Friday 25 January 2013

तोंडी लावणे.....

         आपले भारतीय लोक जगण्यासाठी नाही खात तर खाण्यासाठी जगतात.आपण सगळेच खाण्याच्या बाबतीत खूप चोखंदळ आहोत,आपल्या जीभा फार चाटूरया आहेत. पूर्ण भारतात सगळ्या राज्यात प्रांत प्रांतात जेवण मसालेदार,चमचमीत बनत,म्हणून दिल्लीत चांदणी चौक, इंदोरमध्ये खाऊ गल्ली तर हैद्राबादमध्ये उस्मानिया बिस्कीट प्रसिद्ध आहेत.पाश्चिमात्यांच्या मिळमिळीत चवि आपल्याला मानवत नाहीत, मग आपण पिझा, चायनीज फूडला भारतीय चवीचा तडका देतोच.   बरोबर ना? ............. सकाळी नाश्त्याला उपम्यासोबत लिंबाच गोड लोणच असल म्हणजे उपमा अजून छान लागतो, पोह्यावर ओल खोबर पेरायलाच हव,फोंडणीच्या खिचडीसोबत पापड आणि लोणच  हव,
             रोजच्या जेवणात तोंडी लावायला लोणच किंवा चटणी किंवा कोशिंबीर हवी,.......... आणि बरच काही. आपण आपल्या रोजच्या जेवणातल्या भाज्यांमध्ये टाकल्या जाणाऱ्या मसाल्यांबद्दल जितके आग्रही असतो तितकेच रोजच्या जेवणात चटणी, कोशिंबीर आणि लोणच्यासारखे विविध तोंडी लावण्याचे प्रकार असावेत यासाठीही तितकेच आग्रही असतो.
          खर तर अस कोणीच नसेल ज्यांना लोणच  किंवा कोशिंबीर सारखे प्रकार आवडत नसतील.तोंडाला पाणी सुटल ना.मी कोशिंबीर आणि लोणच्या बद्दल बोलतेय म्हणजे तुमच्या नजरेसमोर नक्कीच आपल उन्हाळ्यात बनवले जाणार लोणच किंवा लिंबाच गोड लोणच आणि दही आणि काकडीची कोशिंबीर आली असेल.....बरोबर ना?
           पण अशा या उन्हाळी लोणच्या बरोबरच रोज बनवता येतील असे सुद्धा लोणच्याचे प्रकार आहेत  बर का.......!! आणि वेगवेगळ्या कोशींबीरींचे सुद्धा ....!!
          आणि अशी लोणची बनविण्याची कृती सुद्धा खूप सोपी असते.........
          आपल्या पैकी बऱ्याच जणांना फ्लॉवर  आवडत नाही ( मला सुद्धा ..). पण याच फ्लॉवरच  झटपट लोणच अगदी चविष्ट लागत. या लोणच्या साठी लागणार साहित्य नेहेमी आपल्या घरात उपलब्ध असत. तस या लोणच्या साठी आपल्याला फक्त तेलाच्या  फोडणीची  गरज असते ( तेल + मोहोरी + हिंग+ +हळद+तिखट). बारीक चिरलेल्या फ्लॉवरमध्ये  हि फोडणी गार करून ओतायची आणि वरतून लिंबू आणि मीठ टाकून कालवायचे. म्हणजे हे रुचकर लोणच तयार होत.
          या लोणच्या सारखच आपण आंब्याच्या दिवसांत कैरीच सुद्धा झटपट लोणच बनवू शकतो. वरच्या सारखीच फोडणी बनवून त्यात बारीक चिरलेली कैरी टाकायची..... असच आपण गाजर  किंवा काकडीच लोणचही बनवू शकतो बर का.........
           आपल्या भारतीय संस्कृतीत अगदी पूर्वीपासूनच तोंडीलावायच्या पदार्थांना खूप महत्व दिले गेले आहे. आणि तितकच महत्व हे पदार्थ ताजे, प्रत्येक दिवशी नवे बनवलेले असायलासुद्धा ............
           कोशिंबीर  तशी आपल्या सगळ्यांनाच खूप आवडते. पण काहीना दही आवडत नाही म्हणून कोशिंबीर पण  नाही आवडत. पण मग आपण सगळे पदार्थ खावेत म्हणून आपल्या आईने आपल्यासाठी बिन दह्याच्या कोशिंबिरीचे प्रकार शोधून काढले आहेत. त्यातली एक म्हणजे गाजराची कोशिंबीर. किसलेल्या गजरात जीऱ्याची फोडणी टाकून वरतून साखर, लिंबू, तिखट, मीठ, आणि वाटल्यास शेंगादाण्याचा कुट टाकायचा म्हणजे हि कोशिंबीर तयार. असाच एक पदार्थ मी माझ्या आई कडून शिकले तो मेथीचा खुडा. निवडलेल्या मेथीची पण थोडी चिरून त्यात तेल, मीठ , तिखट टाकायचं आणि पोळी सोबत किंवा नुसत खायचं. असच आपण कुठल्याही पालेभाजीसोबत करू शकतो.....हवा असल्यास त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा आणि टमाटा  घातला तरी चालतो.कोथिंबीर +बारीक कापलेली हिरवीमिरची+थोड लाल +तिखट+कच्च तेल मीठ हे सगळ एकत्र करून हाताने चांगल कुस्करून घ्या, बघा कसा झणझणीत खुडा होतो ते.आणि पापडाचा खुडा तर बहुतेकांनी लहानपणी खाल्लाच असेल, त्यात आता मोठेपणी कोथिंबीर कांदा घालून खा .
                हे सगळेच पदार्थ अगदी पूर्वीपासूनच खाल्ले जातात बर का.....म्हणजे थोडक्यात काय तर आपण अगदी पूर्वीपासूनच आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचा समावेश आपल्या जेवणात करतो.मग आताच त्याला सलाड सलाड म्हणून का नावाजा ?









Wednesday 9 January 2013

अस्वस्थ मनाची स्पंदने....

   

   आजकाल घडत असलेल्या प्रत्येक घटनेचा विचार केला तर अस लक्षात येईल कि प्रत्येक घटनेचा परिणाम सगळ्यात जास्त तरुणाईवरच होतो. चांगला-वाईट दोन्ही प्रकारे. या तरुणाईचे मन नेहेमी अस्वस्थ, भांबावलेले, द्विधा मनस्थितीत असते........
      शिक्षण क्षेत्राचा जर विचार केला तर या क्षेत्राबद्दल  तरुणाईच्या मनात मोठ्या प्रमाणात नैराश्य दिसून येते शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना भरमसाठ डोनेशन आणि फी भरावी लागते. पण शिक्षणाचा दर्जा अगदीच खालावलेला असतो. छोट्या शहरातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना हुशार असून सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे त्यांच्या हुशारीला योग्य दिशा मिळत नाही. शिक्षकांचेही योग्य मार्गदर्शन त्यांना मिळत नाही.  पुस्तकी शिक्षण पद्धती आणि प्रात्यक्षिक-व्यवसायाभिमुख शिक्षणाचा अभाव  यामुळे या तरुणाईला आपले भविष्य अंधकारमय दिसते .
       फक्त पुस्तकी अभ्यास शिकवण्यापेक्षा प्रात्यक्षिक स्वरुपात तरुणाईला अभ्यासाची ओळख करून दिली तर त्यांना त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल... साध उदाहरणच घ्यायचं म्हंटल तर शाळा-महाविद्यालयात आपल्याला संगणकाचे जे प्रशिक्षण दिले जाते त्याचा काहीच उपयोग आपल्याला पुढील आयुष्यात नोकरीच्या ठिकाणी होत नाही. प्रत्यक्षात प्रत्येक कंपनीचे,कार्यालयाचे,बँकांचे स्वतः चे वेगळे सोफ्टवेअर असते. त्याचे प्रशिक्षण कुठेच मिळत नाही.तसेच पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत सुद्धा घडते. प्रत्यक्ष पाठ वेगळा शिकतो आणि व्यवहार वेगळा असतो.
     राजकारणी नेत्यांच्या शिक्षणसंस्थांमध्ये  प्रवेश घेण्यासाठी भरलेली भरमसाठ फी आणि डोनेशन तशाच मार्गाने परत मिळविण्यासाठी हि तरुण पिढी आपल्या व्यवसायात गैरमार्गाचा अवलंब करते.
      आपल्या पैकी बऱ्याच जणांनी टि.व्ही. वर लागणारी एक जाहिरात पहिली असेल........वर्गात वाद-विवाद स्पर्धा सुरु आहे आणि तिचा विषय आहे '' राजकारणी आणि भ्रष्टाचार .'' विषयाच्या दोन्ही बाजूंनी बोलणारे विद्यार्थी अचानक उठून एकमेकांना मारायला लागतात, खुर्च्या - टेबल तोडतात, अगदी शिक्षकांच्या समोरचा माईक उचलून त्याने सुद्धा एकमेकांना मारतात.......आपल्या संसदेत अशा प्रकारचे चित्र आपल्याला नेहेमी पाहायला मिळते. त्यावर हि जाहिरात काढली आहे. तरुण पिढी जे बघते तेच शिकते म्हणून नेत्यांना व्यवस्थित वागण्याचे आवाहन या जाहिरातीतून सरकारने केले आहे. नेत्यांनी केलेले करोडोंचे घोटाळे, भ्रष्टाचार यामुळे राजकारणाकडे तरुणपिढी वळत नाही आणि राजकारणात पदार्पण केले तरी तिथेही नैराश्याच त्यांच्या पदरी पडते.या सगळ्याला वैतागून या विरुद्ध आवाज उठवते. पण त्यांचा आवाज ऐकणारा या राजकारणात कोणीच नाही हे लवकरच लक्षात येउन मनातल्या मनात आपल्या व्यवस्थेला कोसणं फक्त त्यांच्या हाती राहत.याचंच उदाहरण म्हणजे श्री.अण्णा  हजारेंच भ्रष्टाचार विरूद्धच आंदोलन.... अशा आंदोलनांमध्ये तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला . पण याची निष्पत्ती  काय? या नेत्यांमध्येच दुफळी दिसल्यावर तरुणाईने त्याकडे पाठ फिरवली.
        बऱ्याचदा हे लक्षात येते कि आपल्या राजकारण्यांपेक्षा हि तरुण पिढी समजदार आहे आणि तिने ते वेळोवेळी दाखवूनही दिले आहे....... पण राजकारणात घुसलेली हि तरुणपिढी ज्या राजकारण्यांच्या आधारे राजकारणात येते त्यांनी पक्ष बदलला कि हे तरुण वाऱ्यावर सोडले जातात.दिशाहीन होतात. आणि मग त्यांची उर्जा अनाठाई खर्च होताना दिसते.
         या सगळ्याला कंटाळून हि पिढी एक तर परदेशी जाण्याचा मार्ग निवडून भौतिक सुखांचा आनद लुटण्याचे स्वप्न पाहते  किंवा मग आध्यात्माकडे वळते.पण इथे तरी काय वेगळ आहे?............ रोज उठून एक साधू, बापू, गुरु, महादेवी तयार होतात. पण लोकांना गीता, रामायण-महाभारत आणि अध्यात्माच ज्ञान देणाऱ्या यातल्या किती साधू आणि बाबा-बुवांना खरच गीतेचा अर्थ समजलाय?
हा प्रश्न माझाच नाही तर सगळ्या तरुण पिढीचा आहे....अशा अध्यात्माकडे वळल्याने तरुणाईची ऊर्जा वाया  जात आहे. त्यांच्या या उर्जेला योग्य दिशा, उद्द्येश्य मिळाले तर उद्याचा आदर्श नागरिक घडू शकेल.
          सध्या या बाबा-बुवांमध्ये राजकारणात जाण्याची 'क्रेझ' भरपूर दिसून येते. त्यामुळे आध्यात्माकडे बघण्याचा तरुणाईचा दृष्टीकोन उदासीनतेने भरलेला असतो.
          का प्रत्येक क्षेत्राबद्दल असे घडते या तरुण पिढीचे? कुठे चुकतो आपण त्यांना समजून घ्यायला?
          विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि त्यात जर मुल एकटेच असेल आणि आई-बाबा दोघेही नोकरी करणारे असतील तर मुलांना सोबतीची, एखाद्या समवयस्क माणसाची कमतरता नेहेमीच जाणवते. ज्यांच्या जवळ ते आपल मन मोकळ करू शकतील, आपले मत व्यक्त करू शकतील.....आणि अशातच ज्या अवस्थेत मुलांना आई-वडिलांची जास्त गरज असते तेव्हा आई- बाबा मुलांना आपले निर्णय स्वत: घ्यायला सांगतात.त्यामुळे काय बरोबर आणि काय चूक ह्याचा गोंधळ उडतो आणि मुलांची द्विधा मनस्थिती होते.अशा वेळी दिशा भूल होऊन हि पिढी वाईट मार्गाला जाते.
        मित्रानो आणि मैत्रिणिनो, आपण जर इतिहास पहिला तर सुभाषचंद्र बोस असो(यांनी राष्ट्रप्रेमाचे स्वप्न तरुणाई समोर ठेवले),स्वामी विवेकानंद (यांनी बलशाली भारत उभा करण्यास तरुणांना आव्हान केले) किंवा महात्मा गांधी (यांनी अहिंसेने स्वराज्य मिळवण्याचे प्रत्यक्ष उदाहरणच घालून ठेवले)असोत, सगळ्यांना जास्त पाठींबा होता तो तरुण पिढीचाच! आणि या महान लोकांनासुद्धा माहिती होते कि हि तरुण पिढीच देशाला पुढे नेऊ शकेल .......... मग आता का हे लक्षात येत नाही कि भविष्य तरुणाईच्या हातात आहे.....या अन अनुभवी पिढीला हवी योग्य दिशा,योग्य मार्गदर्शन आणि योग्य मार्गदर्शक नेतृत्व !
         या तरुण पिढीची होत असलेली घुसमट, अस्वस्थ करणारे प्रश्न कधी एकले जातील? कधी एकली जातील हि अस्वस्थ मनाची स्पंदने?