Sunday 3 March 2013

एक कटिंग चाय ……

         '' भैया,एक कटिंग देना !!"…हे कॉलेज जवळच्या कुठल्याही टपरीवर एकू येणार वाक्य ….बरोबर ना ? एक कटिंग चाय म्हणजे नुसतीच एक कटिंग ( खासकरून अस्सल मुंबईकरांसाठी ) दमलेल्या , थकलेल्या जीवांची हि रोजची सोबतीण असते ! याच कटिंगच्या सोबत आपण काय काय गोष्टी करत असतो,ठरवतो, बिघडवतो, घडवतो आणि अजून बरच काही करत असतो .  कधी टिंगल टवाळी  करतो, तर कधी थट्टा मस्करी करतो  आणि कधी कधी फुल टू असलेल टेन्शन याच कटिंग चाय बरोबर उडवून लावतो ! वडा-पाव आणि एक कटिंग चाय या दोघांनी अनेकांची भूक शमवली आहे. रिमझिम पाऊस  आणि सोबत मित्र ( किंवा कधी ती किंवा कधी तिच्या आठवणी )
          गरमा - गरम भजी आणि एक स्पेशल कटिंग चाय हे समीकरण आपल्याला गणिताच्या समीकरणापेक्षा  लवकर समजत !  नाक्या - नाक्यावरल्या टपऱ्या आणि तिथली लोकांची गर्दी हा खरतर संशोधनाचा विषय बनलाय.मी अस का म्हणतेय हे पहायचं असेल तर  औरंगाबादच ''अझहर टी हाउस'' आणि कोलकताच  ''इंडिअन टी हाउस '' यांना एकदा नक्की भेट द्या . मित्र-मैत्रिणींनो बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कि ''कटिंग चाय''म्हणजे असत तरी काय? खरतर हा शब्द मुंबईतच पहिल्यांदा वापरला गेला.… दुध, साखर, आल्याचा मसाला आणि हिरवा चहा  एका मोठ्या किटलीत  उकळवतात  आणि गरमा गरम प्यायला देतात , यालाच ''कटिंग'' म्हणतात कारण या चहाची चव खूप कडक ( strong) असते . बऱ्याच  शहरांमध्ये या कटिंग चायची स्पेशल दुकाने असतात आणि अशा या दुकानांचे काही खास बिस्कीट किंवा बन ( मस्का) असतात जे या कटिंग चाय सोबत दिले जातात. किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे sandwich सुद्धा असतात .
            तर मित्र-मैत्रिणींनो, या कटींगच आणि आपल सुत जमत खरतर कॉलेजला असताना. कॉलेजमधली आख्खी तरुणाई या टपरीवर आणि एका कटिंगवर जीव ओवाळून टाकत असते  ! परिक्षेच टेन्शन, पोरीची लफडी किंवा मग सिनियर - जुनियरमधल टशन या सगळ्यावर एक कटिंग चाय हा एकच उतारा असतो!
            अनेक कवी - लेखकांची हि जवळची मैत्रीण असते बर का! हिच्या सोबतीने कवी आपल्या कविता रचतात आणि लेखकांना लेखनाचे नवे विषय हिच्या सोबतीत सापडतात . बऱ्याचदा या कटिंगच्या घोटासोबत कोणाला आपल पाहिलं  प्रेम प्रकरण सांगायचं असत तर कोणाला आपण आणखी एका लफड्यातून  कसे ( सुखरूप) सुटलो हे सांगायचं असत .
            कोणी बायकोची सहन न होणारी कटकट सांगत तर कोणी आयुष्याला शिव्या देत देत तीन-चार कटिंग रिचवत ……… कोणी नुकत्याच वाढलेल्या पगाराची पार्टी म्हणून किंवा नुकत्याच लागलेल्या नोकरीची पार्टी म्हणून '' हवी तेवढी प्या रे !!'' अस म्हणून सगळ्यांना खिजवत असतो .



           
                कारण अनेक असतात पण जागा आणि कटिंग एकच असते. हि कटिंग चाय कधी ना कधी आपल्या आयुष्यात येत असते आणि आपल्याला तिच्या प्रेमात पाडत असते.…. तुम्ही पडलाय का कधी अशा कटिंगच्या प्रेमात?