Saturday 25 May 2013

"Turning Point..."

                आपल आयुष्य बदलेल अस काही तरी आपल्या आयुष्यात नेहेमीच घडत असत. मग ते चांगल्या पद्धतीने बदलत ,नाहीतर वाईट पद्धतीने. पण यातली एखादीच गोष्ट आपल्या स्मरणात आयुष्यभर राहते. माझ्या मते असले Turning Point प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असावेत. कधी आणि कसा हा Turning Point आपल्या आयुष्यात येतो ते आपल्याला पण समजत नाही. 
               मी माझ्या आयुष्यातल्या Turning Point चा विचार करते तेव्हा मला माझा अकरावी - बारावीचा कॉलेजचा काळच आठवतो.दहावीच्या निकाला नंतर मी आमच्या गावातील वाणिज्य शाखेसाठी प्रसिद्ध असलेल्या कॉलेज मध्ये अकरावी(वाणिज्य)ला  प्रवेश घेतला त्यावेळा या नवीन कॉलेजबद्दल मनात थोडी भीतीच होती. कॉलेज कस असेल, शिक्षक कसे असतील, त्यांची शिकवण्याची पद्धत, तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला जुळवून घेता येईल कि नाही. वगैरे वगैरे . आता हि भीती या साठी वाटत होती मला कारण कि मी दहावी पर्यंत ज्या शाळेत होते,तिथे माझी तुकडी होती क आणि मी होते ढ !भाषा विषय आवडायचे पण गणित भूमिती खूपच अवघड वाटायचं.तिथल्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत अवघड होती. ( ते मला मुळीच समजायचं नाही) त्यांनी शिकवलेलं सार डोक्यावरून जायचं त्यामुळे मी कधी अभ्यासाच्या बाबतीत सिरिअस झाल्याच मला आठवत नाही.  त्यामुळे दहावी सहामाहीत मी गणितात नापास झाले. झाल.  मम्मीने मला धारेवर धरल. माझी अभ्यासाची पद्धत बदललि. मानेवर जू ठेऊन अभ्यास करवून घेतला आणि मी झाले प्रथम श्रेणीत दहावी पास. पुढे त्याच शाळेत अकरावीसाठी प्रवेश न घेता नवीन चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचं ठरलं.
                                         या नवीन कॉलेजविषयी मला भीती वाटण साहजिकच होत. कॉलेज सुरु झाल त्या पहिल्या दिवशीच शिक्षकांनी शिकवायला सुरुवात केली होती. माझ्या  सवयी प्रमाणे मी कॉलेजची पुस्तक  सुट्टीतच वाचून काढली होती. त्यामुळे शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मला अगदी लगेच सांगता आली होती तेंव्हा. सुरुवात तिथूनच झाली आणि बहुतेक, कारण तेंव्हा दिलेल्या उत्तरांमुळे शिक्षकांच्या नजरेत माझ्यासाठी एक वेगळी जागा झाली होती. ( ती पुढे अजूनही टिकून आहे हे सांगायलाच नको )
              खर म्हणजे एन्झोकेम कॉलेजच अस आहे कि तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते आपल दुसर घरच वाटत. तस हे कॉलेज फार मोठ नाही. पण मुलांसाठी वाचनालय, संगणक वर्ग वगैरे सारख्या सुविधा आहेत. आणि याही पेक्षा सगळ्यात महत्वाच म्हणजे तिथले शिक्षक. मला आठवत नाही कि आमचे शिक्षक आम्हाला कधी रागावले असतील. त्यांनी आम्हाला नेहेमीच त्यांच्या मुलांसारखच वागवल. इथल्या शिक्षकांचं एक वैशिष्ट्य अस कि ते नेहेमीच विद्यार्थ्यांकडून शिकत गेले. आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मिसळण सोपं  झालय त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या या वागण्यामुळेच आम्हालाही ते नेहेमी आमच्यातलेच वाटत आले. या सर्व शिक्षकांबद्दल आमच्या मनात आदर होता पण भीती कधीच नव्हती. कॉलेजच्या ग्राउंडवर विद्यार्थी गप्पा मारत असले म्हणजे हे शिक्षक सुद्धा आमच्यात सामील व्हायचे. 
                  आयुष्याबद्दल, भविष्याबद्दल विचार करायलाही इथेच शिकले मी. मला चांगल आठवतय कि आमच्या Accountच्या सरांनी आम्हाला एक स्वप्न दाखवल होत. ते नेहेमी म्हणायचे कि ''तुम्ही आयुष्यात खूप मोठे व्हाल,मोठ्या पदावर जाल तेंव्हा तुम्हाला पुन्हा या कॉलेज मध्ये यायचय दुसऱ्या  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला. आम्ही आज ज्या स्टेजवर उभ राहून तुम्हाला शिकवतो, तिथे उभ राहून बोलायचय.''
ते अस बोलायचे तेंव्हा तर ते चित्र डोळ्यांसमोर उभ राहायचं आमच्या. माझ्या मते हि मी पाहिलेली पहिलीच शाळा असेल जिथे पुस्तकी ज्ञाना शिवाय इतर व्यावहारिक ज्ञान देण्यावरसुद्धा भर दिला जातो.
               या कॉलेजमध्ये येण्या आधी मी पुढे काय करायचं ह्या बद्दल माझ्या मनात विचार सुद्धा आला नव्हता. पण आता जर कोणी मला विचारल कि पुढे काय करायचय तर माझ्याकडे या प्रश्नच उत्तर आहे.
मला माझ्या करिअरची फिल्ड ठरवता आली ती आमच्या कॉलेजच्या Magzine मध्ये छापून आलेल्या माझ्या एका लेखामुळे. तो लेख छापून आला त्यावेळा ठरवून टाकल ( किंवा मग अस म्हणा कि मला तस ठरवता आल)आपल्याला  ह्याच फिल्ड मध्ये करिअर करायचं.( Journalism)
              खरतर या दोनच वर्षांत या कॉलेजमध्ये घडलेल्या कितीतरी गोष्टींनी माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टी कोण बदलला. या कॉलेज बद्दल जितक सांगाव तितक थोडच वाटतय. त्यामुळे थांबते आता. 
             तुमच्या आयुष्यात आलाय का असा Turning Point ज्याने तुमच आयुष्य बदलल?



                  

Thursday 23 May 2013

''कार्टूनच्या जगात हरवलेली पिढी ………. ''

            ही आजकालची  पिढीना सारखा विचार करायला भाग पाडते मला. कधी त्यांच्या शिक्षणात झालेल्या बदलांमुळे तर कधी अजून कशा  मुळे . आज सुद्धा असच झाल. सकाळी वृत्तपत्र वाचताना  मुलांच्या टि. व्ही. पाहण्याच्या वाढत्या प्रमाणाची बातमी वाचली आणि मग ठरवलच आज माझ्या छोट्या भावासोबत टि. व्ही. बघायचा . म्हणजे समजेल तरी हि मुल  एवढ काय पाहतात त्या टि. व्हि. वर . पण तुम्हाला सांगते अगदी अर्ध्या तासातच मला अस वाटल कि मी तो टि. व्ही. तरी फोडावा नाहीतर या कार्टूनच्या channle बद्दल तक्रार तरी दाखल करावी.  
              तुमच्या घरी कोणी लहान मुल आहे का?  असेल तर त्यांच्या सुट्ट्या सुरु झाल्या असतील न? नाही म्हणजे मला विचारायचय कि तुमच्या घरात पण आमच्या घरातलच चित्र आहे का ? कार्टून , व्हिडीओ गेम्स. (वैताग नुसता !). तुम्हाला सांगते  ना मी आताच्या या मुलांना सुट्टी लागली म्हणजे आई - बाबांना वैतागच वाटतो. आणि का नाही वाटणार म्हणा ! अहो, हि मुल  त्या टि.व्ही. पुढून हलायलाच तयार  होत नाहीत. जेवण करताना सुद्धा अर्ध लक्ष त्या टि. व्ही. मधेच असत त्याचं. ( आपण काय खातोय या कडे सुद्धा लक्ष देत नाहीत ते. जेवण पोटात ठुसायचं  काम करतात तेवढ ). 
           म्हंटल आज पाहूच माझा छोटा भाऊ एवढ काय पाहतो त्या टि.व्हि. वर ! ( सारखा त्या डबड्याला चिकटून असतो !) अरे , तुम्हाला सांगते मी, असली घाणेरडी कार्टून असतात ना ती कि विचारूच नका . मला वाटल होत आपण पाहायचो लहानपणी  तशी असतील Tom & Jerry सारखी . पण कसल काय .  अहो, काही काही कार्टून तर मोठ्यांनी पण पाहू नयेत असलेच आहेत त्या पोगो आणि कार्टून नेटवर्क वरचे ! ( ओगि अएन्ड कोक्रोच). त्या डोरेमोन  मध्ये तर त्या एवढ्याश्या पोराची चक्क गर्लफ्रेंड पण आहे! बेन टेन मधले चेहेरे तर इतके विचित्र आहेत कि लहान मुलच काय मोठे पण  घाबरून झोपेतून उठतील. 
            आणि विशेष काय तर  मुलांना हि कार्टून फारच प्रिय आहेत. ( खर म्हणजे त्यांना या कार्टूनच व्यसनच लागलय ). त्यांच्या विरुध्द काही बोलल म्हणजे माझा भाऊ तर खूपच चिडतो.……  आपल्या सुट्ट्या काय सॉलिड असायच्या नाही  का? सुट्ट्या सुरु झाल्या म्हणजे आपला पाय कधी घरात टिकायचाच नाही . आणि घरात असलो तरी भावंडांशी बैठे खेळ खेळायचो.  सागर गोट्या , काचापाणी, बिट्या , आट्या  - पाट्या, लगोऱ्या, डब्बा express, आणि मुलींची भातुकली तर इतकी रंगायची कि विचारूच नका ! आणि एवढे खेळ खेळूनही पुढच्या वर्षाचा अभ्यास असायचा तोही पूर्ण करायचो आपण . 
          आताच्या या मुलांना तर ह्या खेळांची नाव सुद्धा माहित नाही. त्यांच्या सुट्टीच जग फक्त टि.व्हि. आणि कॉम्प्यूटर पुरतच मर्यादित झालाय. आपण टि. व्ही. बघायचो नाही अस नाही म्हणत मी . पण त्याला सुद्धा मर्यादा होत्याच कि! आपण पाहायचो ते कार्टून अगदी नेहेमी स्मरणात राहील असच असायचं . मोगली , सिम्बा , स्पायडर मन यांचे गाणे सुद्धा आईकायला किती छान वाटायचे . 
           आता बरेच आई - बाबा नोकरी करतात म्हणून मग मुलांना कुठल्या - कुठल्या शिबिरांना पाठवतात. त्यामुळे मुलांना सुट्टीत मामाच्या गावी जायची किंवा अजून कुठल्या गावी जायची मज्जासुद्धा नाही अनुभवता येत. 
           गम्मत अशी कि माझ्या भावाला आणि त्याच्या मित्रांना मी ह्या गोष्टी सांगितल्या तर ते काय म्हणतात माहितीय ? म्हणे '' तुमची जनरेशन वेगळी होती, आमची जनरेशन वेगळी.  त्यामुळे  थोडा तरी बदल व्हायला हवा ना !'' ( म्हणजे आम्ही दिवसभर त्या टि.व्हि.लाच चिकटून बसणार! )
           दुसर अस कि हे मुल परीक्षेत नेहेमी पहिले असतात . पण परीक्षा संपल्यावर त्यांना काही विचारल तर त्यांना सांगता नाही येत. या उलट चित्रपटांचे गाणे किंवा एखाद्या कार्टून बद्दल विचारल तर लगेच उत्तर देतात !  म्हणजे त्यांच्या अर्थाने त्यांना जी प्रगती वाटतेय ती खरतर अधोगतीच म्हणायला नको का? 
           आता या अधोगतीतून या मुलांना बाहेर कस काढायचं हा प्रश्न बऱ्याच आई - बाबांना  पडताना दिसतो. कारण काय आहे कि मुलांना जर टि.व्हि. पाहू नकोस अस रागावल तर ते खूप चिडचिड करतात. बाहेर खेळायला तर हकलावच लागत त्यांना. या तंत्रज्ञानामुळे निसर्गापासून सुद्धा खूप लांब गेलेल्या या मुलाचं भविष्य काय असेल ते सांगता येन कठीण झालय. पण ते अंधारात नसेल अशीच आशा आपण करू शकतो.



Sunday 12 May 2013

"झोप..."

            माझ्या मते असे खूप कमी लोक असतील या पृथ्वीतलावर ज्यांना झोप प्रिय नसेल आणि असे झोप प्रिय नसलेले टिटवीच्या कुळातले लोक सोडले तर मग बाकी सगळे कुंभकर्णाच्या कुळातलेच म्हणावे लागतील . ( निदान  माझ्या पाहण्यातले तरी ) .
             झोप म्हंटल कि हा जसा आपल्या सगळ्यांचा Weak Point बनतो आणि अशातच दुपारची झोप  (वामकुक्षी ) जरा जास्तच प्रिय असते आपल्याला . हा, आता हि वामकुक्षी अगदी रोजच नाही घेता  येत आपल्याला . पण ऑफिस मध्ये बसून रविवारची वाट पाहत या वामकुक्षीच प्लानिंग बरेच जण करतात . मग एकदाचा रविवार आल्यावर विचारूच नका . सकाळी तर बारा वाजे पर्यंत झोपतातच पण दुपारच्या स्पेशल मेनूच जेवण झाल्यावर पुन्हा वामकुक्षी असतेच. पण गंमत म्हणजे अशा वामकुक्षीच्या वेळी कोणी ना कोणी येउन झोपेच खोबर नक्कीच करत. कोणाचा तरी फोन तरी येतो . नाहीतर दारावर सेल्समन येउन बेल तरी वाजवतो किंवा मग औचित पाहुणे तरी येतात . मग अशा वेळी चरफडत मनात अशा  लोकांना शिव्या घालण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही .
            काय एक एक तर्हा असतात लोकांच्या झोपायच्या ! एक किस्सा आठवतो . माझी बहिण आजीकडे राहाते. तिलाही झोप अगदीच प्रिय आहे  आणि गंमत अशी कि ती एकदा झोपली म्हणजे तिला उठवायला ढोल ताशेच वाजवावे लागतात. असच एकदा आजीकडचे सगळे बाहेर गेले होते  आणि बहिण एकटीच घरी होती . हि दुपारी झोपून गेली आणि संध्याकाळी घरचे सगळे बाहेरून आल्यावर दर वाजवताच आहेत , तरी हि उठायलाच तयार नाही . बर खिडकीतून उठवण्याचा प्रश्नच नाही. आजीच घर दुसऱ्या मजल्यावर होत तेव्हा. मग शेवटी शेजाऱ्यांच्या घरातून आजीच्या गच्चीवर जाऊन तिथून एक पाण्याची नळी खिडकीतून आत सोडली आणि बहिणीच्या अंगावर पाणी टाकून तिला उठवल  होत ( ती अजूनही तितकीच गाढ झोपते हे सांगायलाच नको ).
              तुम्हाला तुमचे झोपेचे काही गमतीशीर अनुभव आठवतात का ? असच झोपेच एक उदाहरण द्यायचं म्हंटल म्हणजे सगळ्यांनी आपला अभ्यासाचा काळ आठवावा. अभ्यास करताना पुस्तक हातात घेतल म्हणजे कुठून का होईना झोप येतेच डोळ्यांवर. आणि परीक्षेच्या वेळी तर विचारूच नका! परीक्षा असल्यावर आपण सकाळी साडेचार पाचलाच अभ्यासाला उठतो . पण थोड्यावेळातच पुस्तक हातात घेऊन डुलक्या घ्यायला सुरुवात  होते.पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एखादी छान कथा किंवा कादंबरी वाचताना ती पूर्ण केल्याशिवाय मुळीच झोप येत नाही ( मला.).
             आता मला खर सांगा मित्र - मैत्रिणींनो तुमच्या पैकी किती जण कॉलेजमध्ये एखाद्या बोरिंग लेक्चरला शेवटच्या बाकावर जाऊन बसतात आणि झोप काढतात किंवा काढायचे ? ऑफिसमध्ये जर एखादी बोरिंग मिटिंग चालू असेल तर तेव्हा सुद्धा आपल्याला झोप आल्याशिवाय राहत नाही , बरोबर ना ?
              असा झोपेचा विषय निघाला म्हणजे मला लहानपणापासून नेहेमीच अस वाटायचं कि सुट्ट्या ह्या उन्हाळ्या ऐवजी हिवाळ्यात असाव्यात. कारण काय कि माझी शाळा सकाळी सात वाजता असायची आणि मग हिवाळ्यात माऊ गोधडीतून  बाहेर निघायचा  मला भारी कंटाळा यायचा ( खर तर रागच यायचा ).
              या झोपेच मला एका बाबतीत नेहेमीच नवल वाटत कि एक दिवस जर तुम्ही एका विशिष्ट वेळी झोपलात तर दुसऱ्या दिवशी त्याच वेळी तुम्हाला झोप आलीच म्हणून समजा !थोडक्यात काय तर बाकी कुठल्याही गोष्टीची सवय व्हायला वेळ लागतो . तस झोपेच्या बाबतीत होत नाही. आणि झोपेच नाव काढल्यावर सुद्धा लगेच झोप येते किंवा झोपावस वाटत. (निदान मला तरी )
              आता झोपेवरच हे भाष्य मी जरा आटोपतच घेते. कारण झोपेबद्दल इतक बोलल्यामुळे मलाच झोप यायला लागलीय . 
                                     ..................................................…………………

                 माझा हा लेख माझ्या सगळ्या झोपाळू मित्र - मैत्रीणीना .



Saturday 11 May 2013

'' माझी क्रोश्याची ABCD....''

   आपण सगळेच आयुष्यात एकदातरी ABCD शिकत असतो. बरोबर ना?मला वाटत कि प्रत्येकच गोष्टीची  ABCD हि असतेच. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा पाया हो!
     आजची माझी हि ABCD क्रोश्याच्या विनकामाची आहे. म्हणजे काय आहे कि सध्या सुट्ट्या सुरु आहेत . मग काय करायचं  हा खूप मोठ्ठा प्रश्न दत्त म्हणून समोर उभा असतो . म्हणून म्हंटल कि काहीतरी हटके करूयात.
      आईच्या मागे लागून क्रोश्याची ABCD शिकून घेतली . मग काय विचारता , आता तर क्रोश्याची प्रत्येक गोष्ट बनून पहायचा सपाटाच लावलाय मी . आणि तस पाहिलं तर क्रोश्याची ABCD आली म्हणजे पुढच्या गोष्टी आपोआपच सुचत जातात . (अस मला वाटत .)
        या काही मी बनवलेल्या छोट्या पर्स चे नमुने इथे देत आहे . या पर्स मी अगदी एका दिवसात एक अशा बनवल्या आहेत . तुम्हालाही ह्या नमुन्यांवरून नवीन नवीन कल्पना नक्की सुचतील. तुम्ही बनवून पहा. आणि मलाही तुमची कल्पना नक्की सांगा . ……






Friday 10 May 2013

'' तुम्हाला आता कस वाटतंय ?''

            नाशिकच्या चिखलीकरांच संपत्ती प्रकरण चांगलच गाजलंय  सध्या . आता हे एवढ सगळ झालय म्हंटल्यावर मिडियावाले त्याच्या घरी गेले नाहीत म्हणजेच नवल.… चिखलीकरांच्या आई - वडिलांना काय प्रश्न विचारावा या मिडियावाल्यांनी? '' तुम्हाला आता कस वाटतंय ?''  
             आता हा प्रश्न  हास्यास्पद आहे …..... आता तुम्ही सांगा काय वाटणार आहे त्या चिखलीकरांच्या आई - वडिलांना ( आनंदाने पेढे वाटतील का ते! ). हे मिडियावाले कुठे आणि कोणत्या क्षणी  कोणाला '' तुम्हाला आता कस वाटतंय ?'' विचारतील काही सांगता नाही येत .
               अहो, शेतकऱ्याने  आत्महत्या केली तर हे त्याच्या बायकोला जाऊन विचारतात कि '' तुम्हाला आता कस वाटतंय?'' आता ज्या बाईच्या नवऱ्याने आत्महत्या केलीय तिला आनंद तर होणार नाही !
              असे प्रश्न या मिडियावाल्यांनाच सुचतात बर का फक्त.. परीक्षेत यश मिळवलेल्यांना पण सगळ्यात आधी '' तुला आता कस वाटतंय ?'' हाच  प्रश्न विचारतात आणि मग बाकीच्या चौकश्या करतात .
            तुम्हाला आठवत असेल कि काही दिवसांपूर्वी मुंबईत  इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली . तेव्हा हे मिडियावाले हॉस्पिटल मध्ये गेले आणि तिथे एका जखमीला ( ज्याचे हात - पाय आधीच मोडले होते!) हे जाऊन विचारताय कि ''तुम्हाला आता कस वाटतंय?''.   तीच गत बॉम्बस्पोटाच्या वेळीही बघायला मिळते.  आपले पोलिस जखमी अवस्थेतही लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत असतात आणि हे मधेच जाऊन त्यांना विचारतात '' तुम्हाला आता कस वाटतंय ?''
           पत्रकारितेच शिक्षण घेतानाच असा प्रश्न विचारायचा हे शिकवतात कि काय कोण जाणे ! एखाद्या अभिनेत्याला पुरस्कार भेटला तरी '' तुम्हाला आता कस वाटतंय?" आणि पुरस्कार नाही भेटला तरी यांच आपल '' आता कस वाटतंय ?'' आता बिचाऱ्यांना वाईट वाटत असल तरी काय सांगतील. मग तोंड देखल काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात.( मग काय करतील म्हणा!) दुसऱ्याच्या मनाचा विचारच करत नाहीत हे त्यामुळे '' तुम्हाला आता कस वाटतंयची?'' यांची लामणच संपत नाही.
                 मला तर वाटत कि या मिडियावाल्यांनाच  कोपच्यात घ्याव एक दिवस आणि मग त्यांनाच विचारावं "आता तुम्हाला कसं वाटतंय ?''