Tuesday 13 September 2016

गांधारी- काल, आज, उद्या....

             गांधारी- नाव ऐकलं तरी समोर येते, डोळ्यांवर पट्टी बांधून कुठलीही तक्रार न करता निमूट पणे नवर्याची साथ देणारी स्त्री. खरतरं ध्रुतराष्ट्र राजा पहिल्यापासुनच नेत्रहीन होता, हे सर्वपरिचीत आहे. पण गांधारी सोबत त्याचा विवाह झाल्यानंतर फक्त नवरा पाहु शकत नाही म्हणून स्वतः सुध्दा या जगाला पाहण्याचा त्याग केला आणि शेवटपर्यंत डोळ्यांवर पट्टी बांधून त्याला साथ दिली... गांधारीची ही गोष्ट फार मनाला लागून रहाते.
             गांधारीने जेव्हा हा निर्णय घेतला असेल, तेव्हा नेमक काय असेल तीच्या मनात, हा प्रश्न नेहमीच छळतो मला. नवर्यासाठीच्या प्रेमापोटी तिन हा निर्णय घेतला होता की तिच्यावर झालेल्या संस्कारांचा पगडा इतका प्रभावी ठरला की नवर्यासाठी तिनं आपल आयुष्य बांधून घेतल..
            महाभारत संपल त्या बरोबर गांधारी सुध्दा संपायला हवी होती. पण ती महाभारतातली गांधारी आजही प्रत्येक स्त्री मधून कधी ना कधी, कुठे ना कुठे डोकावताना दिसते आणि त्या गांधारीची सावली दिसली की पुन्हा वाटून जात, का केल तिने अस?
अगदी अस सुध्दा वाटत की ध्रुतराष्ट्राच्या जागी गांधारी असती तर ध्रुतराष्ट्राने काय केल असत? त्याने बांधली असती अशी पट्टी डोळ्यांवर? संपूर्ण आयुष्यभर? मुळातच त्यानं अशा नेत्रहीन राणी सोबत लग्न तरी केल असत का ? हाच मोठा प्रश्न आहे.
            मी बर्याचदा या गोष्टी अनेक स्त्रीयांजवळ बोलून दाखवते तेव्हा एकच उत्तर सगळीकडे ऐकायला मिळत, ते म्हणजे, गांधारी "स्त्री" होती. ती "बाई" होती. तिने जे केल ते योग्यच होत अस सांगणार्या बायका आजही भेटतात हे नवल!
          लहानपणापासुनच स्त्री वर संस्कार केले जातात ते पुरुषप्रधान संस्कृतीला अनुरूप असतील असेच. पुरुष हाच आपला रक्षण करता असतो. पुरुषाशिवाय आपल अस्तित्व नाही. अशाच गोष्टी स्त्रीच्या मनावर बिंबवल्या जातात. त्यातही नवरा नावाच्या गोष्टीला तिच्या आयुष्यात देवाच्या जागीच पाहिल जातं. (पति-परमेश्वर म्हणतात ते हेच बहुतेक).
आपला नवरा म्हणेल त्याच्या हो मधे हो मिसळून त्याचा मागे मागे चालत रहाणार्या स्त्रीया आजही दिसतात. मग तिला ते पटत असो वा नसो, पण फक्त नवरा म्हणजे सर्वस्व असत आणि त्याच्या विरुद्ध जाण म्हणजे परमेश्वराला दुखवणे असा 'डोळस' विचार इथे स्त्री करताना दिसते. "का" असा प्रश्न विचारण स्त्रीला शोभत नाही, हेच तिला पूर्वी पासुन सांगितल गेल आहे. मग नवर्या मागे चालताना तिला ठेच लागली तरी निमूट पणे तोंडातून 'ब्र' सुध्दा न उच्चारता चालत रहाण एवढच तिच्या नशिबी येत.
          आणि  मी म्हणेल तसच वागणार्या एका 'वस्तूचा' मी 'मालक' आहे याच आनंदात पुरुष सुखावत असतो.
महाभारतात गांधारीने जे केल ते खरच महान होत. पण काळ बदलला तरी गांधारीच्या डोळ्यांवरची संस्कारांची आणि प्रेमाची पट्टी उतरली नाही याच आश्चर्य वाटत. नवर्याच्या अस्तित्वातच आपल अस्तित्व शोधणार्या या गांधारीला, आपलही स्वतःच अस्तित्व आहे हे अजून कसं समजल नाही? ही गांधारी अजून किती काळ प्रत्येक स्त्री मधे भेटत रहाणार?
             मुळातच आंधळेपणान कातड ओढलय पिढ्यान पिढ्या सर्व स्त्रीयांनी, गांधारी सारखी पट्टी समजून. पण फक्त एकदाच तिने ती उतरवली तेव्हा तिच्या दृष्टीत दुर्योधनाला अमर करण्याच सामर्थ्य आलेल होत. पण दुर्दैवी दुर्योधनाला तेही पुरेपुर घेता आलं नाही, पुरुषच ना तो! गांधारी समोर आई समजून न जाता, 'बाई' समजून गेला आणि स्वतःचा नाश करुन घेतला.
          आजच्या स्त्री मधे आलं असेल का अस सामर्थ्य काही अंशतः तरी? उतरवून पाहील का ती पट्टी डोळ्यांवरुन? की तिच्याही पोटी जन्मले असतील असे दुराचारी दुर्योधन, जे आजही ठाई-ठाई दिसतात. जे "आई"ला "बाई" समजतात.
            किरण येले म्हणतात तसं इथे शेवटी म्हणाव वाटत. " बये कोण आहेस तू? ध्रुतराष्ट्र पत्नी गांधारी कि दुर्योधन माता गांधारी?"