Tuesday, 8 March 2022
'तो इन मर्दो को किस बात का गुरुर?’
‘सर्व स्तरांतील महिलांचे प्रश्न सारखेच असतात, असं म्हणून सगळ्याच महिलांना तू एकाच पारड्यात कसं बसवते?’ हा प्रश्न काही वर्षांपूर्वी मला माझ्या ‘व्हायवा’च्या वेळी विचारला गेला होता. आज अडीच-तीन वर्षं उलटून गेल्यावरही या प्रश्नाचं वेगळं काही उत्तर मला सापडत नाही. आर्थिक परिस्थितीवरून किंवा शैक्षणिक पात्रतेवरून महिलांचं होणारं दमन वेगळं आहे, किंवा ती शिकली म्हणून पूर्ण स्वतंत्र झाली, असं अजून तरी कुठे बघायला मिळालेलं नाही.
दरवर्षी ‘जागतिक महिला दिन’ जवळ आल्यावर महिलांचा उदोउदो करण्यासाठी सज्ज झालेल्या अनेकांना पाहून मला पुन्हा हा प्रश्न आठवतो आणि जाणवते ती पुरुषी विचारांनी, पुरुषप्रधान संस्कृतीने कुठे न कुठे फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी बाईची केलेली गळचेपी. अशी घुसमट, गळचेपी अनादी काळापासून थोड्याफार फरकानं सारखीच असल्याचे दिसते. यासाठी ‘महाभारता’तील द्रौपदीचं उदाहरण पाहता येईल. लग्नानंतर पाच पुरुषांचा पती म्हणून तिला स्वीकार करायला लावताना जसा तिच्या भावनांचा विचार केला गेला नाही, तसाच सारीपाटात तिची बाजी लावतानाही केला गेला नाही. पुढे झालेले वस्त्रहरणसुद्धा स्त्री उपभोगाची आणि विजय मिळवण्याची ‘वस्तू’ समजूनच झाले.
आज काळाबरोबर चांगली नोकरी, उत्तम पगार, घरची श्रीमंती हे सगळं अनेकींना मिळालं आहे. पण नोकरी करायला मिळाली, घरी आर्थिक सुबत्ता आली, म्हणजे आपण स्वतंत्र झालो, हा विचार किती केविलवाणा आहे! तसं पाहता, स्वत:च्या नोकरीतली बढती घ्यायची की नाही, किंवा नव्या नोकरीतून आलेली संधी स्वीकारायची की नाही, हे किती महिला घरातल्या पुरुषांना न विचारता ठरवू शकतात? किंवा अविवाहित, घटस्फोटीत, एकट्या राहणाऱ्या किती महिलांचा समाजाकडून सहज स्वीकार केला जातो, हे वेगळ सांगायला नको!
पुरुषाशिवाय महिलांचं वेगळं अस्तित्व आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीकडून कायम नाकारलं गेलं आहे. पण मुळातच बारकाईनं अभ्यास केला तर लक्षात येतं की, फक्त काही सामाजिक आणि शारीरिक गरजेपोटी बाईलाही पुरुष आयुष्यात हवे असतात. मात्र हा कमीपणा मान्य नसल्यानं पुरुषांकडून तिला निसर्गत:च मिळालेलं श्रेष्ठत्व बळाचा वापर करून दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो.
याचं अजून एक उदाहरण म्हणजे अगदी औरंगाबादसारख्या स्मार्ट सिटी बनू पाहणाऱ्या शहरातही माझ्यासारख्या एकट्या मुलीला राहण्यासाठी घर मिळणं दुरापास्त होतं. हा अर्थात केवळ माझा एकटीचाच अनुभव नसून माझ्यासारख्या एकटीनं नोकरीसाठी मोठ्या शहरात राहणाऱ्या अनेकींचा अनुभव आहे. ‘एकटी मुलगी राहणार’ या विचारानेच अनेक पुरुष आपले कैवारी बनतात. शिवाय एकटी मुलगी म्हणून बदलणाऱ्या सूचक, बोचऱ्या नजरांनाही कित्येक वेळा सामोरं जावं लागतं. ‘ती एकटी काही करू शकत नाही. कमावते, नोकरी करते म्हणून काय झालं, आमच्या मदतीची तिला गरज पडेलच’, हे विचार तर न संपणारे.
पण लॉकडाऊनच्या काळात जेव्हा पुरुष घरात बसून होते, तेव्हा अनेक ठिकाणी महिलांनी घराचा आर्थिक भार कणखरपणे सांभाळला. या काळात सर्वाधिक अत्याचार महिलांवरच झाल्याचे अनेक सर्वेक्षणांतून समोर येऊनही कुठेच न डगमगता खंबीरपणे उभ्या राहिलेल्या या स्त्री जातीला खरंच पुरुषी आधाराची किती गरज असणार आहे!
घरातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. उच्चशिक्षित, लाखोंनी पैसा कमावणाऱ्या महिलांना ‘बाहेरचं जग वाईट आहे, त्याची तुला कल्पना नाही’, हे वाक्य प्रेमाचा टॅग लावून का होईना ऐकवलं गेलं नाही, अशा महिला बोटावर मोजण्याइतक्याच सापडतील. हेच सगळं कमी शिकलेल्या, नोकरी न करता घर सांभाळणाऱ्या महिलांच्या बाबतीतही होतं. मग कोणत्या वर्गातली महिला स्वातंत्र्य उपभोगताहेत असं म्हणायचं?
मुळातच ही जी मोडकीतोडकी मोकळीक मिळाली, त्याला स्वातंत्र्य तरी म्हणता येईल का? तिने सोशिक, समंजस असावं, प्रेमात आणि संसारात जे त्याग करावे लागतील, ते तिनेच करायचे असतात, हेच संस्कार कायम माझ्यासारख्या अनेकींवर पूर्वीपासून होत आले. त्यामुळे मनाला पटत नसतानाही तोंडातून ‘ब्र’सुद्धा न काढता महिला सहज पडती बाजू घेतात. हे औदार्य पुरुषांमध्ये मात्र फारच कमी दिसतं. उलट स्वत:च्या पराभवाचं खापरही अनेक पुरुष घरातील बाईच्या माथी टाकून मोकळे झालेले दिसतात.
दुसरा मुद्दा अत्यंत संवेदनशील आणि क्वचित बोलला जाणारा आहे. खरं तर स्त्रिया जात्याच स्वभावानं फार हळव्या असतात. त्यामुळे जे बाहेरच्या जगात मिळत नाही, ते प्रेम, स्वातंत्र्य, आदर त्या आपल्या जोडीदारात शोधतात. काही अंशी त्यांना ते मिळत असलं तरी चार भिंतीतही जोडीदारासोबत कितपत मोकळ व्हायचं यालाही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. किमान भारतात तरी! त्यामुळेच अजूनही स्वत:च्या लैंगिक भावनांबद्दल बोलण्याचं धारिष्ट्य स्त्रिया करत नाहीत. आपण खूष नाही, हे कळालं की, जोडीदार रागवेल किंवा चांगल्या घरातल्या बायका ‘तसल्या’ भावना बोलून दाखवत नाहीत वगैरे वगैरे. आणि जर बोलून दाखवलंच तरी तिच्या इच्छेचा, अपेक्षेचा किती विचार केला जातो?
आपल्याला जसं जगावंसं वाटत, तसं जमत नसलं तरी, ‘मला असं वाटतं..’, हे सांगणं आजही महिलांना जमत नाही. स्वत:च्या भावना सांगतानाही घाबरणाऱ्या महिला मग समोरच्याचा अंदाज घेत; अंधारात चाचपडत जगत राहतात. मात्र ज्या अशा विषयाला तोंड फोडून खऱ्या स्त्री-मुक्तीची विचारधारा पेरण्याचा प्रयत्न करत, स्वत:च्या मनानं जगण्याचं धारिष्ट्य दाखवतात, त्यांना ही पुरुषी व्यवस्था ‘समाजविघातक’ ठरवून मोकळी होते. याची अनेक उदाहरणं बघायला मिळतात.
‘शक्ती, संपत्ती और सदबुद्धी ये तिनो औरतें हैं, तो इन मर्दो को किस बात का गुरुर?’ अशी स्त्रियांची महती सांगणारा ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमामधला आलिया भटचा एक संवाद सध्या सगळीकडे चर्चेत आहे. खरं तर स्त्री-स्वातंत्र्याचा सगळा मुद्दाच ‘मर्द का गुरुर’, ‘पुरुषी अहंकार’ यावर टिकून आहे. जिथं आपल्या अहंकाराला धक्का बसणार नाही, तेवढंच स्वातंत्र्य या पुरुषसत्ताक समाजानं महिलांना देऊ केलं आहे. पुरुषांमध्ये महिलांना काबुत ठेवण्याची लालसा, हाव तयार होते, ती या अहंकारामुळेच.
गंमत म्हणजे, मी माझ्या बायकोला, मुलीला, प्रेयसीला हवं तसं वागण्याची मोकळीक दिली आहे, हे सांगतानाही पुरुष आपला अहंकार कुरवाळत असतो! आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीकडून जोवर हा अहंकार गोंजारला जातो, तोवरच तीला त्याच्याकडून स्वातंत्र्य मिळतं. एकदा तो दुखावला गेला की, त्याची जागा ‘पुरुषी विकृती’ घ्यायला लागते. या विकृतीचे परिणाम आपण आपल्या आजूबाजूला रोज बघतो. या सगळ्यावर समाजमाध्यमांचाही खूप पगडा असलेला दिसतो.
वर्षातून एकदा ‘जागतिक महिला दिनी’ तिच्या कामाचं, कर्तृत्वाचं, बाईपणाचं कोडकौतुक करून तीला मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव करून देणं, याला ‘पुरुषी अहंकार’ सुखावण्याचाच भाग म्हटला तर खोटं ठरणार नाही. मात्र यात वाईट काही असेल तर ते हे की, महिलांना हे आभासी स्वातंत्र्यच खरं वाटून याची भुरळ पडते. या आभासी पुढारलेपणाच्या पांघरुणाखाली मिळणाऱ्या स्वातंत्र्यात अजून किती काळ त्यांना आपलं अस्तित्व शोधावं लागणार आहे, कोण जाणे!
Monday, 8 March 2021
"बये, महामाये, आता तरी ओळख स्वत:ला.."
Sunday, 17 May 2020
टिक-टॉक, पबजी व्हाया बेरोजगारी
Saturday, 7 March 2020
शक्तींचा विसर की पराक्रमाची गाथा
Wednesday, 8 January 2020
विद्यापीठ नावाच बेट
'ती'चं अस्तित्व
Monday, 17 June 2019
स्त्री अध्यासन केंद्रांची केविलवानी दशा..
विद्यापीठ स्तरावर शिकायला आल्यानंतर माझ्यासारख्या अनेकांना नवनवीन दरवाजे उघडले जात असतात. काही गोष्टी नव्याने समोर येतात तर काही वेळा जुन्याच गोष्टी वेगळ्या धाटणीने पुढे येऊन उभ्या राहतात. चार वर्षांपूर्वी पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादमध्ये आले तेव्हा अशाच काही गोष्टी नव्याने समोर येत गेल्या.त्यातलीच एक म्हणजे स्त्री शिक्षणासारख काही तरी विद्यापीठ स्तरावर शिकवल जात असत हे त्यावेळी पहिल्यांदाच समजलं होत. त्यामुळे अर्थातच त्याबद्दल उत्सुकता अधिक होती. पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्या नंतर इतर वर्गमित्र नेट-सेट, एम.फील सारख्या पुढच्या शिक्षणाची तयारी करीत असतानाच मी या स्त्री अध्यसन केंद्रात माझ्या द्वितीय पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि आज जेव्हा या स्त्री अध्यसन केंद्रातले शिक्षण पूर्ण करून मी मागील दोन वर्षात इथे काय शिकले किंवा माझ्या 'स्व'त्वाची ओळख मला या केंद्रात होऊ शकली का? या प्रश्नांचा आढावा घेताना सर्वांनाच विचार करायला लावतील अशा गोष्टी समोर आल्या.
प्रवेश घेतल्या नंतर पहिल्या काही दिवसातच एक गोष्ट इथे प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे अशी की इथे प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा 'स्त्रीवादी' असावा लागतो. (मी स्वत:ला स्त्रीवादी म्हणवून घेत नाही हे इथे नमूद करायलाच हवे.) त्यामुळे या केंद्रात वावरतांना मी स्त्रीवादी आहे का ? किंवा माझी स्त्रीवादाची नेमकी व्याख्या काय हे मला इथल्या शिक्षिकांना किंवा वर्गमैत्रिणींना कधीच नीटसे समजावून सांगता आले नाही. त्यांच्या आणि माझ्या स्त्रिवादात मला फार मोठी तफावत जाणवायला लागली आणि मग मी नेमक या केंद्रात काय शिकतेय किंवा माझ्या मनावर कोणते परिणाम इथे केले जाताय याचा सखोल विचार करण्याची वेळ आली असल्याचे सारखे वाटू लागले. आधीच विद्यार्थ्यांची संख्या कमी असलेल्या या केंद्रात कालांतराने विद्यार्थ्यांची संख्या अधिकच रोडावत गेली. अस का व्हावं ? असा प्रश्न हा अभ्यासक्रम शिकत असताना कायम पडत राहिला. कदाचित या मागच्या अनेक कारणांपैकी एक कारण हे इथे ब्राम्हणेत्तर जातींवर इथे अधिक भर दिले गेलेला असल्यामुळे सवर्ण मुलींची संख्या इथे कमी दिसून आली हे ही असू शकते. मग ही परिस्थिती फक्त याच विद्यापीठाची आहे की जिथे जिथे हे केंद्र चालविले जाते तिथे पण अशीच उदासीनता आहे असा धक्कादायक विचार सुद्धा मनात डोकावला.
इथे शिकायला सुरुवात केल्या नंतर दुसरी गोष्ट लक्षात आली ती इथल्या शिक्षक वर्गाबद्दल. इथे पुरूषांना प्रवेश निषिद्ध असल्यासारख सर्व शिक्षिकाच भरती केल्या गेलेल्या होत्या. सर्व स्त्रियाच एका जागी आल्यामुळे केंद्रात सगळा आनंदी आनंदच असल्याचे वेगळे सांगायला नको. इथे शिकवला जाणारा अभ्यासक्रम बदलण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे इथे शिकत असताना प्रकर्षाने जाणवत होते. 2000 पूर्वीचा काळ हा स्त्रियांसाठी त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्षाचा होता यात कुठलेच दुमत नसेल. परंतु आज जेव्हा स्त्रिया उच्च पदावर कार्यरत आहेत आणि त्यांना आपल्या हक्कांची जाणीव बर्यापैकी झालेली असताना त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचे सोडून भूतकाळात झालेले अन्याय अत्त्याचार कुरवाळत बसत तेच अभ्यासक्रमातून शिकवून सर्व पुरूषांना हलकट, अत्त्याचारी, आणि वासनाधीन ठरवणे खरच कितपत योग्य ठरू शकते? बर सगळेच पुरुष वाईट म्हणायचे तर आपल्या आजूबाजूला वावरणारे आपले वडील, भाऊ, मित्र हे सगळेच वाईट आहेत का? आणि आज स्त्रियांसाठी झालेले एवढे कायदे आहेत की स्वत: स्त्रियाच आपल्यावर होणारा अन्याय आज निमूटपणे सहन करीत नाहीत. स्त्रियांवर आजही होणारे बलात्कार आणि त्यांचा काही प्रमाणात होणारा छळ मला नाकारायचाच नाही. पण आता खेड्यातल्या स्त्रियासुद्धा आपल्या हक्कांविषयी एवढ्या जागरूक झालेल्या असताना अजूनही पुरुष हा अत्त्याचारी आणि स्त्री ही दुर्बल घटक असल्याने तिला सर्व सहन करावे लागते हेच का अशा केंद्रांमधून शिकवले जात असावे. त्यात सुद्धा इतिहासाच्या आणि त्यावेळच्या स्त्रियांवरील अत्त्याचाराच्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवताना इथे आगरकर, कर्वे, वि.रा.शिंदे, सानेगुरूजी, भाऊराव पाटील अशा अनेकांनी केलेले कार्य कायम उपेक्षितच ठेवले गेले. त्यापेक्षा आज आपल्या पायावर उभ्या राहू बघणार्या स्त्रियांसाठी आपल्याला काय करता येईल, त्यांना अधिक प्रोत्साहन कसे देता येईल, किंवा आपल्यावर अन्याय होतो आहे हे समजून ज्या स्त्रियांना त्याविरुद्ध आवाज उठवता येत नाही त्यांच्यासाठी माझ्या सारख्या शिकलेल्या मुली काय करू शकतील हे व्यावहारिक शिक्षण या केंद्राच्या मार्फत दिले तर त्याचा अधिक फायदा होणार आहे हे आपल्या शिक्षण व्यवस्थेला कधी समजेल? मिळणार्या सवलतींचा गैरवापर करणार्या स्त्रियासुद्धा आज समाजात वाढत असताना आपल्याला अजून अभ्यासक्रमात तिच्यावर 1857 मध्ये झालेला अत्त्याचारच शिकवला जावा ही किती दुर्दैवी गोष्ट म्हणायची? स्त्रीवाद आणि स्त्री सबलिकरनाच्या नावाखाली हा कोणता स्त्रीवाद आपण विद्यार्थ्यांना शिकवत आहोत याच उत्तर तिथल्या शिक्षिकांनासुद्धा देत येणार नाही. पुन्हा शिक्षिकांचा उल्लेख आल्याने इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो तो म्हणजे स्त्री विषयी तिच्या समस्ये विषयी पुरुष किंवा एखादा शिक्षक शिकवू शकत नाही का ? की पुरुषाने स्त्रीविषयी काही बोलावे हेच आपल्याला मान्य नाही?
प्रवेश परीक्षेच्या वेळी मुलांना आलेले बघून एका मैत्रिणीने मला प्रश्न विचारला, ''मूलं स्त्री अध्यासन केंद्रात शिकून काय करणार, त्यांचं काय काम इथे ? त्यांना काय समजतं मुलींच्या विषयी''? म्हणजे स्त्री प्रश्न, त्यांच्या समस्या, स्त्रीयांचे जीवन या पासून पुरूषांना आपणच अस लांब ठेवायच आणि मग त्यांना यातलं काय समजत, त्यांना स्त्री जीवन समजत नाही म्हणून ते त्यांच्यावर अत्त्याचार करतात अशी उलटी टीका करायची याला काय म्हणायच ? आपण दुर्लक्षिलो जात आहोत, आपले सुद्धा काही प्रश्न आहेत, आपण सुद्धा माणूस आहोत याची जाणीव दुसर्यांना करूनच दिली नाही तर आपल्या अस्तित्वाची जाणीव समाजाला कशी होईल? हे सगळ समजून न घेता बेंबीच्या देठापासून ओरडत समानतेच्या चर्चा करणार्या या स्त्रिया सार्वजनिक ठिकाणी आपण स्त्री आहोत म्हणून आपल्याला सवलत मिळावी अशी अपेक्षा का ठेवतात ? अशी वस्तुस्थिती असताना मागील दोन वर्ष मी स्त्री अध्यासन केंद्रात स्त्रियांचे दुबळेपन आणि त्यांच्यावर झालेले अत्त्याचार हेच अभ्यासल ही शोकांतिका आहे. ज्या व्यावहारिक ज्ञान मिळविण्याच्या आणि इतर लाजर्या-बुजर्या स्त्रियांच्या कामी येण्याच्या हेतूने या स्त्री अध्यासन केंद्रात प्रवेश घेतला होता तो या दोन वर्षात कुठेच साध्य झाला नाही याचे दु:ख वाटते. कारण विद्यापीठ स्तरावर शिकायला येणार्या प्रत्येक मुलीला आपल्या हक्कांची जाणीव ही फार आधीच झालेली असते. त्यामुळे 'तुमच्यावर अन्याय होतो' हेच पुन्हा त्यांना शिकवणे योग्य आहे का याचा विचार या अध्यासन केंद्राच्या शिक्षकांनी आता करायला हवा. माझ्या या स्पष्ट मतांमुळे अनेक अशाच अत्त्याचाराचे टेंभे मिरवणार्या आणि स्वत:ला स्त्रीवादी म्हणवून घेणार्यांची मने दुखावली गेली असली तरी येणार्या काळात सुद्धा जर या स्त्री अध्यसन केंद्रांची स्थिती अशीच राहिली तर किती काळ ही केंद्रे तग धरून राहू शकतील हा गहन प्रश्न आहे.