Monday 6 March 2023

गवळी पिंपळी: मुलींना शिक्षणाचा मूलभूत हक्क देणारे गाव

'ताई, आमच्या गावचा जावई व्हायला मुलाला भाग्य काढावं लागतंय. असंच कोणालाही मुलगी देत नाही आम्ही आमची...' माझ्या समोर चहाचा कप धरत उभ्या असलेल्या मावशी ठसक्यात बोलल्या. अंगात साधी साडी, वय चाळिशीच्या जवळपास असेल. पुरुष मंडळी समोरच असल्याने डोक्यावरचा पदर ढळू न देण्याची गावाकडची पद्धत सांभाळत हळुवार पण आत्मविश्वासाने बोलत आमचा पाहुणचार करणारी ती बाई पाहून या असं का बोलताय म्हणून मी प्रश्नार्थक नजरेने गोंधळून त्यांच्याकडे बघितलं. त्यांना ते समजल्या सारखं त्यांनीच पुढे बोलणं सुरु ठेवलं... 'अहो, आमच्या गावातली लग्नाची मुलगी ही किमान पोस्ट ग्रॅज्युएशन तरी शिकतेच. त्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यात आमच्या गावची मुलगी सून किंवा बायको म्हणून घरात यावी असं प्रत्येकाला वाटत. तालुक्याच्या शाळेचे मास्तर लोकंसुद्धा आमच्या गावच्या पोरींना शिकवायला उत्सुक असतात. आहेतच हुशार आमच्याकडच्या सगळ्या पोरी... एक वेळ आमचे पोरं शिकत नाहीत बघा, पण पोरी नाव काढता आमच्या शिक्षणात..त्यामुळे आम्हाला हुंडा सुध्दा जमवावा लागत नाही' असं बरच काही सांगत त्या पुढे कितीतरी वेळ भरभरून बोलत राहिल्या..
काही दिवसांपूर्वी जवळच्या मित्राच्या लग्नासाठी सोनपेठ तालुक्यातल्या गवळी पिंपळी गावात जाणं झालं. तेव्हाचा हा प्रकार. तालुक्यापासून ३-४ किलोमिटर आत जावं लागतं, गावात जायला दळणवळणाची सोय तर सोडाच पण रस्ताही नाही. फारतर २-२५० कुटुंबांची वस्ती आणि १२००-१३०० लोकसंख्या असलेलं हे गाव. त्यामुळे जिथे प्रत्येक कामासाठी या लोकांना सोनपेठ किंवा परभणी जवळ करावं लागतं त्या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी एवढा पुढाकार खरंच घेतला जात असेल का असं कुतुहल या मावशींच बोलणं ऐकुन कोणालाही वाटलं असतं. पण दिवसभरात गावातल्या इतर मंडळींशी बोलतांना समजलं की आपल्या मुलींनी खुप शिकावं म्हणून इथले पालक आग्रही आहेत. मी स्वत: अशाच छोट्या गावातून आलेली असल्याने आणि मुलींच्या शिक्षणाविषयी अशा अनेक छोट्या - छोट्या वाड्या वस्त्यांतले लोक किती उदासीन असतात हे खूप वेळा अनुभवून माहिती असल्याने मुलींना किमान शिक्षण घेण्याची मोकळीक दिलेली बघणं म्हणजे खरंच कौतुकास्पदच आहे. आजही माझ्याच बरोबरीच्या अभ्यासात हुशार असलेल्या कितीतरी मुलींचे लग्न त्यांची मर्जी विचारात न घेताच लावून दिले जातात. त्यातही मराठवाड्यात जिथे अजूनही बालविवाहासारख्या प्रथांबद्दल जनजागृती करण्याची कसरत प्रशासनाला घ्यावी लागते तिथे मुलींना शिक्षणासारख्या मुलभुत हक्काबद्दल एवढं स्वातंत्र्य मिळणं आजच्या जमान्यातही कौतुकाचंच आहे.
या मुली पुढे नोकरी करतात की नाही किंवा या शिक्षणाने त्यांच्यात स्वत:च्या हक्कांसाथी बोलण्याची हिंमत येते की नाही हा पुढचा भाग झाला. कारण आजही महिला दिन साजरा करतांना आपल्याला महिलांच्या प्राथमिक हक्कांविषयी बोलावं लागत असेल तर त्यानंतर येणार्‍या स्वातंत्र्याचा पल्ला गाठायला खूप काळ लोटावा लागणार आहे. तोवर मात्र आपल्याला महिला सबलीकरणात पुढाकार घेणार्‍या गवळी पिंपळी सारख्या अजून गावांची जास्त गरज आहे.