Thursday 26 June 2014

''वास्तवाच दर्शन घडवणाऱ्या मालिका….''

            टी.व्ही. म्हंटल कि बातम्या, चित्रपट, आणि सिरीयल या गोष्टी ओघाने येतातच. आणि त्यात हि या टि.व्ही. सिरीयल चा नंबर एक असतो. जवळ जवळ सगळ्याच घरातला महिला वर्ग या मालिकांचा चाहता आहे. मग ती मालिका हिंदी असो वा मराठी ! या मालिका बघताना घरातले लोक ( जास्त करून महिला ) इतके तल्लीन होतात कि काही वेळा हे सगळ आपल्या घरात घडत आहे, असे  त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असतात !
           आश्चर्य म्हणजे या सर्व मालिकांची कथा थोड्या-थोड्या फरकाने सारखीच असते. तीच सासू-सुनांची भांडण, तेच खलनायकांचे कट कारस्थान,तेच लग्नात नटल्या सारखे घरात नटून वावरणे , मग कधी तरी यात बदल म्हणून नवऱ्याचे लग्ना व्यतिरीक्तचे संबंध, पुनरजन्म आणि तेच सगळ! मला तर प्रश्न पडतो कि वर्षानुवर्ष चालत राहणाऱ्या ( एकाच साच्यातून निघालेल्या ) मालिका बघताना लोकांना कंटाळा येत नसेल का?
          समजा येतच असेल कंटाळा , तरीही दिग्दर्शकाला, कथा लेखकाला शिव्या-शाप घालून पुढे या मालिका तशाच बघत राहणारे लोक सुद्धा  खूप दिसतात ! खर म्हणजे अशा मालिकांबद्दल हव तेवढ लिहिता येईल. पण आज हा विषय थोडा बाजूला ठेवावासा वाटतोय.
            त्यामागच कारण सुद्धा तसच आहे. दोन दिवसांपूर्वीच एक नवीन टि.व्ही.channel सुरु झाल आहे. '' Zee Zindagi''. channel नवीन सुरु होणार म्हंटल्यावर त्याबद्दल थोडी उत्सुकता होतीच मनात ! आणि या channel ची जाहिरात करतानाच यावर सीमेपलीकडच्या कथा दाखवणार आहेत हे हि जाहीर झाल होत. त्यामुळे आता या सीमेपलीकडच्या कथा नेमक्या काय आणि कशा आहेत जाणून घ्यायची सुद्धा इच्छा होतीच.
             या सगळ्या उत्सुकते मुळेच हे channel बघण्यात आल. आणि माझ्या मते मालिकांच्या कथांचे सगळेच विषय वेगळे निवडल्याने बऱ्याच  दिवसांनी ''सास-बहु'' च्या मालिकांपेक्षा वेगळ काहीतरी बघायला मिळाल्याचा आनंद सुद्धा झाला.
                  '' जिंदगी गुलजार हैं'' आणि '' कितनी गिरहे बाकी हैं '' सारख्या या channel वरच्या मालिका आजच्या वास्तवच दर्शन करून देणाऱ्या आहेत अस म्हणायला हरकत नाही. '' जिंदगी गुलजार हैं'' या मालिकेतून गरिबीशी झगडत आयुष्य काढणाऱ्या तीन बहिणींची आणि त्यांच्या आई ची गोष्ट आपल्या समोर येते. तर '' कितनी गिरहे बाकी हैं'' या मालिकेतून वृद्धांचे  एका वेगळ्या नजरेने अनुभवलेले किस्से किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या पुढे उभ्या करण्यात आलेल्या आहेत. ( किरण खेर यांच्या भाषेत सांगायचं झाल तर : '' एक अलग नजर और नजरीयेसे औरत के जिंदगी कि कहाणी'') समाजासोबत, आणि वेळ पडल्यास आपल्या परिवारासोबत झगडून स्वत:साठी जगणाऱ्या या महिलांच्या गोष्टी दाखवताना किरण खेर एक वाक्य वापरतात.- '' कितनी गिरहे खोली हे हमने, कितने गिरहे बाकी हैं ?'' खरतर हा प्रश्नच आहे आपल्या सगळ्या महिलांसाठी कि समाजाने लादलेल्या नियमांच्या किती गाठी आपण सोडवल्या आहेत आणि अजून किती गाठी सोडवायच्या बाकी आहेत ? वास्तवच दर्शन करून देणाऱ्या या मालिकांमधील संवाद खरच ऐकण्यासारखे आहेत. स्त्रियांचा आत्मसन्मान जगवणाऱ्या कथा, कुठेही नाटकी अभिनय न वाटता वास्तव वाटावा असा परिवार आणि त्यांची राहणीमान, कथेचा रटाळपणा टाळून कथानकाने घेतलेली पकड, विषयाचा वेगळेपणा ( कितनी गिरेह  बाकी हे मधील जेष्ट नागरिकांच्या एकाकी जीवनाचा विषय -आई वडिलांसाठी आता जसा तुमच्याकडे वेळ नाही  तसा आता त्यांच्याकडेहि वेळ नाही उरला ,डोळे  पैलतीरी लागलेत, त्यांना वेळ द्या, नाहीतर पस्तावाल -नवा विषय नवा मुद्दा आहे न ), कुठेही सेट वाटू नये अस घरगुती  वातावरण , या सर्व जमेच्या बाजू या मालिकांना प्रेक्षक प्रिय करतील यात शंका नाही .
                 अर्थात या channel वर सगळेच गंभीर विषय घेतले आहेत असे  नाही. ''ओन-झारा'' सारखी हलकी फुलकी कॉमेडी मालिकाही आपल्याला इथे बघायला  मिळते.
                 खर म्हणजे हे सगळ सांगण्याचा माझा एवढा हट्ट का? असा प्रश्न नक्कीच पडेल. पण आपल्या नेहेमीच्या त्याच त्या मालिकांच्या कथांतून बाहेर येउन काहीतरी वेगळ, वास्तवाची जाणीव करून देणार काही आपल्या महिला वर्गाने ( आणि अर्थातच सगळ्यांनी )पहाव हि प्रामाणिक इच्छा या मागे आहे.
              एकदा तरी या मालिका बघायला तुमची सुद्धा काही हरकत नसेल, नाही का ?           
             मी तर एव्हडी प्रभावित झालेय कि पहिल्या दोन भागातच मला हा लेख लिहावासा वाटला. यातच सगळ आल न!