळख स्वत:ला.."


जागतिक महिलादिना निमित्त दै.देशोन्नतीच्या टीमने वेगळी, हटके स्टोरी करायची ठरवली त्यावेळी तळागाळातल्या स्त्रीयांना आणि त्यांच्या कामाला आपण वाचकांसमोर आणवं अस एकमताने ठरलं. कारण नेहेमीच्या त्याच त्या स्टोरी सगळेच कव्हर करणार, महिलांविषयीचे एका दिवसाचे उमाळे सगळ्यांनाच येणार हे अलिखित नियम तयार झालेले आहेत. 
वरवर बघता हि संकल्पना फार साधी आणि सोप्पी वाटली. कारण शहरात अनेक स्त्रीया या छोटे - मोठे व्यवसाय करतांना दिसतात. कोणी आर्थिक अडचणींमुळे करतं तर कोणी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी काम करत, कोणाला स्वावलंबी व्हायचं असतं.. त्यामुळे अशा महिला शोधणं तस काही अवघड काम नव्हत. भाजी विक्रेता, घरकाम करणाऱ्या स्त्रीया, सफाई कामगार, बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या मजुर स्त्रीया अशा अनेक महिला आपल्या आजुबाजुला बघायला मिळतात. त्यामुळे या सगळ्यांचे अनुभव छापून आणायचं हे तेवढं काही अवघड काम वाटलं नाही (किमान मला तरी). पण जसजसं मी या सगळ्या महिलांना भेटायला लागले, त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करू लागले तस मला हा सगळा गुंता असल्याचं जाणवायला लागलं. असा गुंता जो सहज सुटणार नाही आणि मग लक्षात आलं की जिथं मी आणि माझ्या सारखे अनेक जण जागतिक महिला दिनाच्या उत्साहात वेगवेगळे कार्यक्रम आखत आहे, या दिवशी जिथं तिथं महिलांच्या कर्तबगारीची उदोउदो केला जाणार आहे; तिथं या अगदीच तळागाळातल्या महिलांना महिला दिन अस काही असतं हेच माहीत नाही... खरतर या काळात माहिती संकलन करतांना अनेक महिला भेटल्या. त्यात कोणी पहाटे सायकलवर पेपर विक्रीचा व्यवसाय करते, तर कोणी छोटी टपरी वजा हॉटेल चालवुन घरच्यांच पोट भरते. कोणी घरोघरी जाऊन लोकांचे धुणे-भांडे करून नवऱ्याला हातभार लावतांना दिसल, एक ना अनेक वेगवेगळी कामं या स्त्रिया करत होत्या.. पण कामं वेगळी असली तरी एक धागा यात समान होता.. एकच अशी गोष्ट जी या सगळ्यांना एकत्र जोडते. ती म्हणजे या सगळ्या महिला स्वत: कमावत असून, स्वतःच्या पायावर उभ्या असूनही त्या प्रत्येकीवर एक बंधन होतं. कुठे नवऱ्याच, कुठे मुलाच, त्यांच्या आयुष्यातल्या कोणत्या ना कोणत्या पुरूषाच्या बंधनाखाली त्या जगत आहेत याचा अनुभव आला आणि त्यामुळे आपण करत असलेल्या कामाविषयी सांगायची किंवा त्या विषयी बोलायची, छायाचित्र देण्याची यातल्या एकीनेही हिंम्मत केली नाही. प्रत्येक वेळी "यांना (नवऱ्याला) विचारून सांगते", "मुलाला विचारते मग देते माहिती", "नको, घरच्या माणसांना आवडणार नाही" अशीच उत्तरं मिळायला लागली. म्हणजे जर घरातला पुरुष मग तो नवरा असेल वा मुलगा त्याने जर संमती दिली तरच त्या माझ्याशी बोलायला तयार होत्या! हे का? तर ती "बाई" नाही का...! ती "बाईची जात" आहे. तिला स्वतःच चांगलं वाईट कुठं कळत, तिच्यासाठी काय योग्य आहे हे ठरवायचा बगडा घरातल्या पुरुषांनी नसतो का उचललेला..? मग तीने कोणाशी बोलावं, कोणाला काय सांगाव हे पण 'तो'च ठरवणार; भले मग ती स्वतः का नोकरीधंदा करत असेना.. सगळीकडेच हे दृश्य दिसल्यावर वाटलं की महिला दिनासाठी मुलाखत देण्याचंही स्वातंत्र्य ज्या बाईला नाही, तिने कोणाशी बोलावं हेही जिथे अजून पुरुषच ठरवत आहेत, तिथे कोणता महिला दिन या बायकांना माहित असायचा? त्यांच्यासाठी कसला आलाय महिला दिवस.. 8 मार्च ही कॅलेंडरवरची साधी तारीखच तर आहे अशा अनेकांसाठी आज सुद्धा.. आणि अर्थात आज छापून आलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या त्यांना त्यांच्या नवऱ्याने आणि मुलाने माझ्याशी बोलायची अनुमती दिली म्हणूनच मला मिळाल्या आहेत हे वेगळं काही सांगायला नको.. या सगळ्यात झालं एवढंच की ज्या स्त्रीयांच काम आज सगळ्यांपुढे यायची गरज होती.. ज्यांचा सन्मान होऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज होती त्या आजही अंधारातच राहिल्या... हे का घडलं? इथे पुरुषप्रधान संस्कृती आडवी येते यात वाद नाहीच... पण याला खतपाणी घालणाऱ्या पण स्त्रियाच नाही का?? वडील, नवरा, मुलगा हे म्हणतील तस वागावं हे आजसुद्धा किती तरी महिला आपल्या मुलीला शिकवतात तेव्हाच पुरुषसत्तेची मुळं जास्त घट्ट रोवली जातात..  ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे आपण नेमका कोणत्या महिला दिनाचा, महिला सबलिकरणाचा उदोउदो आजच्या दिवशी करणार आहोत हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे.. पण तरी आज सगळ्याच महिलांसाठी या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कवी किरण येलेंच्या कवितेतल्या या ओळी इथे लिहाव्याशा वाटल्या....
''बये, 
महामाये, 
आता तरी ओळख स्वत:ला.
स्वत:च्याच अवगुंठणातुन 
बाहेर काढ स्वत:ला.
त्यांनी कालवलेल्या मातीगोळ्यात 
वर्षानुवर्षे स्वतःची मूर्त घडवत राहिलीस
स्वतःच्या शिल्पात स्वतःलाच चिणत राहिलीस
घुसमटलीस
तरीही तुझ्याच नावानं चाललेल्या 
षोडषोपचारात सुखावलीस
बये, महामाये, आता तरी ओळख स्वतःला....." 

Sunday 17 May 2020

टिक-टॉक, पबजी व्हाया बेरोजगारी

 
लॉकडाऊनच्या निमित्ताने मागे काही दिवस वृत्तपत्रांची छपाई बंद ठेवण्यात आली आणि थोडे दिवस का होईना घरी निवांत राहण्याचा योग आला. मात्र हा घरात बसून राहण्याचा काळा तसा फारसा सुंदर, छान असा काही नव्हता... जवळ होती नव्हती ती पुस्तक वाचून झाली होती. थोडेफार बाकीचे कलाकुसरीचे छंद पण जोपासून झाले होते. पण काही दिवसातच वातावरणातल्या बदलाने, घामट कुंद हवेने अधिकच मरगळ यायला लागली. त्यामुळे एरवी फारसं कॉलनीमध्ये कोणाशी संबंधच न येणारी मी विरंगुळा म्हणून आजूबाजूच्या काही माझ्या सारख्या चोविशी-पंचवीशीतल्या आणि काही नुकत्याच पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुण- तरुणींच्या जवळून संपर्कात आले. या काळात आत्ताच्या या माझ्यापेक्षा जास्त फास्ट अँड फॉरवर्ड पिढीचे विचार, त्यांची जीवनशैली जवळून अनुभवली. त्यात एरवी फक्त ऐकूनच माहीत असणाऱ्या टिक-टॉक, पबजी सारख्या अँप्सच अँडिक्शन या पिढीत केवढं खोलवर भिनलेलं आहे, हे पाहून हैराण झाले! कुठल्याशा जागेत उतरून लोकांना फक्त मारत सुटायचं आणि आपल्याला मारायला कोणी आलं तर मदतीसाठी खरोखरीच समोरच्याची मदत मागत ओरडायच! केवढा थिल्लर खेळ आहे हा.. मात्र हे सगळेच तरुण काही अशा थिल्लर अँप्सच्या आहारी गेलेले नाहीत हे बघून थोडं बरही वाटलं. 
मग असा कोणत्याच अँडिक्शनमध्ये नसणारा साधारण एकविशीतला "तो" एक एवढ्यात फारच गप्प आणि गंभीर दिसायला लागला तेव्हा त्याला नेमकं झालं तरी काय, हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यानेच माझ्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला! तेव्हा तरुण पिढीच भविष्य किती अंधारात गेलं आहे, याची जाणीव जास्त प्रखरतेने झाली.
मला वाटलं होतं त्यापेक्षा फार गंभीर आणि गहन प्रश्न होते त्याचे.. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच त्यामुळे आता डिग्री घेऊन लगेच नोकरीला लागायचं आणि घराचा भार उचलायचा, मग आपल्या पायावर उभं राहिलं की पुढचं शिक्षण घ्यायचं. अशी स्वप्न रंगवत असतानाच आता कोरोनामुळे आधीच आर्थिक मंदीचे सावट येऊन ठेपल्याने अनेकांच्या नोकर्‍यांवर गदा आलेली आहे. मग मला कोण नोकरी देणार? उमेदीच्या काळातच आता अशी गत झाली आहे तर माझ्या भविष्याचं काय होईल? अशा प्रश्नांच्या गर्तेत सापडलेला तो सैरभैर झाला होता. मात्र माझ्याकडे तरी कुठून त्याच्या या प्रश्नांची उत्तर असणार होती! खरंतर ही काय फक्त त्याचीच गोष्ट नाही त्याच्या सारख्या अनेकांना आज आपल्या भविष्याची चिंता सतावत असणार आहे.
तसं पाहिलं तर तुम्हाला, मला आणि मुळात भारतालाच बेरोजगारी हा विषय नवा नाही. पण लॉकडाऊनमुळे आता अर्थव्यवस्थेचा अधिकच बोजवारा वाजला असताना ज्यांच्या बळावर भारत महासत्ताक होऊ पाहत होता त्या तरुणांचेच भविष्य आता अधांतरी झाले आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे तरुणांचा एक वर्ग असाही आहे जो या लॉकडाऊनचा वेळ मोबाईलवर पबजी खेळण्यात आणि टिक-टॉकचे व्हिडिओ बनवण्यात घालवत आहे. या वर्गाला भविष्याची चिंता तर नाहीच, पण सध्याच्या परिस्थितीशी ही यांना घेणं देणं नाही. आपण भले, आपला पबजी भला असा जीवनमंत्र आत्मसात केल्यासारखे दिवस-रात्र मोबाईलमध्ये घुसून या खेळाला आणि अशा अँप्सलाच यांनी आपलं विश्व बनवल आहे. हा केवढा विरोधाभास म्हणायचा या पिढीचा !
आज ही तरुण पिढी टिक-टॉकवर वाढलेले आपले फॉलोवर्स बघून आनंदून जाते, त्यातून मिळणाऱ्या तोकड्या पैशांवर स्वतःला 'सेटल' समजते, पण उद्या बाहेरच्या खऱ्या जगात आपली काय किंमत होईल? आपल्याला आता निदान पोटापाण्यासाठी तरी काही काम मिळेल का? असे प्रश्न यांच्या गावीही नाहीत. पूर्वी आपला मुलगा वयात आल्यानंतर काही व्यसनांच्या आहारी तर जात नाही ना म्हणून पालक चिंतेत असायचे मात्र आताच्या पिढीला या अँप्सचं एवढं भयंकर व्यसन जडलं आहे की त्यापुढे त्यांना आपले आई-वडील काहीच आठवत नाही. कोणत्यातरी वेगळ्या जगात, वेगळ्या धुंदीत ते वावरत असतात आणि या सगळ्या परिस्थितीची जाणीव ज्यांना आहे... भविष्याचं कटू सत्य ज्यांना आत्ताच दिसायला लागलं आहे असा तरुणांचा जो एक गठ्ठा आहे तो दिवसेंदिवस अधिकच नैराश्याच्या गर्तेत जात आहे. भविष्याच्या चिंतेने त्यांना ग्रासलं आहे. या नैराश्यातून किंवा आपण आयुष्यात हवं ते साध्य करु शकलो नाही, म्हणून कोणी चुकीचं पाऊल उचललं तर याची जबाबदारी कोण घेईल? काळ सरकत जाईल तसं ही परिस्थिती बदलेलसुद्धा कदाचित, सगळं निट होईलही.. पण आज घडीला या तरुणांच्या अस्वस्थ मनाचे स्पंदनं थांबवत, त्यांना भविष्याची हामी कोण देईल? 

Saturday 7 March 2020

शक्तींचा विसर की पराक्रमाची गाथा

आज जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने प्रत्येकाला स्त्रियांच्या अस्तित्वाची जाणीव पुन्हा एकदा होईल आणि तिच्यावर औपचारिकता म्हणून शुभेच्छांचा वर्षाव केला जाईल. मग उद्या पुन्हा रात गई बात गई या उक्ती प्रमाणे सगळं पुढच्या एक वर्षासाठी शांत होईल. मग प्रश्न उरतो तो हा की फक्त एक दिवसच तिच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला का होते? जिच्याशिवाय पुरुषाचा पुरुषार्थच सिद्ध होऊ शकत नाही अशी 'ती' केवळ एका दिवसाची मोहताज असेल का? खरंतर प्रत्येक स्त्री ही इतकी स्वयंपूर्ण असते की आपल्यावर होणाऱ्या अत्त्याचाराविरुद्ध बंड पुकारण्याची ताकदसुद्धा तिच्यातच असते. पण जसा हनुमानाला आपल्यातल्या शक्तींचा विसर पडला होता तसाच विसर या स्त्रियांनाही पडला असला तरी प्रत्येकीच्या आयुष्यात याची आठवण करून देणारा जांबुवंत असतोच असे नाही. दिवसेंदिवस आपण बाईच बाईपणच नाकारतो आहे. एक मुलगी असण्यापेक्षा आपण तिला मुलासारखं घडवू बघतो आणि सगळा घोटाळा होतो. तिला एक स्त्री म्हणून जर आपण घडवू शकलो तर ती जास्त परिपूर्ण होऊ शकेल हे आपल्या लक्षातच येत नाही. आपला आत्मसन्मान जपण्यासाठी सीता भूमीत गडप झाली होती आणि आजही सगळ्या स्त्रिया या तिच्यासारख्याच आत्मसन्मान जपणाऱ्याच आहेत. म्हणजे आपण फक्त त्यांचा हा आत्मसन्मान कायम जागा ठेवायचे काम करायचे. बाकी तिची लढाई लढण्यासाठी ती सक्षम आहे आणि खरंतर स्त्रियांच आपण जितकं खच्चीकरण करू तेवढ्या अधिक त्या आत्मनिर्भर होण्याचा ध्यास घेतात. दुसरं असं की बायकांना पुरुष मागे ओढतात किंवा तिला दुय्यम वागणूक देतात हे काही अंशी खर असलं तरी स्त्रियांची खरी शत्रू ही दुसरी स्त्रीच असते नेहेमी. जे आपल्याला जमलं नाही जे आपण करू शकलो नाही तेच जर दुसरी एखादी बाई करत असेल तर तिच्या बद्दल वाईट बोलणं, तिला मागे ओढण्यासाठी प्रयत्न करणं हे सगळं बायकाच नाही का हो करत? पझेसिव्हीनेस आणि कॉम्प्लेक्स या स्त्रियांच्या गोष्टीच स्त्रियांना पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे स्त्रियांनीच जर आधी इतर स्त्रियांना स्वातंत्र्य दिल तर मग आपण समाजासोबत आम्हाला स्वातंत्र्य द्याव म्हणून लढा देऊ शकू. त्यामुळे या महिलादिनाला पुरुषांपेक्षा स्त्रीवर्गाने संकल्प करावा की आम्ही एकमेकींचे पाय ओढायचे सोडून आमच्यातली एखादी का होईना पण पुढे कशी जाईल यासाठी प्रयत्नशील राहू.... आपला दिवस आहे तर सुरुवात आपल्यापासूनच करूया जग आपोआप बदलेल... 
बाकी जागतिक महिलादिनाच्या शुभेच्छा💐💐🙏🙏

©राखी राजपूत

Wednesday 8 January 2020

विद्यापीठ नावाच बेट

          समाजात वावरत असताना बरेच डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स आपल्या आजूबाजूला असल्याचं मला जाणवलं तेव्हा या सगळ्या पेक्षा वेगळं शिक्षण घ्यायचं अस ठरवून पत्रकारितेला औरंगाबाद मधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतला आणि त्यावेळी अस लक्षात आल की डॉक्टर आणि इंजिनिअरची संख्या वाढत चालली आहे, अस जेव्हा मी समजत होते तेव्हाच यांच्या पेक्षा जास्त संख्या ही स्पर्धा-परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढली आहे हे इथे येऊन जाणवलं. असा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक वेगळा वर्गच आता समाजात तयार होतो की काय असं इथल्या विद्यार्थ्यांना पाहून वाटायला लागलं.
             मागची चार वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यातपीठात शिकत असताना या विद्यापीठाला  समजून घेण्याचा योग तर आलाच तसच इथली विचारधारा कशी आहे हे सुद्धा फार जवळून बघायला मिळालं. हे सगळं अनुभवत असताना विद्यापीठात मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीच आकर्षण विद्यार्थ्यांमध्ये दिसल. त्यामुळे इथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण फार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मी मूळची नाशिक जिल्ह्यातली. आमच्या भागात फार तुरळकच हे असे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दिसून येतात. त्यामुळे इथल्याच विद्यार्थ्यांमध्ये हे स्पर्धा परीक्षेचे एवढे आकर्षण का असेल असा प्रश्न आजवर कित्येक वेळा पडला आहे. 
           मुळातच मराठवाड्याला आणि इथल्या लोकांना आपल्या हक्कांसाठी कायम संघर्ष करावा लागलेला आहे. त्यातच दुष्काळ आणि त्यामुळे वर्षानुवर्षे पाचवीला पुजलेली गरिबी हे सगळं संपवण्यासाठी मग इथल्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याचा मार्ग फार जवळचा वाटावा यात नवल काही नाही. आपल्याला सरकारी नोकरी लागली म्हणजे आपलं आयुष्य फार सुखाचं होईल अशी सुप्त भावना इथल्या प्रत्येक तरुणाच्या मनात असते. याच सगळ्या भावना मनात ठेवून जेव्हा हा तरुण या विद्यापीठात येतो तेव्हा त्याच्या भावनांना खत पाणी घालणारच वातावरण त्याला इथ बघायला मिळत. मोठी अभ्यासिका, सर्व पुस्तकांनी सुसज्ज ग्रंथालय आणि तिथे आधीपासूनच सरकारी नोकरी मिळविण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी. या सगळ्यामुळे बाहेरून नव्याने आलेल्या विद्यार्थ्याला आपण सुद्धा आपले नशीब आजमावून बघावे अशी इच्छा होतेच आणि आपल्याला सुद्धा सरकारी नोकरी लागेल, आपली सुद्धा सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी स्वप्न रंगवण्यात तो मग्न होतो.  हा विचार बळावत जातो  आणि आता आपल्याला सरकारी नोकरी मिळणार या आनंदात हा तरुण दिवसातला दहा ते बारा तासांचा वेळ अभ्यासिकेत घालवतो. इथूनच खरतर त्याचा मृगजळाच्या दिशेने प्रवास सुरु होत असणार.
        बर या स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरिशिवाय आपल्या आयुष्याला गत्यंतरच नाही, आपण त्या शिवाय आयुष्यात सेटलच होऊ शकत नाही अस इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावर कोरलच गेलेलं आहे जस असच त्यांना पाहून आपल्याला वाटायला लागतं. याच नादात आपण आपल्या आयुष्यातील उमेदीची आणि कर्तृत्व गाजवून दाखवण्याची अनेक वर्ष घालवत आहोत हे सुद्धा बापड्यांच्या लक्षात येत नसेल का? एवढी वर्ष अभ्यास करून, तयारी करून सुद्धा जेव्हा या विद्यार्थ्यांच्या हाती अपयशच येत तेव्हा खरी फरपट सुरू होते. कारण सगळ्याच गोष्टींना मर्यादा आहे तशीच वयाची मर्यादा या परीक्षा देण्यासाठी सुद्धा आहेच. आपण यात पुरते अडकलो हे समजत तोवर दुसरीकडे नोकरी लागण्याचे पर्याय सुद्धा बंद झालेले असतात. अशावेळी एक तर असच एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या क्लासवर शिक्षकाची नोकरी हे विद्यार्थी करतात किंवा मग याच विद्यापीठामध्ये आपल्या सारख्याच दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी कमी पैशांत किंवा फुकटच 'स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी' याविषयावर  व्याख्यान देत त्यांना मार्गदर्शन करायला सुरू करतात ही किती गंमत म्हणायची?  म्हणजे पुढच्याला ठेच मागचा शहाणा याच्या उलट पुढचाच मागच्याला आपल्या सोबत ओढण्यासाठी किती तत्पर आहे इथे याच हे उत्तम उदाहरण म्हणता येईल का?
           सरकारी नोकरी विषयीच्या या विद्यापीठामधल्या आकर्षणामागे एक घटक म्हणजे यात मिळणार आरक्षण सुद्धा असू शकत का असही आता वाटायला लागलं आहे. कारण हे आरक्षण खाजगी नोकरीच्या ठिकाणी थोडीच मिळणार आहे! तिथ स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या ठिकाणचे विद्यार्थी खाजगी नोकरी विषयी फारसे उत्साही कधी नसतातच. आपलं काय नशीब आजमवायच ते सरकारी नोकरीमध्येच आजमावू अशी जणू पक्की खुणगाठच बांधलेली असते त्यांनी.
             या सगळ्या विषयावर एका मैत्रिणीने " आम्ही सारख या परीक्षा देत राहतो कारण पहिल्या वेळी आम्ही परीक्षेचे स्वरूप समजून घेतो आणि त्या नंतरच्या प्रत्येक वेळी आम्ही हळू हळू दर परीक्षेला आमचा अभ्यास वाढवतो, यामुळे कधी तरी आमची पोस्ट निघते." अशी प्रतिक्रिया दिली.  काहींनी तर मी सुद्धा सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला मला दिला.  स्पर्धा परीक्षा करूच नाही अस काही मी म्हणत नाही पण यात आयुष्यातला किती काळ घालवायचा हे आपणच ठरवायला नको का? प्रयत्नांती परमेश्वर अस जरी आपण म्हणत असलो तरी प्रयत्नांना यशच येत नाही अस जेव्हा समजत तेव्हा दुसरा मार्ग निवडण अधिक योग्य की लग्न झाल, मुलं झाली तरी आयुष्याची अशी फरपट करून घेत मृगजळाच्यामागे धावत रहाणं अधिक योग्य समजायचं?  या स्पर्धा परीक्षा म्हणजे एक प्रकारचा जुगारच असतो. त्यातही आता सरकार जिथ सगळेच कारभार डिजिटल आणि मनुष्य विरहित करण्याचे मनसुबे बांधत आहे, तिथ या जुगारापायी आपल पूर्ण आयुष्यच पणाला लावणाऱ्या या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आयुष्य म्हणजे काय फक्त सरकारी नोकरी नाही, हे कधी समजणार आहे? आता तर हे विद्यापीठ म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच बेटच झाल आहे की काय असं वाटायला लागलं आहे. दर वर्षी या बेटावर नवीन विद्यार्थी येत राहतात. पण इथून बाहेर जाणारे फारच कमी. तहानलेल हरीण ज्या प्रकारे मृगजळाच्या मागे धावत सुटत तशीच अवस्था इथल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांची आज झाली आहे. अजून किती वर्ष या विद्यापीठातला विद्यार्थी असं चकवा पडल्या सारख भरकटत राहणार याच उत्तर आता बहुतेक काळच देऊ शकेल अस वाटत.