Sunday 10 February 2013

खजिना........

          आमच्या घरी प्रत्येक रविवारी काही ना काही पसारा निघतच असतो... आता तुम्ही म्हणाल कि रविवारी बऱ्याच घरात साफसफाई होतच असते त्यामुळे पसारा निघणारच! पण आमच्या घरातला हा पसारा आम्ही मुद्दाम साफसफाईसाठी काढतो अस नाही..... तो काही ना काही कारणामुळे आपोआपच निघत असतो.......
          आज सुद्धा असच झाल. आज हा पसारा निघण्याच कारण होत कुंडली .... माझ्या मोठ्या बहिणीला तिची कुंडली पहायची होती .........आता हि कुंडली इतक्या वर्षांत कुठे ठेवली गेलीय हे कोणाच्याच लक्षात राहिलेलं नाही.... सगळ्यांनी आपल्या आपल्या शकला लढवल्या, आईने कपाटात शोधलं, बाबांनी सगळे ड्रॉवर धुंडाळून काढले.....पण कुंडली सापडली नाही....आता हि शोधाशोध सुरु असताना मी त्यात सहभाग घेणार नाही हे शक्यच नसत...... आता हि कुंडली जिथे सापडेल अशी जागा मी सुचवली.अशी एकच जागा घरात उरली होती जिथे हि कुंडली सापडली असती आणि ती जागा म्हणजे आमच्या माळ्यावर वर्षानुवर्ष ठाण मांडून असलेल्या काही पेट्या आणि सुटकेस...... आता या पेट्या आणि सुटकेस उघडायच्या म्हणजे माझ्यासाठी ते एखादा खजिना सापडायसारखच  आहे. फक्त माझ्यासाठीच नाही तर ज्यांना अशा जुन्या वस्तू , कागद पाहण्याची आवड आहे त्यांना सगळ्यांनाच अशा जुन्या वस्तू आणि कागदांनी भरलेल्या पेट्या खजिनाच वाटतात.......
आणि या अशा जुन्या कागदांच्या आणि वस्तूंच्या मागे बऱ्याच मजेशीर, काही भावनिक गोष्टीसुद्धा असतात बर का....!
             " आपण या पेट्या फक्त कुंडली शोधायची आहे म्हणून उघडत आहोत. बाकीच समान उचकून पाहत बसायचं नाही." पेट्या उघडण्यापूर्वीच आईने हि सूचना केली आणि साहजिकच ती सूचना माझ्यासाठी होती...
आईची हि सूचना अगदी निमुटपणे मी मान्य केली आणि सर्व पेट्यापासून थोड लांब बसले.
             आईने त्या पेट्यामधून वस्तू एकेक करून बाहेर काढून ठेवल्या तशी माझी चुळबुळ सुरु झाली आणि नंतर नेहेमीप्रमाणेच आईचे लक्ष नसताना हळूच या पसाऱ्यात  घुसले.
            तुम्हाला सांगते मित्र-मैत्रिणिनो , या सगळ्या पसाऱ्यात आईने अगदी १९९० वगैरे पासूनच्या वस्तू आणि कागद सांभाळले आहेत! आणि काही तर अगदी ती शाळेत असतानापासूनचे समान आहे! या सगळ्या वस्तू तिला कोणी कोणी भेट म्हणून दिल्यायत. काही तिला भेटलेली बक्षीस आहेत, तर काही कागदांवर आम्ही लहान असताना आमच्या मोठ्या मोठ्या अक्षरांत आजीला लिहिलेली पत्र......., दिवाळीला आप्तांनी दिलेली भेट कार्ड आहेत. प्रत्येक वेळा रांगोळी स्पर्धेत नंबर मिळवल्यावर वृत्तपत्रात त्याबद्दल आलेल्या बातम्यांचे कागद असोत कि आईने लिहिलेल्या वृत्तपत्रांतल्या लेखांचे कागद असोत....तिच्या विणलेल्या विणकामाचे patern असोत कि तिने काढलेल्या चित्रांचे पेंटिंग असोत. सगळ तिने या पेट्यामध्ये वर्षानुवर्ष सांभाळून ठेवलय.....( तिची हीच सवय आम्हाला लागलीय....तिच्यासारखच मीसुद्धा अशा बऱ्याच गोष्टी आठवणी म्हणून सांभाळून ठेवल्यायत आणि सांभाळतेय)......
            तर आता मी या पसाऱ्यात उडी टाकली म्हणजे मी तिला प्रत्येक कागद आणि छोट्या छोट्या वस्तूबद्दल प्रश्न विचारत होते आणि ती सगळ्या गोष्टी सांगत होती......थोडक्यात काय तर आम्ही दोघी कुंडली शोधायला बसलोय हे विसरून गेलो होतो..........असच असत नाही का मित्रानो, खरतर आताच्या पिढीला या सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवण म्हणजे मूर्खपणा किंवा गबाळ वाटत. पण अशा सांभाळून ठेवलेल्या वस्तू आणि कागदांमध्ये ज्या आठवणी असतात त्या आपल्याला आठवणींच्या गावी घेऊन जातात.......जिथे आपण पुन्हा ते शाळेचे दिवस किंवा मग आपल्याला आनंद देणारे क्षण जगात असतो......बरोबर बोलतेय ना मी?
      आता तुम्हीच सांगा कि आजच्या या संगणक आणि मोबाईलच्या जमान्यात वाढलेल्या मुलांना भेट कार्डाच किंवा आप्तांच्या पत्रांच महत्व कस समजेल?  आपण सगळेच कधी ना कधी या आठवणींच्या गावी जाताच असतो आणि पुढेही जातच राहणार आणि हा आठवणींचा खजिना अनुभवत राहणार.......