Monday 8 March 2021

"बये, महामाये, आता तरी ओळख स्वत:ला.."


जागतिक महिलादिना निमित्त दै.देशोन्नतीच्या टीमने वेगळी, हटके स्टोरी करायची ठरवली त्यावेळी तळागाळातल्या स्त्रीयांना आणि त्यांच्या कामाला आपण वाचकांसमोर आणवं अस एकमताने ठरलं. कारण नेहेमीच्या त्याच त्या स्टोरी सगळेच कव्हर करणार, महिलांविषयीचे एका दिवसाचे उमाळे सगळ्यांनाच येणार हे अलिखित नियम तयार झालेले आहेत. 
वरवर बघता हि संकल्पना फार साधी आणि सोप्पी वाटली. कारण शहरात अनेक स्त्रीया या छोटे - मोठे व्यवसाय करतांना दिसतात. कोणी आर्थिक अडचणींमुळे करतं तर कोणी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी काम करत, कोणाला स्वावलंबी व्हायचं असतं.. त्यामुळे अशा महिला शोधणं तस काही अवघड काम नव्हत. भाजी विक्रेता, घरकाम करणाऱ्या स्त्रीया, सफाई कामगार, बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या मजुर स्त्रीया अशा अनेक महिला आपल्या आजुबाजुला बघायला मिळतात. त्यामुळे या सगळ्यांचे अनुभव छापून आणायचं हे तेवढं काही अवघड काम वाटलं नाही (किमान मला तरी). पण जसजसं मी या सगळ्या महिलांना भेटायला लागले, त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करू लागले तस मला हा सगळा गुंता असल्याचं जाणवायला लागलं. असा गुंता जो सहज सुटणार नाही आणि मग लक्षात आलं की जिथं मी आणि माझ्या सारखे अनेक जण जागतिक महिला दिनाच्या उत्साहात वेगवेगळे कार्यक्रम आखत आहे, या दिवशी जिथं तिथं महिलांच्या कर्तबगारीची उदोउदो केला जाणार आहे; तिथं या अगदीच तळागाळातल्या महिलांना महिला दिन अस काही असतं हेच माहीत नाही... खरतर या काळात माहिती संकलन करतांना अनेक महिला भेटल्या. त्यात कोणी पहाटे सायकलवर पेपर विक्रीचा व्यवसाय करते, तर कोणी छोटी टपरी वजा हॉटेल चालवुन घरच्यांच पोट भरते. कोणी घरोघरी जाऊन लोकांचे धुणे-भांडे करून नवऱ्याला हातभार लावतांना दिसल, एक ना अनेक वेगवेगळी कामं या स्त्रिया करत होत्या.. पण कामं वेगळी असली तरी एक धागा यात समान होता.. एकच अशी गोष्ट जी या सगळ्यांना एकत्र जोडते. ती म्हणजे या सगळ्या महिला स्वत: कमावत असून, स्वतःच्या पायावर उभ्या असूनही त्या प्रत्येकीवर एक बंधन होतं. कुठे नवऱ्याच, कुठे मुलाच, त्यांच्या आयुष्यातल्या कोणत्या ना कोणत्या पुरूषाच्या बंधनाखाली त्या जगत आहेत याचा अनुभव आला आणि त्यामुळे आपण करत असलेल्या कामाविषयी सांगायची किंवा त्या विषयी बोलायची, छायाचित्र देण्याची यातल्या एकीनेही हिंम्मत केली नाही. प्रत्येक वेळी "यांना (नवऱ्याला) विचारून सांगते", "मुलाला विचारते मग देते माहिती", "नको, घरच्या माणसांना आवडणार नाही" अशीच उत्तरं मिळायला लागली. म्हणजे जर घरातला पुरुष मग तो नवरा असेल वा मुलगा त्याने जर संमती दिली तरच त्या माझ्याशी बोलायला तयार होत्या! हे का? तर ती "बाई" नाही का...! ती "बाईची जात" आहे. तिला स्वतःच चांगलं वाईट कुठं कळत, तिच्यासाठी काय योग्य आहे हे ठरवायचा बगडा घरातल्या पुरुषांनी नसतो का उचललेला..? मग तीने कोणाशी बोलावं, कोणाला काय सांगाव हे पण 'तो'च ठरवणार; भले मग ती स्वतः का नोकरीधंदा करत असेना.. सगळीकडेच हे दृश्य दिसल्यावर वाटलं की महिला दिनासाठी मुलाखत देण्याचंही स्वातंत्र्य ज्या बाईला नाही, तिने कोणाशी बोलावं हेही जिथे अजून पुरुषच ठरवत आहेत, तिथे कोणता महिला दिन या बायकांना माहित असायचा? त्यांच्यासाठी कसला आलाय महिला दिवस.. 8 मार्च ही कॅलेंडरवरची साधी तारीखच तर आहे अशा अनेकांसाठी आज सुद्धा.. आणि अर्थात आज छापून आलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या त्यांना त्यांच्या नवऱ्याने आणि मुलाने माझ्याशी बोलायची अनुमती दिली म्हणूनच मला मिळाल्या आहेत हे वेगळं काही सांगायला नको.. या सगळ्यात झालं एवढंच की ज्या स्त्रीयांच काम आज सगळ्यांपुढे यायची गरज होती.. ज्यांचा सन्मान होऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज होती त्या आजही अंधारातच राहिल्या... हे का घडलं? इथे पुरुषप्रधान संस्कृती आडवी येते यात वाद नाहीच... पण याला खतपाणी घालणाऱ्या पण स्त्रियाच नाही का?? वडील, नवरा, मुलगा हे म्हणतील तस वागावं हे आजसुद्धा किती तरी महिला आपल्या मुलीला शिकवतात तेव्हाच पुरुषसत्तेची मुळं जास्त घट्ट रोवली जातात..  ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे आपण नेमका कोणत्या महिला दिनाचा, महिला सबलिकरणाचा उदोउदो आजच्या दिवशी करणार आहोत हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे.. पण तरी आज सगळ्याच महिलांसाठी या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कवी किरण येलेंच्या कवितेतल्या या ओळी इथे लिहाव्याशा वाटल्या....
''बये, 
महामाये, 
आता तरी ओळख स्वत:ला.
स्वत:च्याच अवगुंठणातुन 
बाहेर काढ स्वत:ला.
त्यांनी कालवलेल्या मातीगोळ्यात 
वर्षानुवर्षे स्वतःची मूर्त घडवत राहिलीस
स्वतःच्या शिल्पात स्वतःलाच चिणत राहिलीस
घुसमटलीस
तरीही तुझ्याच नावानं चाललेल्या 
षोडषोपचारात सुखावलीस
बये, महामाये, आता तरी ओळख स्वतःला....."