Monday 17 June 2019

स्त्री अध्यासन केंद्रांची केविलवानी दशा..

         विद्यापीठ स्तरावर शिकायला आल्यानंतर माझ्यासारख्या अनेकांना नवनवीन दरवाजे उघडले जात असतात. काही गोष्टी नव्याने समोर येतात तर काही वेळा जुन्याच गोष्टी वेगळ्या धाटणीने पुढे येऊन उभ्या राहतात. चार वर्षांपूर्वी पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादमध्ये आले तेव्हा अशाच काही गोष्टी नव्याने समोर येत गेल्या.त्यातलीच एक म्हणजे स्त्री शिक्षणासारख काही तरी विद्यापीठ स्तरावर शिकवल जात असत हे त्यावेळी पहिल्यांदाच समजलं होत. त्यामुळे अर्थातच त्याबद्दल उत्सुकता अधिक होती. पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्या नंतर इतर वर्गमित्र नेट-सेट, एम.फील सारख्या पुढच्या शिक्षणाची तयारी करीत असतानाच मी या स्त्री अध्यसन केंद्रात माझ्या द्वितीय पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि आज जेव्हा या स्त्री अध्यसन केंद्रातले शिक्षण पूर्ण करून मी मागील दोन वर्षात इथे काय शिकले किंवा माझ्या 'स्व'त्वाची ओळख मला या केंद्रात होऊ शकली का? या प्रश्नांचा आढावा घेताना सर्वांनाच विचार करायला लावतील अशा गोष्टी समोर आल्या.
        प्रवेश घेतल्या नंतर पहिल्या काही दिवसातच एक गोष्ट इथे प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे अशी की इथे प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा 'स्त्रीवादी' असावा लागतो. (मी स्वत:ला स्त्रीवादी म्हणवून घेत नाही हे इथे नमूद करायलाच हवे.) त्यामुळे या केंद्रात वावरतांना मी स्त्रीवादी आहे का ? किंवा माझी स्त्रीवादाची नेमकी व्याख्या काय हे मला इथल्या शिक्षिकांना किंवा वर्गमैत्रिणींना कधीच नीटसे समजावून सांगता आले नाही. त्यांच्या आणि माझ्या स्त्रिवादात मला फार मोठी तफावत जाणवायला लागली आणि मग मी नेमक या केंद्रात काय शिकतेय किंवा माझ्या मनावर कोणते परिणाम इथे केले जाताय याचा सखोल विचार करण्याची वेळ आली असल्याचे सारखे वाटू लागले. आधीच विद्यार्थ्यांची संख्या कमी असलेल्या या केंद्रात कालांतराने विद्यार्थ्यांची संख्या अधिकच रोडावत गेली. अस का व्हावं ? असा प्रश्न हा अभ्यासक्रम शिकत असताना कायम पडत राहिला. कदाचित या मागच्या अनेक कारणांपैकी एक कारण हे इथे ब्राम्हणेत्तर जातींवर इथे अधिक भर दिले गेलेला असल्यामुळे सवर्ण मुलींची संख्या इथे कमी दिसून आली हे ही असू शकते. मग ही परिस्थिती फक्त याच विद्यापीठाची आहे की जिथे जिथे हे केंद्र चालविले जाते तिथे पण अशीच उदासीनता आहे असा धक्कादायक विचार सुद्धा मनात डोकावला.
        इथे शिकायला सुरुवात केल्या नंतर दुसरी गोष्ट लक्षात आली ती इथल्या शिक्षक वर्गाबद्दल. इथे पुरूषांना प्रवेश निषिद्ध असल्यासारख सर्व शिक्षिकाच भरती केल्या गेलेल्या होत्या. सर्व स्त्रियाच एका जागी आल्यामुळे केंद्रात सगळा आनंदी आनंदच असल्याचे वेगळे सांगायला नको. इथे शिकवला जाणारा अभ्यासक्रम बदलण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे इथे शिकत असताना प्रकर्षाने जाणवत होते. 2000 पूर्वीचा काळ हा स्त्रियांसाठी त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्षाचा होता यात कुठलेच दुमत नसेल. परंतु आज जेव्हा स्त्रिया उच्च पदावर कार्यरत आहेत आणि त्यांना आपल्या हक्कांची जाणीव बर्‍यापैकी झालेली असताना त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचे सोडून भूतकाळात झालेले अन्याय अत्त्याचार  कुरवाळत बसत तेच अभ्यासक्रमातून शिकवून सर्व पुरूषांना हलकट, अत्त्याचारी, आणि वासनाधीन ठरवणे खरच कितपत योग्य ठरू शकते? बर सगळेच पुरुष वाईट म्हणायचे तर आपल्या आजूबाजूला वावरणारे आपले वडील, भाऊ, मित्र हे सगळेच वाईट आहेत का? आणि आज स्त्रियांसाठी झालेले एवढे कायदे आहेत की स्वत: स्त्रियाच आपल्यावर होणारा अन्याय आज निमूटपणे सहन करीत नाहीत. स्त्रियांवर आजही होणारे बलात्कार आणि त्यांचा काही प्रमाणात होणारा छळ मला नाकारायचाच नाही. पण आता खेड्यातल्या स्त्रियासुद्धा आपल्या हक्कांविषयी एवढ्या जागरूक झालेल्या असताना अजूनही पुरुष हा अत्त्याचारी आणि स्त्री ही दुर्बल घटक असल्याने तिला सर्व सहन करावे लागते हेच का अशा केंद्रांमधून शिकवले जात असावे. त्यात सुद्धा इतिहासाच्या आणि त्यावेळच्या स्त्रियांवरील अत्त्याचाराच्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवताना इथे आगरकर, कर्वे, वि.रा.शिंदे, सानेगुरूजी, भाऊराव पाटील अशा अनेकांनी केलेले कार्य कायम उपेक्षितच ठेवले गेले. त्यापेक्षा आज आपल्या पायावर उभ्या राहू बघणार्‍या स्त्रियांसाठी आपल्याला काय करता येईल, त्यांना अधिक प्रोत्साहन कसे देता येईल, किंवा आपल्यावर अन्याय होतो आहे हे समजून ज्या स्त्रियांना त्याविरुद्ध आवाज उठवता येत नाही त्यांच्यासाठी माझ्या सारख्या शिकलेल्या मुली काय करू शकतील हे व्यावहारिक शिक्षण या केंद्राच्या मार्फत दिले तर त्याचा अधिक फायदा होणार आहे हे आपल्या शिक्षण व्यवस्थेला कधी समजेल? मिळणार्‍या सवलतींचा गैरवापर करणार्‍या स्त्रियासुद्धा आज समाजात वाढत असताना आपल्याला अजून अभ्यासक्रमात तिच्यावर 1857 मध्ये झालेला अत्त्याचारच शिकवला जावा ही किती दुर्दैवी गोष्ट म्हणायची? स्त्रीवाद आणि स्त्री सबलिकरनाच्या नावाखाली हा कोणता स्त्रीवाद आपण विद्यार्थ्यांना शिकवत आहोत याच उत्तर तिथल्या शिक्षिकांनासुद्धा देत येणार नाही. पुन्हा शिक्षिकांचा उल्लेख आल्याने इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो तो म्हणजे स्त्री विषयी तिच्या समस्ये विषयी पुरुष किंवा एखादा शिक्षक शिकवू शकत नाही का ? की पुरुषाने स्त्रीविषयी काही बोलावे हेच आपल्याला मान्य नाही?
      प्रवेश परीक्षेच्या वेळी मुलांना आलेले बघून एका मैत्रिणीने मला प्रश्न विचारला, ''मूलं स्त्री अध्यासन केंद्रात शिकून काय करणार, त्यांचं काय काम इथे ? त्यांना काय समजतं मुलींच्या विषयी''? म्हणजे स्त्री प्रश्न, त्यांच्या समस्या, स्त्रीयांचे जीवन या पासून पुरूषांना आपणच अस लांब ठेवायच आणि मग त्यांना यातलं काय समजत, त्यांना स्त्री जीवन समजत नाही म्हणून ते त्यांच्यावर अत्त्याचार करतात अशी उलटी टीका करायची याला काय  म्हणायच ? आपण दुर्लक्षिलो जात आहोत, आपले सुद्धा काही प्रश्न आहेत, आपण सुद्धा माणूस आहोत याची जाणीव दुसर्‍यांना करूनच दिली नाही तर आपल्या अस्तित्वाची जाणीव समाजाला  कशी होईल? हे सगळ समजून न घेता बेंबीच्या देठापासून ओरडत समानतेच्या चर्चा करणार्‍या या स्त्रिया सार्वजनिक ठिकाणी आपण स्त्री आहोत म्हणून आपल्याला सवलत मिळावी अशी अपेक्षा का ठेवतात ? अशी वस्तुस्थिती असताना मागील दोन वर्ष मी स्त्री अध्यासन केंद्रात स्त्रियांचे दुबळेपन आणि त्यांच्यावर झालेले अत्त्याचार हेच अभ्यासल ही शोकांतिका आहे. ज्या व्यावहारिक ज्ञान मिळविण्याच्या आणि इतर लाजर्‍या-बुजर्‍या स्त्रियांच्या कामी येण्याच्या हेतूने या स्त्री अध्यासन केंद्रात प्रवेश घेतला होता तो या दोन वर्षात कुठेच साध्य झाला नाही याचे दु:ख वाटते. कारण विद्यापीठ स्तरावर शिकायला येणार्‍या प्रत्येक मुलीला आपल्या हक्कांची जाणीव ही फार आधीच झालेली असते. त्यामुळे 'तुमच्यावर अन्याय होतो' हेच पुन्हा त्यांना शिकवणे योग्य आहे का याचा विचार या अध्यासन केंद्राच्या शिक्षकांनी आता करायला हवा. माझ्या या स्पष्ट मतांमुळे अनेक अशाच अत्त्याचाराचे टेंभे मिरवणार्‍या आणि स्वत:ला स्त्रीवादी म्हणवून घेणार्‍यांची मने दुखावली गेली असली तरी येणार्‍या काळात सुद्धा जर या स्त्री अध्यसन केंद्रांची स्थिती अशीच राहिली तर किती काळ ही केंद्रे तग धरून राहू शकतील हा गहन प्रश्न आहे.