Saturday 24 November 2012

गोष्ट : 'तिची' आणि 'त्याची' ....

        म्हणतात कि चोरून लपून गाठी-भेटी झाल्याशिवाय खऱ्या प्रेमच शिक्कामोर्तब होत नाही.म्हणूनच अशा भेटींचा ठेवा त्या दोन जीवांसाठी खाजीण्याहूनही जास्त मोलाचा असतो आणि वाढत्या वयाबरोबर तो ठेवा एखाद्या जुन्या लोणच्यासारखा मुरत जातो. 
        तिला त्याची वाट पाहत तास न तास ताटकळत उभी राहिलेली अनेकांनी पाहिलीय.आणि आज दोन मुलींची आई होऊन फिरतानाही बघतायत.सार कस लख्ख आठवत तिला अजूनही.....
        तिचा नोकरीच गाव तिच्या गावापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावरच होत.ऑफिस तस पाच वाजता सुटायचं पण तीच मन पहिलेच बस स्टोपवर पोहोचलेल असायचं.त्याच्या प्रेमात अशी कोणती जादू होती कोणास ठाऊक कि त्याला भेटल्याशिवाय ती stand वरून जागची हलायची नाही.
       त्याची वाट पाहत असताना तिला सारख वाटायचं कि लोकांच्या नजर तिच्यावरच खिळल्या आहेत. एखाद्या चप्पल तुटलेल्या माणसाला वाटतना कि सगळे त्याच्याकडेच बघतायत अगदी तसच. खरतर अशा सार्वजनिक ठिकाणी रोज नवी माणस येणार आणि निघून जाणार. तिच्याकडे कोण कशाला पहातय? पण तिला आपल अस वाटायचं खर. तो कोपऱ्यावरून वळताना दिसतोय का हे पाहण्यासाठी तिची मान उंचावून उंचावून दुखायला लागलेली असायची.पण तो आपला खुशालचेंडू सारखा त्याला यायचं तेव्हाच यायचा. 
        प्रेम करण म्हणजे समाजासाठी गुन्हा आहे. या विचाराने तीच मन कातर व्हायचं. अनेक शंका कुशकांनी तीच मन भरून जायचं अगदी तो आपल्याला फसवणार तर नाही ना या विचारांपर्यंत ती येऊन पोहोचायची. पण कोपऱ्यावरून तो येताना दिसला आणि त्याच्या मिशीतल हसू पाहिलं कि तिचा जीव भांड्यात पडायचा.त्याच्यासोबत तिला त्या टोचणाऱ्या नजरांच सुद्धा भान रहायचं नाही.
         स्त्री प्रेम करते ते भरभरून! पुरुषांसारख तिला फुलपाखरू नाही होता येत.ती बेल वाहणार तो एकाच महादेवाला! 
          तशी या दोघांची भेट तरी किती....तो तिला तिच्या परतीच्या प्रवासात बसमध्ये सोबत करायचा. तेवढ्यात जे बोलन होईल तेच. बस मध्ये जर गर्दी असली तर मग नुसती नजर भेट.तिला तिच्या गावी सोडून हा परतीच्या बसने लगेच परत फिरणार.त्या दोघांनी कधी एकमेकांना दोन बोटांची चिठी कधी लिहिली नाही कि बागेत किंवा हॉटेल मध्ये भेटण्याची त्यांना गरज वाटली नाही. आणि शेवटी या प्रेमाच रुपांतर लग्नात झाल.
         पण प्रेम म्हंटल कि समाजाचा विरोध हा आलाच.ती रात्र त्या दोघांसाठी वादळी ठरली.त्या वादळात तीच माहेर पाचोळ्यासारख उडून गेलं. प्रेमाची गोड शिरशिरी देणाऱ्या मनाला बाहेरून धैर्याची कवच-कुंडले लाऊन त्यांनी समाजाचा वज्राघात परतून लावला.
         आता त्याचा 'आहो'झालाय आणि तिची 'अग'. प्रियकर-प्रीयसिच्या पदावरून त्याचं प्रमोशन झालय. जे त्यांना त्यांच्या मुलींनी दिलय.आई-बाबांचं प्रमोशन. पण अजूनही तिला लग्नाच्या आधीचे दिवस आठवतात.आणि तीच मन हलक होत. आठ- आठ वर्ष प्रेम संबंध ठेऊनही लोकांना जे साधत नाही ते त्यांना दोन महिन्यांच्या भेटीत साधल होत.
         पण एखादी माळ तुटून सगळे मनी निखळून जावेत तशीच दोघांची सगळी अगदी सगळी नाती निखळून गेली. दोघेही एकाकी झाले आणि म्हणूनच त्या दोघांच प्रेम दृढ होत गेल.त्यांना दु:ख वाटत ते एकाच गोष्टीच कि त्यांच्या मुलींसाठीही ह्या सगळ्या नात्याची दार बंद झाली. एकच नात त्या सांगू शकतात.आई-बाबांचं नात. 
         त्यांच्या मुली समजू शकतील का या दोघांच नातं? त्याही शिकतील का जीव ओतून, समरसून प्रेम करायला? 
         या दोघांसाठी ज्या वाटा काट्यांच्या वाटा ठरल्या, त्याच वाटा त्यांच्या मुलींसाठी फुलांचा गालीचा ठराव्यात हीच त्या दोघांचीही इच्छा आहे.

                                        ------------------------------------------------------------

     मित्रानो , हि कुठलीही काल्पनिक कथा नाही. ह्या कथेतले 'ती' आणि 'तो' खरच अस्तित्वात आहेत आणि आपल आयुष्य एकमेकांसोबत आनंदाने जगतायत...!!

Tuesday 20 November 2012

"चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद "

    अस म्हणतात कि पुस्तक वाचन म्हणजे एक व्यसनच असत. कारण एकदा कि पुस्तक वाचायची गोडी आपल्याला लागली तर मग स्वतःला या गोडीपासून लांब ठेवताच येत नाही.
                ग्रामीण भागात खर तर पुस्तक वाचनाबाबत , ती खरेदी करण्याबाबत खूप उदासीनता दिसून येते. वाचनालयाकडे तर कोणी फिरकतसुद्धा नाही.
               मी अशाच ग्रामीण भागात वाढलेली मुलगी.आई बाबा दोघ नोकरी करणारे, त्यामुळे नेहमी एकट रहाव लागायचं. अशातच पुस्तक वाचायची गोडी लागली आणि हळूहळू पुस्तकांशी मैत्रीच झाली. शाळेतील आणि महाविद्यालयातील मराठीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक पाठाच्या वर संदर्भ दिलेला असायचा, त्यावरूनही बरीचशी पुस्तकांची माहिती मिळायची.ती पुस्तक आपल्याकडे हवीशी वाटायची.आमच्या गावात चांगली पुस्तक वाचायला मिळण खरतर कठीणच. आणि शहराशी संपर्क नसल्याने चांगली पुस्तक वाचायला भेटायची नाहीत. पण गावातल्या वाचनालयात मिळाली तेवढी चांगली पुस्तक मी वाचून काढली.
                गावात वर्षानुवर्ष पुस्तक प्रदर्शन भरत नाही. माझ्या पाहण्यात गावात फक्त दोनदाच पुस्तक प्रदर्शन भरलय. मागच्या वर्षी भरलेलं पुस्तक प्रदर्शन हे चांगली पुस्तक खरेदी करण्याची सुवर्णसंधीच होती माझ्यासाठी.या प्रदर्शनातून मी काही चांगल्या लेखकांची नावाजलेली पुस्तक घेतली.मारुती चितमपल्ली याचं 'चकवा चांदण',उत्तम कांबळेंच  'आई समजून घेताना',अब्दुल कलाम याचं 'अग्निपंख',डौं.नरेंद्र जाधवांचं 'आमचा बाप आणि आम्ही'...यासारखी बरीच पुस्तक घेतली. सगळीच पुस्तक अप्रतिम आहेत, पण मला सगळ्यात जास्त आवडलेलं पुस्तक म्हणजे मारुती चितमपल्ली याचं 'चकवा चांदण-एक वानोपानिषद '.
                 हे पुस्तक म्हणजे चितमपल्ली याचं आत्मकथन आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेल घुबडाच चित्र पाहिलं कि पहिला प्रश्न आपल्या मनात येतो तो म्हणजे पुस्तकच नाव इतक सुंदर काव्यमय आहे तर मग चित्र घुबडाच का? पण आपल्या या प्रश्नाला लेखकाने खरच खूप छान उत्तर दिलय-रानावनात राहणारे पारधी, आदिवासी घुबडाला 'चकवा चांदणं ' म्हणतात. त्यांच्या मते हा अभद्र पक्षी सांजेच्या वेळी ओरडून त्यांची दिशाभूल करतो.अशावेळी हे आदिवासी  जंगलात जिथे असतील तिथेच  बसून राहतात.त्यांना चकवा पडतो.पण अभाळात शुक्राची चांदणी दिसू लागताच हा चकवा निघून जातो आणि आदिवासींना वाट सापडते,म्हणून घुबडाला ते 'चकवा चांदण' अस म्हणतात.
                  या पुस्तकात लेखकाने आपले अरण्य अनुभव सांगितले आहेत. रानावनातल्या आपल्याला माहित नसलेल्या आणि चक्रावून टाकणाऱ्या अनेक गोष्टी यात सांगितलेल्या आहेत. हे पुस्तक आवडण्याचे असे एक कारण सांगता येणार नाही, कारण लेखकाने त्यांचे जे अनुभव यात सांगितले आहेत ते इतके सुंदरपणे वर्णन केले आहेत कि ते वाचताना आपल्यासमोर जिवंतपणे उभे राहतात.आणि आपण प्रत्यक्ष त्यांच्या सोबत जंगलात भटकंती करतोय असे वाटते.
                   त्यांच्या शालेय जीवनाचा प्रवास आणि महाविद्यालयात घेतलेल्या विज्ञान शाखेकडून ते वनाभ्यासाकडे कसे वळले, या सगळ्या शिक्षणात त्यांना भेटलेले सहाध्यायी आणि त्यांच्या शिक्षकांचे वर्णनही असेच सुंदर रीतीने मांडलेय.
                    लेखकाचे आई वडील ,इतर नातेवाईक आणि समाज बांधव यांचे संबंध ,त्यांच्यासोबत लेखकाला आलेले अनुभव त्यांनी संकुचित वृत्तीने लपवून न ठेवता तेही खुलेपणाने सांगितले आहेत. त्यामुळे आपल्याला एका वेगळ्या समाजाची ओळख होते.
                   डॉ. सलीम आली सारखे पक्षीनिरीक्षक,चित्रकार ए. ए. आलमेलकर,बाबा आमटे,गो. नि. दांडेकर,गंगाधर गाडगीळ,व्यंकटेश माडगुळकर, जि. ए. कुलकर्णी या सर्वांसोबतचे चितमपल्ली यांचे अनुभवही या पुस्तकाचे वाचन मुल्य वाढवतात.किती सहजतेने त्यांना या महान व्यक्तींचा सहवास लाभला,याचे वर्णन वाचताना मन भारावून जाते.
                   वानविभागाबाबत  आणि एकूणच जंगलान बाबत अनेकांना आवड नसते. पण हे पुस्तक वाचताना आपण जंगल सफारीचा आनंद लुटू शकतो तसाच गड दुर्गांचाही आनंद लुटू शकतो.त्यामुळे एकदा हे पुस्तक वाचायला सुरु केल्यावर त्याचा फडशा पडल्याशिवाय राहवले जात नाही आणि घरबसल्या वन भ्रमंतीचा एक सुंदर अनुभवही मिळतो.
                   पुस्तकाची किमत थोडी जास्त वाटू शकते पण पुस्तक वाचल्यावर आपल्या विचारातील (किमतीचा) ठीतेपणा जाणवतो.सर्वच वयातील वाचकांनी वाचावे असे आणि आपल्या संग्रहात असावे असे हे पुस्तक तुम्हालाही नक्कीच आवडेल अशी अशा करते...

Monday 19 November 2012

" छडी लागे छम छम, विद्या येई घम घम.."

        'विद्यार्थ्यांना मारणाऱ्या शिक्षकांना जेल होणार' हि गोष्ट सरकारने जाहीर केल्यापासून याबद्दल बरेच तर्क वितर्क लढवले जातायत. बराच बर वाईट बोलं जातंय.खरतर या सगळ्यामुळे मुलांना शिक्षकांची भीती वाटायपेक्षा शिक्षकांनाच मुलांची भीती वाटायला लागलीय.
          सर्वांसमोर शिक्षकांनी मुलांना मारले किंवा रागावले तर त्या विद्यार्थ्याला अपमान वाटतो आणि त्याच्यावर मानसिक परिणाम होतो म्हणे! म्हणून हा कायदा.......या कायद्याबद्दल समजल्यावर सर्वच आई-बाबांना आपला शाळा- महाविद्यालयातील काळ आठवल्या वाचून राहिला नसेल ( अगदी आत्ताच महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा )
           अगदी काही वर्षांपूर्वी पर्यंत शिक्षकांची आदरयुक्त भीती विद्यार्थ्यांच्या मनात असायची.शिक्षकांनी जर शिक्षा केली तर त्याबद्दल विद्यार्थी घरी वाच्यतासुद्धा करायचे नाही.कारण त्यावेळी पालकांनासुद्धा शिक्षकांबद्दल विश्वाश आणि आदर होता.पालकांना जरी समजल कि शिक्षकांनी आपल्या पाल्याला शिक्षा केली तरी ते शिक्षकांना जाब विचारीत नव्हते. 'आपल्या पाल्याची चुकी असल्याशिवाय गुरुजी त्याला/तिला शिक्षा करणार नाही याची खात्री पालकांना होती.
            काळ बदलला .......... आता बऱ्याच  कुटुंबात एकच आपत्य असल्याने जरा कोड  कौतुकताच त्याला वाढवले जाते आणि अशातच जर शाळा-महाविद्यालयात जर शिक्षकांनी त्याला काही कारणास्तव शिक्षा केलीच तर पालक सर्व दोष शिक्षकांनाच देतात. यात आपल्या पाल्याची चुकी आहे कि नी याची चौकशीसुद्धा करत नाही.
            आणि त्यातच आणखीन भर म्हणून आता आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही..(?)असाही नियम काढलाय.यामुळे विद्यार्थ्यांना आता आणखीनच मोकळीक मिळालीय.
             काही प्रमाणात हे नियम योग्य आहेत कि विद्यार्थ्यांना मारायचे नाही.कारण बऱ्याचदा शिक्षक शिक्षेच्या नावाखाली आपली वैयक्तिक दुष्मनी काढतात.पण जर देशाला उद्याचा कर्तबगार नागरिक घडवायचा असेल तर आजच्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. अशातच जर विद्यार्थ्यांना काही सौम्य प्रकारच्या शिक्षा शिक्षकांनी केल्या तर त्यात काही वाईट नसेल.कारण एकुलते एक अपत्य म्हणून आणि आई- बाबा दोघेही नोकरी करत असल्याने त्यांच्या मनात अपराधी भावना असते मग "क्वालिटी टाइम" देण्याच्या नावाखाली त्याचे खूप कोड कौतुक करतात.शिस्त धाक यांचा अभाव आढळतो.याचा अर्थ काय..? घरीपण कोणी रागवायचे नाही आणि शाळेतही नाही.....मग मुलांना वळण कसे लागणार.एखादे चित्र जसे चौकटीत छान दिसते तसेच मुलांना शिस्त व धाकाची चौकात असायलाच हवी.
            सरकार जे नवीन नवीन कायदे करते ते मुलांना वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमांमुळे लगेच समजतात.त्यामुळे त्यांना शाळा आणि शिक्षकांची आदरयुक्त भीती वाटणार नाही.जुन्या पिढीला त्यांच्या शिक्षकांनी जसे घडवले त्यामुळे ती पिढी बिघडली का.?दिशाहीन झाली का ? नाही ना ..? मग आत्ताच शिक्षेचा बाऊ का..?
            माझी आज्जी तर म्हणते.." छडी लागे छम छम, विद्या येई घम घम.."        

Saturday 17 November 2012

मी शिवाजी पार्क बोलतोय !

                   आज सगळ्यांच्या मुलाखती होतायत, सगळ्यांनी मन मोकळ केलय, पण मला कोणी विचारेल का?मला काय वाटतंय ते.आज माझ्या या शिव तीर्थावरचा देव हरपला. अनंतात विलीन झाला.
                    मला, या शिवाजी पार्कला ज्याने तीर्थाचे स्वरूप आणल त्या हिंदुहृदय सम्राटाला माझे शतशः नमन!जेव्हा जेव्हा हा ढान्या वाघ गुहेतून निघाला तेव्हा तेव्हा त्याने माझ्या साक्षीनेच गर्जना केली, डरकाळी फोडली.माझा परिसर दणाणून सोडला. त्याला ऐकायला येणार्यांनी इतकी गर्दी केली कि मुंगीलाही शिरकाव नसावा.
                      शिवसेनेच्या जन्मानंतर मला या वाघाची प्रथम ओळख झाली आणि लोकांनी माझ्या साक्षीने त्याची पहिली गर्जना ऐकली. तो दिवस होता ३० ऑक्ट. १९६६. बाळासाहेबांची पहिली जाहिर सभा या माझ्या परीसारात झाली.पाच लाखाचा जनसमुदाय त्यांना ऐकायला जमला होता.तेव्हा तो समुदाय कोणत्या एका पक्षाचा नव्हता, ते होते हिंदुत्वावर प्रेम करणारे लोक.तेव्हापासून आजतागायत शिवसेनेचा दशहरा मेळावा, बाळासाहेबांची गर्जना आणि शिवाजी पार्क एक झाले.माझ्या परिसराला तीर्थाचे रूप आले.
                    अशी एकच गर्जना मी आचार्य अत्र्यांची ऐकली होती!
                    बाळासाहेबांच्या माझ्या परिसरातल्या सभा लोक कधीच विसरू शकणार नाहीत.त्यांनी मलाही इतिहासात अजरामर करून ठेवलं.
                    उद्या बाळासाहेब माझ्या कुशीत विश्रांती घेतील,केव्हढा हा दैवदुर्विलास.ज्या वाघच राज्य माझ्या साक्षीने सुरु झाल त्याचा शेवटही माझ्या साक्षीने व्हावा? माझ मन आक्रांदतय.
                   आता हा शिवाजी पार्क त्या महान हिंदू हृदय सम्राटाची गर्जना कधीच ऐकू शकणार नाही.या शिवातीर्थाचा देव हरपलाय. उद्या लाखो लोक जमतील त्याला निरोप द्यायला , पण मलाही विचाराहो कोणी, मला काय वाटतय.
                   पुढेही दशहरा मेळावे होतील, सभा होतील , पण या वाघाची डरकाळी मुंबई दणाणून सोडायला नसेल.
                      

Friday 16 November 2012

"टिकली बांगडीच स्वातंत्र्य........."

 
                   स्त्रीच विश्व खरतर खूपच वेगळ असत.तिच्या या विश्वाबद्दल आणि त्यात काळानुसार होत गेलेल्या बदलांबद्दल जितका विचार करू तितका थोडाच आहे.कधी मुलगी, कधी पत्नी, तर कधी आई. कोणाची ती सून असते तर कोणाची सासू, मामी, काकू, बहिण, आत्या, मावशी, आजी प्रत्येकच नात्यात तीच रूप वेगळ असत. दुध आपण ज्या आकाराच्या भांड्यात टाकू तसा ते आकार घेत, स्त्रीच सुद्धा तसाच असत, नात्याप्रमाणे ती स्वत:ला बदलते.पण जगाच्या पाठीवर कुठेही गेल तरी स्त्रीच जगणं बदलत नाही. आत्ताच्या या एकविसाव्या शतकात रांधा, वाढा, उष्टी काढा,यांच्या पलीकडे स्त्रीला अस्तित्व आहे.तरी अजून घरात, समाजात, मिळणारी वागणूक  तिला दुय्यम ठरवते. पूर्वी स्त्रीच आयुष्य फक्त चूल आणि मुल इतकाच मर्यादित होत. घरातल्या अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये  तीच मत विचारात घेतलच जात नव्हत. स्त्रीने घराच्या बाहेर निघायला सुद्धा बंदी होती. व्रतवैकल्यानसारखे प्रकार सुद्धा ती करत होती आणि आश्चर्य म्हणजे त्यावेळच्या बऱ्याच स्त्रियांना हे सर्व योग्य वाटत होत!
                             " डोळे असून पहायचं नाही,
                               कान असून ऐकायचं नाही,
                               तोंड आहे म्हणून बोलायचं नाही..."
अशीच स्थिती पूर्वीच्या काळी बायकांची होती. कालांतराने ती स्थिती बदलली. सावित्री बाईंची  हि स्थिती बदलण्यात मोलाच योगदान आहे. आज हीच स्त्री पुरुषांच्या बरोबरीने ( कदाचित पुरुषांपेक्षा जास्त) काम करते.पण नव्वारी नेसायची सोडून जीन्स घालायला लागली असली तरी स्त्रीच पोतेर व्हायचं राहत नाही.
              सुनिता विल्यम्स किंवा सायना नेहेवाल किंवा मग सोनिया गांधींच नाव घेऊन आपल्याला थांबता येणारच नाही. कारण आज छोट्या गावातल्या स्त्रिया सुद्धा घरच सगळं काम करून शेतात सुद्धा राबतात. शहरात सुद्धा स्त्रिया आठ तास नोकरी करून तितकाच वेळ घरीसुद्धा काम करतात.म्हणजेच काय तर बौद्धिक असो व शारीरिक श्रम असो स्त्री पुरुषांच्या बरोबरीने आहे.पण आज सुद्धा तिला या सगळ्या कामांबरोबर व्रत-वैकल्य सुद्धा साम्भालावेच लागतात.
              स्त्री पुरुषांच्या बरोबरीने असली तरी देशातल्या पुरुषप्रधान संस्कृतीपुढे तिची किंमत केली जात नाही. उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर पत्नी जेव्हा नोकरीत पतीपेक्षा जास्त यश मिळवते तेव्हा पतीचा अहंकार दुखावला जातो आणि मग तिच्यावर विनाकारण संशय घ्यायला सुद्धा पती कमी करत नाही.अजूनही काही खेड्यांमध्ये स्त्रीला पायातली चप्पलच समजले जाते.घरात मुलगी जन्माला आली म्हणजे संकट आल असाच विचार काही लोक करतात. यात जर अशिक्षित कुटुंब असेल तर मुळीच जगण कठीण होत.ती लहान असताना तिच्या वाट्याला आलेल टिकली बांगडीच स्वातंत्र्यसुद्धा पुढच्या आयुष्यात तिच्या वाट्याला येत नाही. समाजात स्त्री म्हणजे पिता,पती,पुत्र  यांच्या आधारानेच चालणारी व्यक्ती आहे. तिला स्वत:च कुठलंच स्वातंत्र्य नाही आणि या पिता,पती,पुत्राच्या काटेरी कुमपनातच तिने जगायचे असे समजले जाते. त्यामुळे साहजिकच तिच्या संबंधीचे सर्व निर्णय या तीन व्यक्तीच घेतात.
               आमच्या कुटुंबात सुद्धा आम्ही दोघी बहिणीच आहोत.समाजात वावरताना बऱ्याचदा आई-वडिलांना प्रश्न विचारतात.'मुलगा नाही का?' कुटुंबाला वंशाचा दिवा नाही याचा लोकांना खेद वाटतो .
मुलगा जन्माला आल्यावर लोक पेढे वाटतात.पण हेच मुल मोठे झाल्यावर आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा  रस्ता दाखवतात. तरी लोकांना मुलांचेच कौतुक वाटते.मुलींचं आपल्या आई-वडिलांवर कितीही प्रेम असल तरी त्या नकोशाच असतात.
                समाजात अजूनसुद्धा लहान ( १५-१६ वर्षाच्या) मुलींची लग्न लावली जातात.त्यात त्यांची संमती सुद्धा पहिली जात नाही.यामुळे त्यांना इच्छा नसतानाही शिक्षण अर्धे सोडावे लागते.
फक्त खेड्यातच नाही तर शहरांमध्ये सुद्धा काही वेगळी स्थिती दिसत नाही.बऱ्याचदा रेल्वेत किंवा रस्त्याने चालताना पुरुष मुद्दाम धक्का देतात. किंवा अपशब्द वापरतात. विप्रो सारख्या मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेतलेल्या ज्योती कुमारीला सुद्धा या प्रसंगाला सामोरे जावे लागले. मग परिस्थिती बदलली कुठे? स्त्री काळ सुद्धा असुरक्षित होती आणि आज सुद्धा असुरक्षितच आहे.अस नाही कि तिला स्वत:च्या इच्छेप्रमाणे वागता नाही येत. ती स्वत:च्या इच्छेप्रमाणे वागते. पण समाजात अशा स्त्रिया खूप कमी आहेत.
                सध्याच्या तरुणींमध्ये 'इन ए रिलेशनशिप' ची जास्त 'क्रेझ'दिसून येते. त्यांना वाटे कि लग्न न करताच जर आपण एकत्र राहिलो तर आपल्याला स्वातंत्र्य राहील. आपण आपल्या मर्जीप्रमाणे वागू शकू. पण कालांतराने या नत्याच रुपांतर आपोआपच लग्नात होत आणि मैत्रीच नवरा बायकोत. त्यामुळे प्रत्येक वेळा जोडीदाराकडून दुय्यम स्वरूपाचीच वागणूक तिला मिळते.
                आताचाच एक प्रसंग अजूनही स्मरणात आहे.मी सध्या प्रथम वर्षाला आहे आणि बारावीच्या सुट्टीत आजीकडे गेले होते. नेहेमीच्या सवयी प्रमाणे सकाळी आवरून वृत्तपत्र वाचायला बसले होते. लगेच आजीने येऊन सुनावलं, " पुरुषांसारखी पेपर काय वाचत बसलीये ,पेपर वाचून कोणता देश चालवायचा आहे तुला.ते पुरुषांनाच शोभत सकाळी-सकाळी पेपर वाचत बसण ." आजीच हे वाक्य कानावर पडल आणि आश्चर्यच वाटल. आजच्या या एकविसाव्या शतकात सुद्धा असा विचार केला जातो.खरतर अशा रोजच्या छोट्या छोट्या प्रसंगांमधून स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो.आणि आपल्याकडे तर लहानपणा पासूनच मुलामुलींना शिकवलं जात, हे काम मुलाचं आहे , हे काम मुलींचं आहे. मुलींची काम मुलांनी नाही करायची. खरतर इथूनच स्त्री पुरुष भेदभावाचा पाया रोवला जातो.
              मागे एकदा फादर फ्रान्सिस दिब्रीतोंचा एक लेख वाचनात आला. त्यात त्यांनी त्यांच्या पाश्चिमात्य देशातील प्रवासाचे वर्णन केले होते. ते अमेरिकेत एका घरी जेवायला गेले होते तिथे घरातल्या आईने स्वयंपाक केला होता. तर मुलांनी आणि पुरुषांनी तो वाढला.उष्टी खरकटी सुद्धा सर्वांनी मिळून म्हणजे आई आणि मुलांनी मिळून काढली.आपल्याला या गोष्टीच नवल वाटू शकत. कारण मुलांनी स्वयंपाक घरात मदत करण्याची पद्धत काही अंशी सुद्धा आपल्याकडे नाही.त्यामुळेच मग मुलांमध्ये स्त्री पुरुष भेदभाव निर्माण होतो. म्हणून स्त्रीला नेहेमी दुयाम ठाण मिळत गेले.
               म्हणतात कि जग कितीही बदललं तरी स्त्रीसाठी ते कधीच बदलत नाही, समाजाचा तिच्याविषयीचा दृष्टीकोन कधीच बदलत नाही. स्त्री घर आणि नोकरी अशा दुहेरी भूमिका बजावते.देश चालवण्याची क्षमता सुद्धा तिच्यात आहे. तरी तिला कमीच लेखले जाते. पण हीच स्त्री जन्मापासून तर मरेपर्यंत नेहेमीच कधी कुटुंबासाठी  तर कधी समाजासाठी स्वत:च्या इच्छांचा त्याग करत असते. तिच्या या त्यागांसाठी अनुराधा पाटील यांच्या या ओळी समर्पक ठरतात.
                                                          " सगळ्यांचीच मारत असते
                          
                                                              एक दिवस आई,
                                                        पण तिला माहित नसतो जाताना
                                                              आपल्या मनात तासू तासून
                                                                  होत गेलेला तिचा मृत्यू
                                                                         जन्मापासून......."
                भविष्यातील स्त्री कधी समाजाचे तिच्या भोवती असलेले काटेरी कुंपण तोडून कधी स्वत:साठी जगेल का? कि पूर्वीच्या स्त्रिया सारखीच  तीपण त्यांच्या पावलांवर पाय ठेवत आणि स्वत:च्या इच्छांचा, स्वप्नांचा त्याग करत चालत राहील. पहिले पाढे पंचावन्न म्हणत?
                                                                           "तिला करता येईल
                                                                            टकमक टोकावर उभं राहून
                                                                            हाती न येणाऱ्या
                                                                            झगमगत्या नक्षत्रावर
                                                                            स्वत:ला उधळून प्रेम ?"