Tuesday 25 December 2012

माझा रविवार ...

" उद्या रविवार आहे, मी उद्या उशिरा उठणार.........!!"
        हि माझी दर शनिवारी रात्रीची ठरलेली घोषणा...आणि उद्या रविवार म्हणजे शनिवारी रात्री उशिरा पर्यंत जागायला काहीच हरकत नसते. मग रात्री उशिरा झोपल्यावर सकाळी मस्त ९-१० वाजता उठायचं ( रोजची सकाळी लवकर उठायची घाई नाही!).
        उठल्यावर मस्त वाफाळती कॉफी करायची आणि आरामात पेपर वाचत बसायचं.रविवार म्हणजे सगळ्याच वृत्तपत्रांना वाचनीय पुरवण्या असतात. पेपर पूर्ण वाचून झाल्यावर मग अंघोळ! तोपर्यंत नाश्ता काय करायचा हे ठरलेल असतच. मग अंघोळीनंतर सहपरिवार नाश्ता होतो आणि सोबत गप्पा असतातच!
मग रविवारच्या ठरलेल्या कार्यक्रमांना सुरुवात होते.......
        रविवार म्हणजे मी एखाद आवडत चित्र शोधून त्याची रांगोळी काढणार.( मी या रांगोळ्या अगदी दर रविवारी काढते. घरातच, कारण या मुळे रांगोळी काढायचा छान सराव होतो).माझी रांगोळी पूर्ण होई पर्यंत आईने जेवणाचा मेनू ठरवलेला असतो. मग तिच्यासोबत जेवण बनवायचं आणि सगळ्यांनी सोबत जेवायचं.
आणि मग मस्त दुपारची 'वामकुक्षी' घ्यायची!
       या वामकुक्षीनंतर पुन्हा वाफाळती कॉफी आणि सोबत एका नवीन पुस्तकाची सुरुवात जे मग पुढच्या रविवारपर्यंत वाचून होत. मग संध्याकाळी एखाद्या आप्तांच्या घरी भेट द्यायची.नाहीतर मग चित्रकलेची वही घेऊन छान चित्र काढायचं...
        रात्री "रविवार स्पेशल'' मेनुची तयारी करायला आईला मदत करायची आणि सगळ्यांनी सोबत या रविवार स्पेशल मेनूचा आनंद लुटायचा......
         हा माझा रविवार मला माझ्या छंदांसाठी खूपच छोटा वाटतो. कपाटाची, खणाची साफ-सफाई, पुस्तक वाचन, कुकिंग आणि बरच काही...  आपल्या सगळ्यांचेच काही ना काही छंद असतात जे या धकाधकीच्या जीवनात पूर्ण कारण शक्य होत नाही. पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा रविवार जसा आपल्या जिवाभावाच्या मित्रा सारखा आपल्या सोबत असतो.
          तुम्हाला आठवत का? आपण लहान होतो तेव्हा आपण तेच करायचो जे आपल्याला वाटायचं..... कुठलीच जबाबदारी नसायची तेव्हा प्रत्येकच दिवस रविवार होता! तस आता शक्य नसल तरी रविवारी आपण आपल्या छंदांना, स्वप्नांना वेळ देऊ शकतो......
        रविवारी जर आपण आपल्या छंदांना वेळ दिला तर आपला पूर्ण आठवडा बघा कसा आनंदात आणि फ्रेश मूड मध्ये जातो.
       तुमचा रविवार सुद्धा असाच स्पेशल असेल ना? काय करता तुम्ही रविवारी? कसा असतो तुमचा रविवार?

 माझ्या रविवारच्या उपक्रमांचे काही फोटो.......





      


























Thursday 20 December 2012

माणसाची परत अश्मयुगाकडे वाटचाल ...

        बिहारमधील खगडिया जिल्ह्यात मुख्याध्यापकाने पाचवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार केला, नवी दिल्लीतील स्कूल बस चालक भावाने सोळा वर्षाच्या चुलत बहिणीवर अत्याचार केला,महाराष्ट्रात दोन प्राध्यापकांनी सहकारी महिला प्रध्यापिकांची छेड  काढली. या घटनांमधून तुम्हाला सुशिक्षित भारताचे दर्शन होते का?
        दिल्लीतल सामुहिक बलात्कार प्रकरण अजूनही ताजच आहे. झाल्या प्रकरणाची सविस्तर माहिती तशी आपल्या सगळ्यांनाच आहे आणि अस का घडल किंवा अस का घडत? हा प्रश्नसुद्धा आपल्या सगळ्यांनाच पडलाय. पण या प्रश्नच उत्तर मात्र कोणाकडेच नाही...
         पिडीत मुलीला न्याय मिळावा म्हणून संसदेतल्या सगळ्या स्त्रियांनी आपल्या मतावर ठाम राहून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हि मागणी केली.हि एक चांगली गोष्ट आहे आणि या घटनेमुळे सगळा देश जागा होऊन या पिडीत मुलीच्या मागे उभा आहे हि सुद्धा.
         पण हे अस का घडल? हा प्रश्न उरतोच.अस घडल कारण अशा घटना  घडल्यावरच भारतातले लोक जागे होतात!
          आपल्याला लहान पणापासून सांगण्यात येत कि बाईची अब्रू म्हणजे काचेच भांड असते. ते काचेच भांड फुटु नये. याची काळजी फक्त स्त्रीनेच घ्यायची ? समाजाची यात काहीच जबाबदारी नाही? कायद्याची काहीच जबाबदारी नाही?
          जर समाज सतर्क असेल, कायद्यात अशा आरोपींना/गुन्हेगारांना कठोर शिक्षा असेल तर का होईल अस? आता हे प्रकरण अजून मिटलेल नाही तर इकडे  दुसरी प्रकरण पुन्हा सुरूच आहेत! पटनात एका तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या  मुलीचा बलात्कार करून तिचा खून केला तर कोल्हापूरमध्ये प्रेमाला नकार दिला म्हणून मुलीच्या अंगावर तेजाब टाकण्यात आले...माणूस इतका राक्षसी कसा वागू शकतो? जनावर सुद्धा लाजतील अशी कृत्य करण्याचे विचार माणसाच्या मनात कसे येतात? अस कृत्य करताना एकाच्या सुद्धा मनात कस येत नाही कि हे चुकीच आहे? एकाचीही सद्सद विवेक बुद्धी जागरूक नसावी काय? माणसाची परत अश्मयुगाकडे वाटचाल सुरु झाली आहे काय? मग यांना शिक्षाही अघोरीच का नको?शिवाजी महाराजांचा राज्य कारभार आपण आदर्श मानतो,त्यांनीही महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाचे हात पाय छाटून टाकले होते,हे विसरायला नको.बालात्कार्यांना फाशी हीच योग्य आणि त्वरित शिक्षा व्हायला हवी!
            अशा घटना भारतातच जास्त घडतात. याला कारण कायदा ( आणि समाजसुद्धा) आणि त्यातल्या किती घटना आपल्या पर्यंत पोहोचतात? रोजच्या वर्तमानपत्रात तर रोज किमान ४-५ तरी बलात्काराच्या बातम्या असतातच! यामध्ये दोन वर्ष वयाच्या बालिके पासून ६० वर्षाच्या आज्जीपर्यंत पिडीत महिला असतात.बालात्कार्यांना वयाचाही विधिनिषेध नसावा का? शरमेने आपली मान खाली जाते.अरुणा शानबाग हेही एक असेच ज्वलंत उदाहरण. दिल्लीच्या केस मधील मुलीची अरुणा शानबाग होउदेउ नका. गुन्हेगारांना ताबडतोब व कठोर शासन झाले तरच पुढच्यांना कायद्याची भीती वाटेल.
            अस काही झाल कि नेते मंडळी जाऊन पीडितांना भेटून येतात.काही रक्कम "भरपाई" म्हणून देतात झाल! कोर्टात दाखल केलेला गुन्हा वर्षानु वर्ष चालूच राहतो...आणि पिडीत याचा मानसिक ताण आयुष्यभर सहन करतो.
            कुठे चाललोय आपण? विकसनशिलतेकडून विकसित देशाकडे कि  विकसनशिलतेकडून अविकसित देशाकडे? भारत २०२० मध्ये 'महासत्ताक' होण्याची स्वप्न पाहतोय ना आपण? असा असेल महासत्ताक भारत? जिथे स्त्री असुरक्षित आहे, भ्रष्टाचार बोकाळलाय, आणि कायदे धाब्यांवर बसवलेत! भरदिवसा खून होतात, कायदा हातात घेतला जातो, पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी इच्छा असूनही साक्षीदार पुढे येत नाहीत.
            असच जर सुरु राहणार असेल तर मग मला एक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच विचारावासा वाटतो कि अशा या लोकशाहीपेक्षा इंग्रजांनी आपल्यावर केलेलं राज्य काय वाईट होत? हातातल्या काठीला सोन बांधून फिरलं तरी ते चोरी होण्याची भीती तरी तेंव्हा नव्हती .........
          








Friday 14 December 2012

"भिकाऱ्या सारख जेवण.............."

 


                          "Eat breakfast like a king, lunch like a prince and dinner like a pauper!" 
            मी कशाबद्दल म्हणतेय ते समजल असेलच.रात्रीच जेवण.आजीच्या भाषेत जवळ जवळ लंघन आणि आईच्या भाषेत थोडस चौम्यौ !
            काल रात्री  एका मैत्रिणीशी फेस टू  फेस तोंडाला फेस येई पर्यंत गप्पा चालल्या होत्या,शेवटी ती म्हणाली "चल बाय .....जेवण करायचं !" मेनू विचारला तर म्हणाली "फ्र्यान्की  केलीय "
          आईला सांगितलं तर ती तिच्या जुन्या आठवणीत रमली. मजा होती हं त्यांच्या वेळी(२५-३०वर्षांपूर्वी)-कितीतरी वस्तू ,शब्द, गोष्टी तर आपल्याला माहितच नाहीत .तुम्हालाही ऐकून मजा वाटेल.चला तर मग पाहूयात काय म्हणाली आई ते .........................
            "मऊ मुगाची पिवळी गरमागरम खिचडी त्यावर तुपाची धार (बुटली मधून),सोबत लोणच,पापड (नागली, उडीद,ज्वारी,तांदूळ,पोह्याचा नाहीतर तांदळाचा)   आमच्या लहानपणी वडील आणि आम्ही मुल सकाळी ११ ला जेऊन बाहेर पडायचो ,संध्याकाळी पोहे,सांजा,भेल असा काहीतरी नाश्ता व्हायचा.मग खेळ,शुभंकरोती,अभ्यास आणि ८ वाजता रात्रीच जेवण. यापेक्षा जास्त उशीर नाही.
           ह्या गोष्टी मी काही ६०-७० च्या दशकातल्या नाही सांगत,तर त्या आहेत ८०-९० साल च्या. रात्रीच्या जेवणात पोळी भाजी फारच कमी वेळा असायची (जवळ जवळ नाहीच) भात, खिचडी असे प्रकार जास्त.पण त्यात विविधता खूप. म्हणजे  नुसता भात म्हटलं तरी मुगाची आमटी भात (तूरीच वरण रात्रीच खायचं नाही) पातळ पिठल भात,खिचडी तर अनेक प्रकारची पिवळी, साधी, मुगाची खिचडी, कधी तूप टाकून तर कधी जीरे, मोहरी, लसुन, मिरचीची तेलातली कुरकुरीत फोडणी टाकून,अख्या मुगाची फोडणीची तिखट खिचडी,मसाले भात,बाजरीची खिचडी . सगळे भाताचे प्रकार असूनही प्रत्येकाची वेगळी चव.
               भात नसेल तर भाकरी. थंडीच्या दिवसात बाजरीची,उन्हाळ्यात ज्वारीची आणि खावीशी वाटेल तेव्हा तांदळाची (हि तर अगदी गरम-ताव्यावरचीच खायची) पिठल भातासाठी  एकदम पातळ,भाकरीसाठी थोड घट्ट ,कधी लसणाच्या फोडणीच तर  कधी कांद्याच्या फोडणीच आधणाच. फोडणीची खिचडी किंवा बाजरीची खिचडी असेल तर कढी असायची सोबत.
              मोसमानुसार पण पदार्थात बदल व्हायचा. म्हंजे थंडीच्या दिवसात,पावसाळ्यात शेंगोळे (हुरड्याच्या पीठाचे) चीकोल्या, घावन (बेसनाचे-तांदळाच्या पीठाचे),थालीपीठ असे पदार्थ बनायचे.तर उन्हाळ्यात गुळाच्या पाण्यातल सातूच पीठ, दुध शेवया, आंब्याचा रस शेवया, जेवणात २ घास कमी खाऊन  टरबूज खरबूज खायचं.
              तोंडी लावायला दही, वेगवेगळी लोणची, कार्हळाची,खोबऱ्याची,शेंगदाण्याची चटणी,तळलेली ताकातली मिरची,पापडा  सारख्या खारोड्या.........................अगदी तोंडाला पाणी सुटत अजूनही आठवल तर.
              परत ज्याला भूक नसेल त्याला खायचा आग्रह नाही , लंघन करावस वाटल तर फक्त दुध घ्यायचं थोडस झोपताना.का जेवली नाही म्हणून हजार चौकश्या नाही. 
              पण आजकाल जेवायला लोकांना ९-१० वाजतात. हि पण वेळ कायम पाळलीच जाईल अस नाही सगळे सोबतच जेवतील याचीही खात्री नाही. जेवायला काय तर नुडल्स,पास्ता ,फ्रान्की ,  फ्राईड राईस -चायनीज नाहीतर इटालियन असले पदार्थ.आपल्या शेवया, शेंगोळी हे नुडल्स पेक्षा कधीही चांगले, चीकोल्या म्हणजे इंडिअन पास्ताच ना?आणि आपले भाताचे प्रकार त्या फडफडीत फ्राईड राइसला हरवतील.मऊ भाताचा वेगळा तांदूळ तर खिचडीचा वेगळा तांदूळ  म्हणजे तांदुळाच्या चवीतही वैविध्य आहे आपल्याकडे.
             आणि अजून एक गमत सांगू का? श्रावणातल्या सोमवारी  आमची शाळा लवकर म्हणजे ४लाच सुटायची-उपवास असायचा ना!तर हा उपवास संध्याकाळी लवकर सोडायचा असतो -६ वाजताच. आई लवकर स्वयपाक करायची-  वरण भात भाजी पोळी उपास सोडायला. आम्ही सगळे जण संध्याकाळी ६लाच जेवायचो.काय मस्त वाटायचं- बाहेर पाऊस पडत असायचा आणि घरात आम्ही गरम वाफाळत जेवण जेवायचो.
             आता तर श्रावणी सोमवारी शाळाही लवकर सुटत नाहीत आणि उपवास हि . छे, फार वाईट वाटत कि तुम्हाला हि  मजा  चाखता येत नाही म्हणून."
                   काय, ऐकल न मित्रानो काय धमाल होती आईच्या काळात,पापडाचे प्रकार, चटण्यांचे प्रकार किती होते पहिले न. शिवाय तळण  नाही मळणं नाही. कमी तेलातले पदार्थ. नाही तर आपण खातोय एकच एक उडदाचा पापड आणि कैरीच रेडीमेड लोणच . मी उद्या आईला फिकी खिचडी आणि फोडणीच तेल करायला सांगितलय.मलाही खायचाय तो कुरकुरीत लसुन. तुम्ही पण सांगणार ना तुमच्या मम्मीला?

Monday 10 December 2012

एक पत्र तुमच्यासाठी..

                                                                          ।। श्री ।।
प्रिय,
मित्र आणि मैत्रिणींनो,
         आज तुम्हाला सगळ्यांना पत्र लिहिण्याची इच्छा झाली.म्हणून पत्र लिहायला बसलेय.आपल्यासाठी अनभिज्ञ आहे हा पर्याय, म्हणून हा खटाटोप.आता तुम्ही म्हणाल कि एवढीच आठवण येत होती, तर फोन करायचा, एस.एम.एस.पाठवायचा. पत्राची काय गरज ? हो, आहे गरज.... म्हणूनच पत्र लिहायचं ठरवल.
         आपण लिहायचो ना शाळेत असताना,तसच...खोट खोट का होईना पण लिहायचो कि नाही? म्हंटल आता खर खर लिहू.
         मज्जा यायची ना अस खोट  खोट पत्र लिहायला .कधी घरी, कधी मित्र-मैत्रिणींना. तेव्हा वाटायचं कि अस खर खर पत्रही लिहाव कधीतरी....पण मग आपण मोठे होत गेलो,शाळेतल्या त्या खोट्या पात्रांशी असलेला संबंध पण तुटला. आता कॉलेज मध्ये आपण लिहितो व्यावसायिक पत्र, पुस्तकांची मागणी करणारे किंवा मग समारंभाचे आमंत्रण देणारे. तेही खोटेच.माझी आई सांगते कि पूर्वी नळाला जसे दिवसातून दोनवेळा पाणी यायचे, तसाच पोस्टमन सुद्धा दिवसातून दोनदा यायचा! हि गोष्ट तशी फार जुनी नाही, २० वर्षांपूर्वीपर्यंत असच होत. मग आपण मोठे होत गेलो तस फोन, एस.एम.एस यांच्याशी जवळचा संबंध आला आणि मनाच्या कोपऱ्यात असलेले, ते पत्रसुद्धा नाहीसे झाले....आणि नात्यांमधली जवळीक सुद्धा!
       आता आलीच आठवण तर टाकायचा एखादा मेसेज, इमेल किंवा करायचा फोन...हेच करतो न आपण आता?पण यात कुठलीच भावनिक गुंतागुंत नसते.
       पूर्वी जर पत्र पाठवायचे असेल किंवा कुणाचे पत्र आले तर घरात किती उत्साह दिसायचा ! पत्र म्हणजे नुसते कागदावरचे शब्द नसायचे ते... त्यातून खूप काही व्यक्त व्हायचं, प्रेम, आदर, नाती सगळच व्यक्त व्हायचं ! मोठ्यांच्या साष्टांग नमस्कारापासून तर किलबिल पार्टीच्या गोड-गोड पाप्या पर्यंत सगळ असायचं या पत्रांमध्ये. आता आपण पत्रापेक्षा जास्त कुरिअरचा, इमेलचा वापर करतो..कोणी गेलय का कधी आपल्या पैकी पोस्ट-ऑफिस मध्ये ? लिहिलंय का कधी आंतरदेशीय पत्र?
        पूर्वी पत्र म्हणजे आपल्या भावना व्यक्त करायचं साधनच होत! आपल्या माणसांना लिहिलेलं पत्र हे ठरवून नाही लिहील जायचं, त्यावेळी जे सुचेल जसे सुचेल तेच पत्रात उतरवायचे लोक आणि हो, ह्या पात्रांचे महत्वही खूप असायचं बरका !
        पोस्टमनने पत्र हातात दिल्यावर जर ते वरच्या कोपऱ्यात फाटलेले असेल तर वाचायच्या आधीच समजायचे कि पत्रात काहीतरी दु:खद घटना लिहिलेली आहे. किंवा जर पत्रावर हळद-कुंकू शिंपडलेले असेल तर कोणाचे तरी लग्न ठरले अस समजायचं.
        अगदी सण-समारंभांना पण लोक आप्तांच्या भेटकार्ड, शुभेच्छा पत्रांची आवर्जून वाट पहायचे.आता तसे लोक पण नाहीत आणि पत्रसुद्धा नाहीत..
        आज हे अस ब्लॉगवर का होईना पत्र लिहिताना त्या जुन्या शाळेत लिहिलेल्या खोट्या पात्रांची आठवण झाली...तुम्हीसुद्धा लिहून पहाल असच कुणाला तरी पत्र ? आता कोणाला पत्र लिहील तर लोक काय म्हणतील? असाच विचार करताय ना तुम्ही?
        कोणी काहीही म्हणाले तरी काय फरक पडतोय....आपल्या मनाला जो आनंद मिळेल त्या आनंदासाठी कोणाला तरी नक्कीच पत्र लिहा (आई - बाबांना, आजी-आजोबाना नाहीतर काका-मामांना आश्चर्याचा सुखद धक्का द्या).अगदी निसंकोच मनाने लिहा. फोन आणि मेसेजेसच्या जगातून थोड बाहेर निघून.कारण आता आमच्याकडे पाणी दिवसातून दोनदा यायच्या ऐवजी चार दिवसा आड येते  आणि पोस्टमन दिवसातून एकदाच काय कधीच येत नाही..!
        आपल्या आजच्याच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची हि अवस्था आहे तर पुढच्या पिढीला तर वस्तूसंग्रहालयात नेउनच दाखवावे लागेल कि पत्र काय असते आणि कसे दिसते!
                                                                                                                        तुमची मैत्रीण,
                                                                                                                              अपूर्वा
       
                                                                                                                                                                                                                                                                 

Saturday 8 December 2012

एक कप कॉफीचा ..!!


खरतर हे अस रोजच होत. ब्लोगवर आज कुठल्या विषयावर लिहायचं? हा प्रश्न रोजच पडतो...मलाच नाही तर माझ्या सारख्या ब्लोग लिहिणाऱ्या अनेकांना हा प्रश्न पडत असेल नक्कीच.विषय हा अचानक सुचत असतो खरतर तो ठरवता येत नाही, कि आज या विषयावर लिहायचं...बरोबर ना?
म्हणूनच अशा अचानक सुचलेल्या विषयावरच तुमच्या बरोबर चर्चा करायची अस ठरवलंय.विषय तसा मजेशीरच आहे. कदाचित काहींना विषयाच नाव वाचल्यावर हसू सुद्धा येईल.
कॉफी !
हो, बरोबर वाचलंय तुम्ही कॉफीच..
आता या विषयावर बोलायसारख  काय असणार असाच विचार करताय न तुम्ही ?
भरपूर आहे कि बोलय सारख...
आता हेच पहा ना कॉफी पीत होते म्हणून कॉफीवर लिहायचं सुचल.....
सकाळी लवकर उठून अभ्यास करणाऱ्यांना सकाळच्या त्या कॉफीच महत्व विचारा.
सकाळी नाष्ट्या नंतर पेपर वाचताना जर  मस्त गरमा गरम, वाफाळती कॉफी भेटली तर..? अहाहा ! दिवस एकदम मस्त जातो मग सगळा. किंवा मग स्वत:साठी थोडा मोकळा वेळ काढायचा असेल तर मग सकाळी मस्त स्ट्रोंग कॉफी घेत त्या उगवत्या सूर्याकडे पहायचं.अगदी प्रसन्न वाटत.
कॉफी प्यायला तसा वेळ काळ लागत नाही म्हणतात! एखादी जुनी मैत्रीण किंवा मित्र जर रस्त्यात भेटली / भेटला तर तेव्हासुद्धा आपल्याला कॉफीच आठवते.मग कॉफी घेत घेत त्या शाळा-कॉलेजच्या जुन्या आठवणीना उजाळा द्यायचा.
ऑफिसमध्ये काम करून जर कंटाळा आला किंवा थकवा आला तर आपण मूड फ्रेश करण्यासाठी एक कप मस्त गरम कॉफिचीच ऑर्डर देतो कि नाही? बऱ्याच लोकांना तर जेवण झाल्यावर पण कॉफी घ्यायची सवय असते बरका .
जेवणा नंतर घेतलेल्या कॉफिचीतर मज्जाच काही और असते!
अहो,अगदी आपण रात्री उशिरा पर्यंत अभ्यास करायचो तेव्हासुद्धा झोप येऊ नये म्हणून कित्ती कॉफी प्यायचो, आठवतंय ना? नवीन मैत्रीची सुरुवात करताना सुद्धा हि कॉफीच साक्ष असते..!
आमच्या तुमच्या सारख्या लेख लिहिणार्यांना तर लेख लिहिताना जर जायफळ घातलेली कॉफी भेटली तर लिखाणाला जास्त उत्साह येतो! संध्याकाळच्या कॉफी सोबत जर एखाद आवडीच्या लेखकाच पुस्तक वाचायला भेटल तर मग आपल्याला दुसर काही करावच वाटत नाही.
हे तर फक्त दैनंदिन कॉफिबद्दलच बोललो.....बदलत्या ऋतूसारखी कॉफी सुद्धा बदलते हं ..!!
उन्हाळ्यातली ती खूप गरमतय म्हणून घेतलेली कोल्ड कॉफी. त्या कॉल्ड कॉफीच महत्व सांगून समजणार नाही असच आहे.
थंडीत ती गोधडीत बसून घेतलेली कॉफी !अहाहा! आणि ती पावसाळ्यातली खिडकीत बसून पावसाची मज्जा पाहताना गरमा गरम भाज्यांसोबतची कॉफी..!अप्रतिमच ..!
 कॉफीचे प्रकार सुद्धा किती असतात हो ?
सगळ्यांची कॉफी बनवायची पद्धत वेगळी असते अगदी. इनस्टंट कॉफी, उकळायची कॉफी, बिनदुधाची कॉफी,जायफळ लावलेली कॉफी, इराणी कॉफी, मद्रासी कॉफी आणि अजूनही बरेच प्रकार...!
    कॉफी, कॉफी, कॉफी ... पळते आता मी कॉफी प्यायला.!!