Monday 26 February 2018

सौंदर्याचा अट्टाहास कशाला?

     

श्रीदेवींच्या अचानक झालेल्या मृत्यु नंतर त्यांच्या मृत्यु मागची अनेक करणं आज सर्वांसमोर येत आहेत. किंवा त्याबद्दल उघडपणे बोललं जात आहे. त्यातही सर्वात जास्त बोलला जाणारा मुद्दा म्हणजे, श्रीदेवी यांनी तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रिया.  या निमित्ताने का होईना पण नेहमी सुंदर आणि तरुण दिसण्याच्या अट्टाहासाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे, असं म्हणता येईल. आधीपासुनच आपल्या समाजात सुंदरतेला खुप महत्त्व दिल गेल आहे. असं का? याला उत्तर नाही. पण अगदी देवादिकांपासून आताच्या चित्रपटातील नट्यांपर्यंत आपण सर्वांमधे हे सौंदर्यच शोधत आलोय. या सौंदर्याची आपली व्याख्या सुद्धा किती विचित्र असते! गोरा वर्ण, लांब नाक, टप्पोरे डोळे आणि अजुन बरचस.
          अस सौंदर्य आपल्या आयुष्यात एवढं महत्वाच झालं आहे की प्रत्येक जण आज स्वत:च सौंदर्य टिकवण्याच्या मागे धावतो आहे. असं सौंदर्य जपण्याच वेड स्त्रियांमधे जास्त असत. काही स्त्रिया या जन्मजातच गोऱ्या - नाकीडोळी छान असतात. या स्त्रियांना समाजाकडून, नातेवाईकांकडून सतत स्तुती ऐकून घेण्याची सवय झालेली असते. त्यामुळे आपल सौंदर्य वाढत्या वया बरोबर सुद्धा अबाधित ठेवण्यासाठी अट्टाहासाने सौंदर्यावर वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांचा भडिमार केला जातो. डायट प्लान्स केले जातात (प्लास्टिक सर्जरी सारख्या शस्त्रक्रिया सर्वाना परवडतील अशा अजुन नाहीत).
         या सगळ्या स्पर्धेत ज्या स्त्रीया दिसायला सामान्य आहेत. काळ्या-सावळ्या आहेत अशांच्या मनात आपण बाकी स्त्रियांपेक्षा कमी आहोत, आपल्यात काही तरी कमतरता आहे असा न्यूनगंड तयार होत जातो. कळत नकळत अशा स्त्रियांना त्यांच्या दिसण्यावरुन बोलल जात. अगदी मुलगी बघायला आल्यावर सुद्धा मुलगी गोरीच आहे ना अस बघितल जात. त्यामुळे अशा मूली किंवा स्त्रीया सुंदर दिसण्यासाठी सौंदर्यप्रसाधनांच्या आहारी जातात. आत्ताच्या घडीला दाखवल्या जाणाऱ्या सगळ्याच सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती मधे, आमच्या उत्पादनाने तुम्ही कसे गोरे व्हाल हेच सांगितले जाते. कारण आपल्या समाजात सौंदर्याला किती महत्त्व आहे हे ते सुद्धा जाणून असतात.
          पण या सगळ्याची गरज आहे का? यामुळे खरच आपला रंग बदलता येईल का? असा साधा प्रश्न का पडत नसेल कोणाला? मी आहे तशी आहे. आणि समाजाने सुद्धा माला तसच बघावं असा विचार का नाही पुढे येत?
        याला आपला समाज कारणीभूत आहे असच चित्र समोर येत. लहानपणा पासून आपण बघतो की एखाद्याला त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या रंगावरुन चेष्टेने का होईना पण हिनवल जात. मालिका-चित्रपटांमधील नायिका नेहमीच सुंदर गोऱ्याच दाखवल्या जातात. काळी सावळी नायिका बघायला आपल्याला रुचत नाही. इतकंच नाही तर, "गोरी-गोरीपान, फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी आण" अस गाण आपल्याकडे गाजत. लहान मुलांच्या अंकलिपी मधे सुद्धा 'कमल सुंदर दिसते' अशी वाक्य सर्रास दिसतात. म्हणजे हे सौंदर्याच वेड आपल्यात लहानपणा पासून रुजवल आणि वाढवल जात असत का?
खरच सगळ्याच दादांना गोरी गोरी बायको भेटत असते का? असा प्रश्न गाण एकताना किती जणांना पडत असेल? आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यातच सौंदर्याला एवढं महत्त्व आहे, तर मग या मोठ्या नायक-नायिकांच्या आयुष्यात स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी त्यांना आपली सुंदरता टिकवून ठेवायला आपल्या पेक्षा जास्तच शस्त्रक्रिया कराव्या लागत असणार! यामुळेच तर या नायिका लाखोंच्या दिलावर राज्य करतात.
एखाद्या स्त्रीच वर्णन करताना किती सहज आपण तिला 'इंद्राच्या दरबारातली अप्सरा' असं म्हणून जातो. म्हणजे मग देवाला सुद्धा सौंदर्यासक्ति होती का? तस होत तर माणूस निर्माण करताना त्याने सगळ्यांना छान, गोरच का नाही घडवल?
मी आहे तसा/तशी आहे. कधीतरी कालांतराने माझ सौंदर्य बदलेल. मी म्हातारी होईल. असा विचार सगळ्यांनी केला तर नक्कीच सगळ सोप्प होईल. पण समाजाची अशी मानसिकता व्हायला मोठा काळ लोटावा लागेल. तोपर्यंत सौंदर्याच्या आगीत सामान्य दिसणाऱ्या स्त्रीया जळत रहातील एवढं नक्की.