Thursday 29 August 2013

होकार...!

         
फ्रेंड्स , आज पहिल्यांदा काल्पनिक कथा लिहितेय . या आधी सत्य कथा खूप लिहिल्या . पण काल्पनिक कथेतल हे माझ पाहिलं पाऊल. I hope तुम्हाला हि गोष्ट आवडेल. 
                                     .................................................. …………………………

           अभी आणि प्रियाची ओळख तशी फार जुनी नव्हती. ते दोघ एकमेकांना गेली २ वर्ष कॉलेजमध्ये  बघत होते ……
 अभी तसा शांत स्वभावाचा, उंच, देखणा, हुशार.कॉलेजच्या पहिल्या दिवशी त्याने प्रियाला पाहिलं. प्रिया दिसायला साधीच होती. बडबडी, नेहेमी हसणारी.
          पण अभिच्या आयुष्यात प्रिया वेगळीच जादू करून गेली. रोज तिला कॉलेजला पाहन हा अभिचा सर्वात आवडता कार्यक्रम बनला होता आता! तीच हसण, तिची बडबड, तीच अगदी सहज सगळ्या मित्र-मैत्रीणीना समजून घेण …. तिची प्रत्येक गोष्ट त्याला आवडायची.
          तस पाहिलं तर अभी आणि प्रिया एकमेकांसाठी अगदीच अनोळखी नव्हते . कॉलेज मध्ये काही कामा निमित्त त्याचं बोलन व्हायचं. बाकी वेळा प्रियाशी अगदी मोकळेपणाने बोलणार्या अभिला मात्र प्रियाला आपल्या मनातली गोष्ट सांगायची भीती वाटायची ! ''ती नाही  नाही म्हणाली तर!''या विचारानेच तो बेचैन व्हायचा. अभिला प्रिया आवडते हि गोष्ट अर्थातच अभिच्या सगळ्या मित्रांना माहिती होती. ( ते म्हणतात ना कि मुलाला एखादी मुलगी आवडली म्हणजे ती मुलगी सोडून हि गोष्ट बाकी सगळ्यांना माहिती असते .)
           पण हे अस किती दिवस चालायचं म्हणून शेवटी एकदाचा अभी तयार झाला प्रियाला सगळ सांगायला !
           अभी कॉलेजला पोहोचला तेव्हा प्रिया library त जायला निघाली होती. कॉलेज मध्ये नेहेमी मैत्रिणींच्या गोतावळ्यात असणारी प्रिया फक्त library मधेच एकटी असायची. अभी प्रियाच्या मागे library मध्ये गेला तेव्हा प्रिया तिला हव ते पुस्तक शोधण्यात गुंतली होती. 
         '' हाय प्रिया " अभी.  
           ''हाय'' - प्रिया. 
 थोडा वेळ असाच शांततेत गेला आणि अभी म्हणाला ,
'' प्रिया , माला बोलायचय तुझ्याशी काहीतरी.'' 
 ''…… हो , बोल ना '' प्रिया. 
प्रियाने अभी कडे पाहिलं तेव्हा तो शब्द जुळवण्यात गुंतला होता. 
'' काय रे , बोल ना!" प्रिया. 
'' प्रिया , मी …… म्हणजे ……. माला तू आवडतेस, माझी life partner बनायला आवडेल का तुला ?'' अभी सगळ एका दमात बोलून मोकळा झाला तेव्हा प्रिया त्याच्याकडे बघून हसत होती . 
       तिला तस हसताना बघून अभी गोंधळला तस प्रियाला अजूनच हसू यायला लागल . 
'' अरे अभी, किती उशीर लावलास तू हे सांगायला!'' प्रिया हसू आवरत म्हणाली. 
 '' …पण तू सांगितल नाहीस तरी तुझ्या डोळ्यांनी मला हे कधीच सांगितल होत. मला फक्त हे तुझ्या तोंडून ऐकायचं होत ………. ''
प्रिया बोलत होती तेव्हा अभी तिच्या कडे बघतच राहिला. 
      एव्हाना बराच वेळ झाला तरी प्रिया अजून आली नाही म्हणून अनु, प्रियाची मैत्रीण तिला शोधत library मध्ये येउन पोहोचली होती . 
         अनु आणि प्रिया library च्या दाराशी येउन पोहोचा तेव्हा प्रियाने वळून अभिकडे बघितल आणि ती हसली……
            तिच्या त्या हसण्यामध्ये अभिला तिचा होकार मिळाला होता ……… 









Friday 16 August 2013

प्रेम


प्रेम म्हणजे नक्की काय असत...
कुणी तरी सांगाल का हे प्रेम म्हणजे नक्की काय असत...
कशाला म्हणतात प्रेम...
कोणाचीतरी सतत आठवण येण हे प्रेम असत...
दिवसरात्र त्याचा विचार करण हे प्रेम असत..
येणार नाही माहित असुनही त्याच्या फ़ोनची वाट पाहन हे प्रेम असत...
की तो नाही म्हणुन गर्दीतही एकाकी वाटन हे प्रेम असत....
फेसबुकवर सारख त्याच्या प्रोफाइल ला visit करण...
त्याचा no डायल करून रिंग वाजन्याआधी फोन कट करण याला प्रेम म्हणतात
मी बोलणारच नाही त्याच्याशी ठरवूनही ...
फ़ोन नाही तर नाही...पण at least एक मिस कॉल ची अपेक्षा करण याला प्रेम म्हणतात
की त्याला गरज नाही तर मी तरी का भाव देऊ अस म्हणुनही
त्याच्या एका सॉरी ने क्षणात विरघलुन जाण याला प्रेम म्हणतात
त्याच्या एक नजरेसाठी व्याकुळ होण याला प्रेम म्हणतात...
त्याच्यासाठी वाटनार्या काळजिला प्रेम म्हणतात की
की त्या ख़ास मैत्रीला प्रेम म्हणतात...
त्याच्या जगात आपल स्थान नाही माहित असुनही
त्याच्या बरोबर स्वप्न रंगवन याला प्रेम म्हणतात...
स्वताच्याही नकळत त्याच्यात गुंतत जाण याला प्रेम म्हणतात की
तो सोडून गेल्यावरही चातकासारखी त्याची वाट पाहन याला प्रेम म्हणतात...
                  .............................................. 

फ्रेंड्स , हि कविता माझी नाही …. मला हे कविता वगैरे  नाही जमत … १-२ वर्षांपूर्वी हि कविता कशात तरी वाचली होती . 
तेव्हा ती जपून सुद्धा ठेवली होती , पण माझ्या स्वभावा प्रमाणे मी ती हरवली ! आज इतक्या वर्षांनी ती मला एका पेजवर पोस्ट केलेली दिसली. म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी इथे टाकतेय. खर सांगायचं तर या कवितेत काहीतरी जादू नक्कीच आहे!
कारण मी प्रत्येकवेळा जेव्हा हि कविता वाचतेय तेव्हा मला ती जास्त जास्तच आवडतेय! असो . Enjoy the poem!!

Wednesday 17 July 2013

'' शिफ्टिंग..........''

                  हाय फ्रेंड्स …… कसे आहात तुम्ही सगळे ? म्हंटल आज जरा गप्पा मारू तुमच्या सोबत , म्हणून विचारल . बरेच दिवस झालेत ब्लॉगवर काही लिहील नाहीय. तुमच्याशी गप्पा मारता-मारता थोड लिहून पण होईल!
              तस लिहायचं खूप होत पण काय झाल न कि काही दिवसांपासून घर शिफ्ट करायचं काम सुरु होत आमच्या कडे. ( अर्थातच आम्ही भाड्याच्या घरात राहतो !) त्यामुळे नेट बंद होत. तुम्हाला सांगते फ्रेंड्स, आम्ही जेव्हा अस शिफ्टिंग करतो त्यावेळा खूप मज्जेशीर किस्से घडत असतात. पण ते सगळे किस्से सांगण्या आधी एक सांगते, कि तुम्हाला जर वाटत असेल कि घर शिफ्ट करण सोप्प काम असत, तर तुमचा हा गैरसमज आधी डोक्यातून काढून टाका तुम्ही! ( उगीचच भ्रमात नका राहू !) कारण काय आहे ना कि आपण कितीही ठरवल कि नीट management केल्यावर कसलाच गोंधळ नाही होणार , वगैरे वगैरे . पण काय आहे कि तुम्ही कितीही ठरवल तरी शेवटच्या क्षणी व्हायचा तो सावळा गोंधळ होऊनच राहतो! ( हे मी माझ्या अनुभवावरून सांगतेय.)
              घर शिफ्ट करायचं ठरल म्हणजे आमची सामानाची बांधाबांध सुरु होते. एवढ सगळ समान कस न्यायचं वगैरे प्रश्न नसतो. कारण आमची स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी आहे त्यामुळे आमच्याकडे काम करणाऱ्या मुलांच्या मोठ्या मालवाहू गाड्या असतातच.आता तुम्हाला वाटेल कि 'स्वतःच्या गाड्या असल्यावर प्रॉब्लेम काय उरतो?' फ्रेंड्स खरा प्रॉब्लेम इथूनच सुरु होतो!
              आता या वेळा शिफ्टिंग करतानाचेच किस्से पहा ना .…… आमच्या कडे काम करणाऱ्या मुलांना आम्ही कधीच वेगळ समजत नाही . ते आमच्या घरातले सदस्यच आहेत. त्यामुळे शिफ्टिंग म्हंटल्यावर ते स्वतःहून काम करतात. पण याचं काम करण म्हणजे आमच्या साठी डोक्याला ताण  असतो .
              सामान उचला सांगितल म्हणजे हे जे सामान दिसेल ते उचलून गाडीत भरतात ! मग छोट्या छोट्या सुट्ट्या वाट्या काय आणि धुवून वळत घातलेले कपडे काय, ( सगळ्याच गोष्टींची वाट लागते!)सगळ्या गोष्टी नुसत्या उचलून गाडीत भरायचं काम करतात! आपण त्यांना थांब थांब करेपर्यंत समान गाडीत जाऊन अस्थाव्यस्थ पाडलेल असत !
            तुम्हाला सांगते, एक एक सामान अस उचलून फेकायच काम करतात हे पोर कि नवीन घरात येउन पाहिल्यावर बाथरूमच्या बादलीत चॉकलेटची बरणी असते तर किचन मधल्या मसाल्यांच्या बाटल्यांसोबत फिनैलची बाटली दिसते! आणि घरातल्या मोठ्या वस्तूंची ( फ्रीज, टि. व्ही., ओव्हन) तर अशी टांगाटोळी होते कि प्रश्नच पडतो या वस्तू आता परत दिसतील कि नाही.
              शिफ्टिंग म्हंटल्यावर मला नवीन घरात जायचा जितका आनंद होतो तितकच जून घर सोडायचं म्हणून वाईट सुद्धा वाटत. कस असत ना फ्रेंड्स एखाद्या घरात ४-५ वर्ष राहिल्यावर त्या घराशी आपल वेगळच नात जोडले जात. खूप आठवणी असतात. आणि आपण तिथे इतके रुळलेले असतो कि अंधारातसुद्धा आपल्याला घराचा काना कोपरा सांगता येतो. सगळ घर आपल्या मना प्रमाणे सजवलेलं असत आपण . अशा वेळी ते घर सोडन फार जीवावर येत.( माझ्या जरा जास्तच येत !)
              पण फ्रेंड्स प्रत्येक वेळा नवीन घर सजवताना , आपल्या वस्तू मनाप्रमाणे लावताना सुद्धा खूप मजा येते. घरात कुठल समान कुठे ठेवायचं,लाईट फिटिंग कुठे कशी करायची हे सगळ्या family सोबत ठरवताना एक वेगळाच आनंद मिळतो. पण नवीन घरात खूप वेळा मी जुन्या घरातल्या जागीच वस्तू शोधते! लाईटच्या बटनांच्या जागा वेगळ्या असल्याने सुधा बर्याचदा खूप गोंधळ उडतो. सगळ्यात पहिले तर लक्षातच येत नाही कि  कुठल बटन कसल आहे ! मग सगळे बटन दाबून पाहावे लागतात.
              सगळ्यात महत्वाच म्हणजे नवीन घरापासून कॉलेज, ऑफिस, अशा ठिकाणी जायला रस्ते शोधावे लागतात ते वेगळेच ! शिफ्टिंग बद्दल जितक सांगाव तितक थोडच. आणि बहुतेक सगळ्यांचे वेगवेगळे अनुभव असतात शिफ्टिंगचे. म्हणजे नोकरी निमित्त सारखी बदली होणार्यांचे अनुभव फार वेगळे असतात, तर आमच्या सारख्या भाड्याच्या घरात राहणाऱ्यांचे वेगळे असतात.
           तुमचे आहेत का असे अनुभव? तुमच्या घराशी जोडलेल्या आठवणी ?


Sunday 30 June 2013

'सामान्यातले असामान्य'

           काही दिवसांपूर्वी गावात प्रदर्शन भरल होत, आता अस प्रदर्शन भरल आहे म्हंटल्यावर माझ्यासाठी हि  पर्वणीच असते. ( आईच्या मागे लागून हवे तितके पुस्तक विकत घेता येतात.) या पुस्तकांमध्ये सुधा मुर्तींच एक नावाजलेल पुस्तक पण घेतल. ''सामान्यातले असामान्य''………         
         'सामान्यातले असामान्य' हा सुधा मूर्तींचा एक कथा-संग्रह. उमा कुलकर्णी यांनी या कथा-संग्रहाचा अनुवाद केला आहे. उत्तर कर्नाटकच्या संस्कृतीशी त्या पुरेपूर परिचित असल्यामुळे या कथासंग्रहातील अर्क मराठी वाचकांपर्यंत पोचवण त्यांना सहज शक्य झाल आहे.
            मला असलेली  वाचनाची गोडी बघून आणि मी करत असलेला पुस्तकांचा संग्रह बघून माझ्या आईने हे पुस्तक मला माझ्या संग्रहात भर म्हणून वाढदिवसाला भेट म्हणून दिल.
उत्तर कर्नाटकाची संस्कृती आणि वेगळा असा थाट , या प्रदेशाच स्वतःच अस असलेल वेगळ वैशिष्ट्य , त्या संधर्भातील काही व्यक्तींविषयी काही कथा या कथा-संग्रहात आहेत. या कथांबद्दल सुधा मूर्ती सांगतात की "आमच्या गावात माणसं आत एक आणि बाहेर एक असा विचारच करत नाही,वरवर ओबड-धोबड वाटल तरी आमच हे उत्तर कर्नाटक मृदुपणा आणि भावनाशिलतेमध्ये परिपूर्ण आहे ." आणि हे पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येत कि सुधा मुर्ती अगदी खरं सांगत आहेत.
             या पुस्तकामध्ये वर्णन केलेल्या व्यक्ती वरवर बघता अत्यंत सामान्य आहेत. तरीही त्यांच्यामध्ये असामान्य गुण आहेत.या सर्व व्यक्ती मध्यम-निम्नमाध्याम आर्थिक परिस्थितीतल्या असल्यामुळे उत्तर कर्नाटकातील सर्वसामान्य जीवनाचा प्रत्यय आपल्याला हे पुस्तक वाचल्यावर येतो.
             या पुस्तकाच्या पहिल्याच कथेत आपल्याला भेटतो 'बंडल बिंदाप्पा' दिसायला देखणा असा हा बिंदाप्पा तरुणपणी सिनेमात नट होता अस कोणी सांगितलं, तर नाही म्हणायचं करांच नाही!! सुधा मूर्तींच्या आजीने त्याच्या विषयी केलेली डेफिनेशन विचित्र आहे, ' बिंदाप्पा , एकाच चार करणारा माणूस! दोनशेच चारशे करणारा.' बंडल बिंदाप्पा हा प्रत्येक गोष्ट फुगवून सांगणारा , तोंडातून कधीही नकारात्मक बोलन न निघणारा. पण याच बिंदाप्पाला उत्तर कर्नाटकच्या इतिहासाविषयी खूप आदर आहे. असा हा बिंदाप्पा.
               पुढे ' असूया-तीच नाव अनसक्का ' हिची कथा आली आहे. अनसक्का म्हणजे गावातला ऑल इंडिया रेदिओ .या अनसक्काच्या तोंडातून कधीच कोणासाठी चांगले शब्द निघाले नाहीत. गावातल्या कुठल्या शुभ-अशुभ कार्यात तिच्या आवाजावरून तिचे अस्तित्व नजरेत येते.पण अशा या अनसक्काचा नवरा मात्र तिच्या एकदम विरुध्द आहे. शांत स्वभावाचा, मृदू , आणि अजिबात धैर्य नसलेला. मनात घर करणारी हि गोष्ट
              पुढची गोष्ट येते ती ' नलिनीची ' ' डब्बावाली नलिनीची' जीला कामाच्या व्यापामुळे घरी स्वयंपाक करायला वेळ नाही.त्यामुळे तिच्यासाठी गावातल्या कुठल्याही घरातून डब्बा यायचा. गावातल्या एखाद्या कार्यक्रमाला नलिनी जरी गेली नाही तरी तिचा डब्बा ती पाठवून द्यायची. पण तिच्या अशा वागण्याचा गावातल्या लोकांना कधी राग नाही आला.याच दाब्ब्यामुळे पुढे नलिनीचे लग्न कसे जमले,या गोष्टीचे वर्णन छान केले आहे.
              अशाच अनेक चांगल्या कथा या पुस्तकात आल्या आहेत. ' अपशकुनी सरसाक्का ', ' कंडक्टर भीमण्णा', ' विजोड', ' चतुर चामन्ना', 'स्वार्थी सावित्री', ' संधिसाधू सीमा', आणि बर्याच अजून कथा. या सर्वच कथा आपल्याला खिळवून ठेवणाऱ्या आहेत. प्रत्येक कथा वाचताना या सर्व व्यक्ती आपल्या समोर जिवंत उभ्या राहतात. सुधा मूर्तींना या सर्व व्यक्तीसोबत जे अनुभव आले ते वाचताना मन भरून जाते.

''मालगुडीचा नरभक्षक .........''

        काही दिवसांपूर्वीच ' आर.के.नारायण.' यांच्या चार पुस्तकांच्या संचाबद्दल वृत्तपत्रात जाहिरात वाचली आणि आपल्या संग्रही आर.के.नारायण यांची पुस्तक हवीत म्हणून मग हा संच मागविला. '' द बॅचलर ऑफ आर्टस्'', '' द इंग्लिश टीचर'', '' मालगुडीचा नरभक्षक'', आणि '' महात्म्याच्या प्रतीक्षेत'' अशी हि चार पुस्तक.
          आर.के.नारायण यांची मालगुडी डेज हि सिरिअल आणि पुस्तक तसे आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. '' स्वामी अंड फ्रेंड्स '' या पुस्तक पासून त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात केली. आर.के. नारायण यांच्या पुस्तकाची वैशिष्ट्ये म्हणजे हि सगळीच पुस्तक अगदी साधी सरळ, मालगुडी या काल्पनिक गावातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सहज, ओघवत्या शैलीतून आणि मार्मिक विनोदातून वाचकांपुढे मांडणारी आहेत.
         या चार पुस्तकांमधल असच एक पुस्तक म्हणजे '' मालगुडीचा नरभक्षक'' . या पुस्तकाचा मराठी अनुवाद सरोज देशपांडे यांनी केलाय.
हि गोष्ट आहे मालगुडीच्या एका नटराज नावाच्या व्यक्तीची ज्याचा प्रिंटींगचा व्यवसाय आहे. पत्नी आणि मुलासोबत राहत असलेल्या आणि सगळ्यांशी मित्रत्वाने वागणाऱ्या या मुल पत्राच्या आयुष्यात जेव्हा वासू नावाचा एक इसम येतो तेव्हा नाटराजचे आयुष्य कसे बदलते याची हि गोष्ट आहे.
         नटराज हा एकदम साधा सरळ आणि हळव्या स्वभावाचा. मुंगीही आपल्या हातून मारता कामा नये अशा कुटुंबात लहानाचा मोठा झालेला.
पुढे त्याला त्याच्या व्यवसायामुळे दोन मित्र भेटतात. जे पेशाने कवी व पत्रकार आहे. नंतर त्याच्या व्यवसायाच्या निमित्यानेच वासू नावाचा एक ट्याक्सीडर्मिस्ट येतो. जो पूर्वी पेशाने पहिलवान होता ( एका मुठीत लोखंडाचे दर पडणारा ! ). शिकारीची भयंकर आवड असणारा आणि प्राण्या-पक्ष्यांना मारून त्यांच्यात पेंढा भरून तो विकून भरपूर पैसे कमावणाऱ्या या वासूचा स्वभाव तापट, रागीट, हेकेखोर, आणि हुकुम्शहसर्खे हुकुम सोडण्याचा आहे.
          पुढे हा वासू नटराजच्या प्रिंटींगप्रेसच्या पोटमाळ्यावर येउन राहायला लागतो ( नटराजने परवानगी दिलीच आहे असे गृहीत धरून!). पुढे वासू नटराजला बळजबरीने मेम्पिच्या जंगलात घेऊन जातो, तेंव्हा तिथे अनोळखी जागी नटराजला एकट्याला सोडून वासू कसा निघून जातो व नटराज परत घरी कसा येतो. हा प्रसंग लेखकाने छान मांडला आहे. नंतर पुढे हळू हळू वासू नटराजचा सर्व पोटमाळा प्राणी-पक्ष्यांच्या पेंढा भरलेल्या अवयवांनी भरून टाकतो. वासूच्या अशा स्वभावामुळे नटराज आणि वासुमध्ये वादावादी होऊन आलेलं वैर आणि अबोल अशी गोष्ट पुढे सरकते. पुढे नटराजच्या कवी मित्राने लिहिलेल्या एकपदी राधा आणि कृष्णाच्या कवितेचे पुस्तक पूर्ण झाल्यावर ते प्रकाशित करण्याच्या समारंभांच्या मोठ्या सोहळ्याची तयारी चालू होते आणि तयारीच्या वेळी नटराजला समजते कि वासू समारंभात आणल्या जाणाऱ्या हत्तीला गोळी घालून मारणार आहे.आणि त्याला विकून पैसे कमावणार आहे.
          नटराज वसुल त्याने हत्तीला मारु नये यासाठी खूप विनंती करतो.पण वासूचे मन वळवण्यात तो अयशस्वी ठरतो.पुढे तो हत्तीला कसे वाचवतो आणि त्यावेळी वासू स्वत:च स्वत:च्या पहिल्वणी शक्तीमुळे कसा मारतो.....अशी हि गोष्ट. साधीच पण वाचताना आपल्याला खिळवून ठेऊन, पुढे काय होईल? याबद्दल आपल्या मनात कुतूहल निर्माण करणारी.
           साधीच असली तरी आर.के.नारायण यांची हि पुस्तके आपल्या संग्रहात असली पाहिजे अशीच आहेत. तुम्हालाही हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल यात शंकाच नाही.

Tuesday 25 June 2013

''Friends..........''

                Hello Friends, कसे आहात सगळे? पाऊस काय म्हणतोय तुमच्या कडे ? आज इतक्या दिवसांनंतर काहीतरी लिहायचा मूड आला. म्हणून म्हंटल तुमची चौकशी करू थोडी !  
               काय मस्त वाटतंय आज! बाहेर मस्त पाऊस सुरुय, हवेत गारवा आहे. मस्त गाणे सुरु आहेत आणि सोबत तुमच्याशी गप्पा! वा !आज तो दिन बन गया …. । आज कस happy happy वाटतंय . कारण पण तसच आहे. आणि बहुतेक तुमचपण तसच होत असाव. अरे हो , कारण सांगितलच नाही मी तुम्हाला …… 
               काय झाल कि आज तब्बल एक वर्षानंतर मी माझ्या एका खास मैत्रिणीशी बोलले. आज तिचा वाढदिवस असतो. तस पाहायला गेल तर आम्ही एकाच गावात राहतो. पण बारावीच्या परीक्षेनंतर जश्या सगळ्यांच्या वाट वेगळ्या होतात तश्या आमच्या पण झाल्या. सगळे आपापल्या अभ्यासात busy झाले. त्यामुळे फक्त वाढदिवस असल्यावर एकमेकांना भेटतो किंवा फोन करतो. तर या सुट्ट्यांना वैतागलेली असतानाच आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आला. तुम्हाला सांगते इतक छान वाटल तिच्याशी बोलून . मस्त पुन्हा कॉलेजच्या दिवसांत गेल्यासारखं वाटल! 
             काय मज्जा असतेना मित्र-मैत्रिणींसोबतच्या त्या दिवसांची ! आणि कॉलेज मध्ये तर ग्रुपच असतात वेगवेगळे. मस्त कॉलेज बंक करून कालेज कॅम्पस मध्ये फिरायचं, फ्रेंड्ससोबत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारायच्या, वेळ पडल्यास आपली बाजू मांडण्यासाठी भांडायचं त्यांच्याशी. याच्या त्याच्या टवाळक्या करायच्या.  काही म्हणा पण अशा फालतू गोष्टी आपण फक्त आपल्या मित्र-मैत्रीनिनसोबतच करू शकतो . बरोबर न ? 
               खर पाहिलं तर आता फेसबुक मुळे आपण सगळेच जवळ आलोय. हव तेव्हा गप्पा मारता येतात फेसबुकवर. पण तरी आपल्या फ्रेंड्स सोबत घालवलेल्या दिवसांची मज्जा काही औरच असते. माझ तर जाऊद्यात, मी तर एक वर्षच भेटले नाही माझ्या फ्रेंड्सला,पण असे किती मित्र - मैत्रिणी असतात ज्यांचा कामामुळे किंवा दुसऱ्या गावी राहायला गेल्याने एकमेकांशी संपर्क तुटतो. अशा वेळी फक्त आठवणीच राहतात त्यांच्या जवळ कॉलेजच्या , आपल्या मित्र-मैत्रिणींच्या.……पण आता या अशा फ्रेंड्सला आपण फेसबुकवर भेटतो. आणि अशे आपले जुने फ्रेंड आपल्याला अचानक फेसबुकवर भेटल्याने काय छान वाटत ना ? अगदी बऱ्याचदा तर डोळे भरून येतात. 
           आज माझ्या सगळ्या जुन्या मित्र-मैत्रिणींची खूप आठवण येतेय. तुम्हाला येते का तुमच्या फ्रेंड्सची आठवण? माझ्या सारखा  वेडा आनंद होतो का त्यांना भेटल्यावर ?






Sunday 2 June 2013

''एक कधी न उलगडलेलं नातं ………. ''

             सासू-सून हे नातं कोडया सारखच असत. आता हे फक्त मला वाटत कि तुमच्या सगळ्याचं हेच मत आहे ते मला नाही माहिती. पण सासू- सून हे नातं असत बाकी मज्जेशीर! आपले पूर्वज सांगून गेलेत कि सासू-सून ह्या आई-मुली सारख्या असतात. पण माझ्या पाहण्यात तरी अजून अस घर नाही जिथे सासू-सुना आई आणि मुलीसारख्या राहत असतील ( टि. व्ही. सोडला तर!).
              प्रत्येक घरात सासू आणि सूनेच वेगळच रूप पहायला मिळत . आणि त्यांच्या तितक्याच तऱ्हासुद्धा !
काही  घरांत सासू आणि सून दोघी खाष्ट असतात तर काही घरांत सासू गरीब गाय आणि सून चंडीकेच दुसर रूप असते. काही घरांत याच्या उलट चित्र असत,सासू कजाग आणि सून मवाळ असते. आणि एकत्र कुटुंब असेल तर मग विचारूच नका! ( रोज घरात रामायण - महाभारत युद्ध !) आता यात गंमत अशी कि या सासू - सुनांच्या भांडणात नवऱ्यांच बिचाऱ्यांच भरीत होत. ( हिची बाजू घेऊ कि तिची!)
                तस काही म्हणा पण या सासू-सुनांना भांडायला कुठलही कारण पुरत बर का ! म्हणजे अगदी भाजीत मीठ कमी घातल इथपासून ते तिने केलेली खरेदी वा अजून कुठलही कारण असो यांची भांडण ठरलेलीच असतात. यांची भांडणाची कारण ऐकून आपल्याला हसू येईल ( नवऱ्यांना) पण या सासू-सुनांसाठी हीच कारण खूप महत्वाची असतात!
             नवऱ्याने हौशीने बायकोला साडी आणली तर आईचा ( सासूचा ) टोमणा ठरलेला असतो. आमचा मुलगा आता आमचा राहिला नाही किंवा मग बायको आली तर आईला विसरला ! सासुच हे वाक्य संपत नाही तर बायको इकडे नवर्याच्या कानात कुजबुजते '' जरा काही हौशीने आणल तर तुमच्या आईला पाहवत नाही!"
तसच बाहेर फिरायला गेल्यावर सुद्धा  बऱ्याच सासवांना वाटत कि मुलाने बाहेर जाताना एकदापण आपल्याला नाही विचारल. ….
            बऱ्याचदा काय होत कि सासू हि दोन्ही घरी ( माहेरी आणि सासरी ) एकत्र  कुटुंबात राहिलेली असते त्यामुळे सर्वाना सांभाळून राहाण आणि मोठ्या प्रमाणात काम करण्याची सवय तिला असते. तिचा हाच स्वभाव तिच्या सुनेकडे असावा अशी तिची इच्छा असते. पण ते शक्य नसत. आजच्या या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात मुलींना एकत्र कुटुंबात राहायची इच्छा  नसते.  त्यामुळे त्यांना अशा मोठ्या घरात राहाण कठीण जात. आणि मग सासू-सुनांचे खटके उडायला सुरुवात होते.
             असे खटके उडायला लागले म्हणजे सासू - सुना एकमेकींना समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाही हा प्रश्न मला नेहेमी पडतो. कुठल्याही नात्यात Understanding महत्वाची असते अस आपणच म्हणतो ना , मग या सासू-सुनांच्या नात्यात ते Understanding का दिसून येत नाही कोणास ठाऊक.माझ्या पाहण्यातल्या सगळ्याच सासवा काही वाईट किंवा कजाग नाहीत. सुनांबद्दल पण मी हेच म्हणेन. मग आता तुम्ही म्हणाल कि दोघी जर वाईट नाहीत तर त्यांची भांडण का होतात? 
            मुलगी लग्न करून जेव्हा सासरी येते तेव्हा तिच्या मनात एकच भीती असते कि आपली सासू कशी असेल. खर म्हणजे होत काय कि लग्ना आधी मुलीमुलींमध्ये सासू या व्यक्तीवर बरीच चर्चा झालेली असते. त्यातच जर एखादी मुलगी आधीच लग्न झालेली असेल तर मग ती तिच्या सासूच्या चहाड्या करते. आणि नको ते ( फुकटचे )उपदेश दुसऱ्या मुलींना करते. आता प्रत्येक सासूचा स्वभाव काय सारखा नसतो कि एकीची सासू अशी वागली म्हणजे दुसरीची पण तशीच वागेल ! 
            हि अशी भूत मुलींच्या डोक्यात घातली म्हणजे लग्नानंतर जर त्या मुलीला सासूला आईचा दर्जा द्यायचा असेल तर ती तो देत नाही. आणि जरी तो दिला तरी नंतर खटके उडायचे ते उडतातच. समजा सासू सुनेशी छान वागतेय सगळ सुरळीत चाललय आणि एखाद दिवशी सासू काही कारणा  वरून सुनेला रागावली तर सून लगेच ती गोष्ट माहेरी सांगते. सासू माझ्याशी छान वागते हे नाही सांगणार पण सासूबाई मला रागावल्या हे आधी सांगेल. या अशा सुनांना मला विचारावस वाटत कि जर सासू ऐवजी तुमची आई तुम्हाला रागावली असती तर तुम्ही एवढा बोभाटा केला असता का? नाही ना ? मग सासू थोड बोललीच तर बिघडत कुठे? ( हे मुलींना त्यांच्या नवऱ्याने समजवायला हव.)
                 काही - काही सुना तर इतक्या पुढच्या असतात न कि त्यांच्या बद्दल बोलायला शब्दच नसतात आपल्या जवळ! एखाद्या सुनेला सासू समजा बोलली कि तू आज भाजीत मीठ जास्त घातलय तर या सुना (सगळ्याच नाही म्हणत मी ) दुसऱ्या दिवशीपासून स्वयंपाक करणच सोडून देतात ! आणि कारण विचारलच तर म्हणतात सासूबाईना माझ्या हातचा स्वयंपाक पटत नाही !  असच घरातल्या इतर कामांच्या बाबतीत सुद्धा होत. मग होत काय कि घरात सून असून पण सासूलाच सगळी कामे करावी लागतात. हे तर एकच उदाहरण झाल एखादी सून जर नोकरी करत असेल आणि सासू जर चांगली असेल तर सुनेला हातभार म्हणून घरातली सगळी काम करून घेत असेल तर या सुनांना बरच होत. उलट सासूने एखाद दिवस काम नाही केल तर त्या चिडचिड करतात.
            एखादी सासू धार्मिक असली तर तिला वाटत कि आपल्या सुनेने सुद्धा उपवास, व्रत वैकल्य करावे. आणि अशा वेळी सून जर आडूनच बसली कि 'मी नाही करणार हे उपवास वगैरे , माझा त्यावर विश्वास नाही' तर भांडण हमखास होतात. माला मान्य आहे कि आजकालच्या मुलींचा अशा धार्मिक गोष्टींवर विश्वास नसतो (माझा सुद्धा नाही!). पण आपल्या उपवास करण्याने किंवा व्रत-वैकल्य केल्याने सासूला चांगल वाटणार असेल तर ते का करू नयेत. अशा वेळी आपण या गोष्टी मानतो कि नाही हे महत्वाच नसतच मुळी, आपण या गोष्टी केल्याने कोणाला तरी समाधान होईल हेच लक्षात ठेवायचं फक्त.दोघींच्या वागण्यात लवचिकता हवी.म्हणजे काय तर बदलांचा स्वीकार. सासूने जून सोडून द्याव सुनेने नवीन शिकव, इतकाच ! थोड तुझ खर थोड माझ खर. (बाजारात भाव टाव करताना नाही का आपण म्हणत "तुझाही जाऊदे आणि माझाही जाऊदे" अस म्हणून मध्यम मार्ग काढतो )समजूतदारपणात दोघींनी एक एक पाउल पुढे याव आणि अहंकारात एक एक पाउल मागे जाव.
                मला अस वाटत कि जश्या सुनांच्या सासू कडून, नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात तशा सासूच्या आपल्या सुनेकडून नसतील का? त्यांना पण तर मोकळीक हवीच असेल ना. त्यांना पण तर वाटतच असेल न कि संसाराच्या या रामरगाड्यातून निवृत्त व्हाव. मग सुनांनी त्यांना ती मोकळीक दिली तर काय होईल?माझ्या मते घरात मोठी माणस असली म्हणजे उलट घरातल्या लहान मुलांवर चांगले संस्कार होतात आणि सुनांना पण सासूची मदत मिळते.आणि कुटुंब बांधून राहते.
                बापरे!! एखादी सून जर हे वाचत असेल तर माझ्या नावाने खडे फोडत असेल नक्कीच कि काय मी सगळ्या सुनांबद्दल वाईट लिहितेय म्हणून ! पण अजून बरच लिहायचय मला ………पण आता जरा सासवांबद्दल बोलूयात. ……( हुश्श ! संपले एकदाचे सुनांचे गाऱ्हाणे करून!)
               घरातली सून जितकी चुकते तितकीच सासू पण चुकते बर का ! काही सासवा अशा सुद्धा असतात ज्यांना सून आली तरी घरातला आपला अधिकार सोडावासा वाटत नाही . सगळ आपल्याच पद्धतीने झाल पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. या साठी त्यांना सुनेचा छळ करावा लागला तरी यात त्यांना काही गैर वाटत नाही!
             अहो, काही काही सासवा तर हद्दच करतात. भाजी माहेरच्या पद्धतीने केली म्हणून सुद्धा सुनेचे गाऱ्हाणे करतात. उलट अशावेळी सुनेला समजवायचं , तिला  शिकवायचं कि ' बाई आपल्या कडे अशी भाजी करत नाही, मी शिकवते तुला ' ते राहत बाजूला, जेवायच्या वेळी मग कटकट करत बसतात. ती वेगळ्या वातावरणात वाढलेली असते. त्यामुळे आपणच थोड Adjust केल तर काय बिघडेल! 
              एवढे वर्ष मुलगा आपल्याला साडी आणतच होताना , मग आणली एखादी साडी बायकोसाठी तर साडीच कौतुक करायचं सोडून उगीच टोमणे काय मारायचे! आणि मुलाला त्याच आयुष्य बायकोसोबतच घालवायच असत त्यामुळे माझा मुलगा आता माझा राहिला नाही अस म्हणून सुद्धा काही उपयोग नसतो. उलट सून घरात आल्यावर स्वखुशीने घराचा ताबा तिच्या कडे देऊन मोकळ व्हायचं. '' मला दोन वेळेच जेवण घाल म्हणजे झाल " अस जर सासू म्हणाली तर सुनेलासुद्धा हुरूप येईल घरात काम करायचा. (administration चा सुद्धा नियम आहे एखाद्याकडे पूर्ण जबाबदारी सोपवली कि तो ती आत्मविश्वासाने पुरी करतो , कारण त्याला जाण असते कि आपल्या कृतीच्या चांगल्या वाईट परिणामांना तोच पूर्णतः जबाबदार राहील)तिला सुद्धा वाटेल कि हे घर आपल आहे. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे सासू बद्दल आदर वाटेल सुनेला! 
               मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला वाटेल कि मी खूपच Over लिहिलंय सासू-सुनांबद्दल, पण ह्या गोष्टी मी स्वत: लोकांच्या घरात घडताना पाहते. त्यामुळे त्यांच्या चुका लक्षात येतात. तुमच्या घरात जर अस घडत असेल तर तुमच्याही लक्षात या चुका याव्यात म्हणून मी हे सर्व लिहील. आणि अजून तुम्हाला हा अनुभव नसेल तर तो आल्यावर या चुका तुम्ही टाळू शकाल!(माझही घोडा मैदान अजून खूप दूर आहे!)
                
                  

Saturday 25 May 2013

"Turning Point..."

                आपल आयुष्य बदलेल अस काही तरी आपल्या आयुष्यात नेहेमीच घडत असत. मग ते चांगल्या पद्धतीने बदलत ,नाहीतर वाईट पद्धतीने. पण यातली एखादीच गोष्ट आपल्या स्मरणात आयुष्यभर राहते. माझ्या मते असले Turning Point प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असावेत. कधी आणि कसा हा Turning Point आपल्या आयुष्यात येतो ते आपल्याला पण समजत नाही. 
               मी माझ्या आयुष्यातल्या Turning Point चा विचार करते तेव्हा मला माझा अकरावी - बारावीचा कॉलेजचा काळच आठवतो.दहावीच्या निकाला नंतर मी आमच्या गावातील वाणिज्य शाखेसाठी प्रसिद्ध असलेल्या कॉलेज मध्ये अकरावी(वाणिज्य)ला  प्रवेश घेतला त्यावेळा या नवीन कॉलेजबद्दल मनात थोडी भीतीच होती. कॉलेज कस असेल, शिक्षक कसे असतील, त्यांची शिकवण्याची पद्धत, तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला जुळवून घेता येईल कि नाही. वगैरे वगैरे . आता हि भीती या साठी वाटत होती मला कारण कि मी दहावी पर्यंत ज्या शाळेत होते,तिथे माझी तुकडी होती क आणि मी होते ढ !भाषा विषय आवडायचे पण गणित भूमिती खूपच अवघड वाटायचं.तिथल्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत अवघड होती. ( ते मला मुळीच समजायचं नाही) त्यांनी शिकवलेलं सार डोक्यावरून जायचं त्यामुळे मी कधी अभ्यासाच्या बाबतीत सिरिअस झाल्याच मला आठवत नाही.  त्यामुळे दहावी सहामाहीत मी गणितात नापास झाले. झाल.  मम्मीने मला धारेवर धरल. माझी अभ्यासाची पद्धत बदललि. मानेवर जू ठेऊन अभ्यास करवून घेतला आणि मी झाले प्रथम श्रेणीत दहावी पास. पुढे त्याच शाळेत अकरावीसाठी प्रवेश न घेता नवीन चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचं ठरलं.
                                         या नवीन कॉलेजविषयी मला भीती वाटण साहजिकच होत. कॉलेज सुरु झाल त्या पहिल्या दिवशीच शिक्षकांनी शिकवायला सुरुवात केली होती. माझ्या  सवयी प्रमाणे मी कॉलेजची पुस्तक  सुट्टीतच वाचून काढली होती. त्यामुळे शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मला अगदी लगेच सांगता आली होती तेंव्हा. सुरुवात तिथूनच झाली आणि बहुतेक, कारण तेंव्हा दिलेल्या उत्तरांमुळे शिक्षकांच्या नजरेत माझ्यासाठी एक वेगळी जागा झाली होती. ( ती पुढे अजूनही टिकून आहे हे सांगायलाच नको )
              खर म्हणजे एन्झोकेम कॉलेजच अस आहे कि तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते आपल दुसर घरच वाटत. तस हे कॉलेज फार मोठ नाही. पण मुलांसाठी वाचनालय, संगणक वर्ग वगैरे सारख्या सुविधा आहेत. आणि याही पेक्षा सगळ्यात महत्वाच म्हणजे तिथले शिक्षक. मला आठवत नाही कि आमचे शिक्षक आम्हाला कधी रागावले असतील. त्यांनी आम्हाला नेहेमीच त्यांच्या मुलांसारखच वागवल. इथल्या शिक्षकांचं एक वैशिष्ट्य अस कि ते नेहेमीच विद्यार्थ्यांकडून शिकत गेले. आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मिसळण सोपं  झालय त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या या वागण्यामुळेच आम्हालाही ते नेहेमी आमच्यातलेच वाटत आले. या सर्व शिक्षकांबद्दल आमच्या मनात आदर होता पण भीती कधीच नव्हती. कॉलेजच्या ग्राउंडवर विद्यार्थी गप्पा मारत असले म्हणजे हे शिक्षक सुद्धा आमच्यात सामील व्हायचे. 
                  आयुष्याबद्दल, भविष्याबद्दल विचार करायलाही इथेच शिकले मी. मला चांगल आठवतय कि आमच्या Accountच्या सरांनी आम्हाला एक स्वप्न दाखवल होत. ते नेहेमी म्हणायचे कि ''तुम्ही आयुष्यात खूप मोठे व्हाल,मोठ्या पदावर जाल तेंव्हा तुम्हाला पुन्हा या कॉलेज मध्ये यायचय दुसऱ्या  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला. आम्ही आज ज्या स्टेजवर उभ राहून तुम्हाला शिकवतो, तिथे उभ राहून बोलायचय.''
ते अस बोलायचे तेंव्हा तर ते चित्र डोळ्यांसमोर उभ राहायचं आमच्या. माझ्या मते हि मी पाहिलेली पहिलीच शाळा असेल जिथे पुस्तकी ज्ञाना शिवाय इतर व्यावहारिक ज्ञान देण्यावरसुद्धा भर दिला जातो.
               या कॉलेजमध्ये येण्या आधी मी पुढे काय करायचं ह्या बद्दल माझ्या मनात विचार सुद्धा आला नव्हता. पण आता जर कोणी मला विचारल कि पुढे काय करायचय तर माझ्याकडे या प्रश्नच उत्तर आहे.
मला माझ्या करिअरची फिल्ड ठरवता आली ती आमच्या कॉलेजच्या Magzine मध्ये छापून आलेल्या माझ्या एका लेखामुळे. तो लेख छापून आला त्यावेळा ठरवून टाकल ( किंवा मग अस म्हणा कि मला तस ठरवता आल)आपल्याला  ह्याच फिल्ड मध्ये करिअर करायचं.( Journalism)
              खरतर या दोनच वर्षांत या कॉलेजमध्ये घडलेल्या कितीतरी गोष्टींनी माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टी कोण बदलला. या कॉलेज बद्दल जितक सांगाव तितक थोडच वाटतय. त्यामुळे थांबते आता. 
             तुमच्या आयुष्यात आलाय का असा Turning Point ज्याने तुमच आयुष्य बदलल?



                  

Thursday 23 May 2013

''कार्टूनच्या जगात हरवलेली पिढी ………. ''

            ही आजकालची  पिढीना सारखा विचार करायला भाग पाडते मला. कधी त्यांच्या शिक्षणात झालेल्या बदलांमुळे तर कधी अजून कशा  मुळे . आज सुद्धा असच झाल. सकाळी वृत्तपत्र वाचताना  मुलांच्या टि. व्ही. पाहण्याच्या वाढत्या प्रमाणाची बातमी वाचली आणि मग ठरवलच आज माझ्या छोट्या भावासोबत टि. व्ही. बघायचा . म्हणजे समजेल तरी हि मुल  एवढ काय पाहतात त्या टि. व्हि. वर . पण तुम्हाला सांगते अगदी अर्ध्या तासातच मला अस वाटल कि मी तो टि. व्ही. तरी फोडावा नाहीतर या कार्टूनच्या channle बद्दल तक्रार तरी दाखल करावी.  
              तुमच्या घरी कोणी लहान मुल आहे का?  असेल तर त्यांच्या सुट्ट्या सुरु झाल्या असतील न? नाही म्हणजे मला विचारायचय कि तुमच्या घरात पण आमच्या घरातलच चित्र आहे का ? कार्टून , व्हिडीओ गेम्स. (वैताग नुसता !). तुम्हाला सांगते  ना मी आताच्या या मुलांना सुट्टी लागली म्हणजे आई - बाबांना वैतागच वाटतो. आणि का नाही वाटणार म्हणा ! अहो, हि मुल  त्या टि.व्ही. पुढून हलायलाच तयार  होत नाहीत. जेवण करताना सुद्धा अर्ध लक्ष त्या टि. व्ही. मधेच असत त्याचं. ( आपण काय खातोय या कडे सुद्धा लक्ष देत नाहीत ते. जेवण पोटात ठुसायचं  काम करतात तेवढ ). 
           म्हंटल आज पाहूच माझा छोटा भाऊ एवढ काय पाहतो त्या टि.व्हि. वर ! ( सारखा त्या डबड्याला चिकटून असतो !) अरे , तुम्हाला सांगते मी, असली घाणेरडी कार्टून असतात ना ती कि विचारूच नका . मला वाटल होत आपण पाहायचो लहानपणी  तशी असतील Tom & Jerry सारखी . पण कसल काय .  अहो, काही काही कार्टून तर मोठ्यांनी पण पाहू नयेत असलेच आहेत त्या पोगो आणि कार्टून नेटवर्क वरचे ! ( ओगि अएन्ड कोक्रोच). त्या डोरेमोन  मध्ये तर त्या एवढ्याश्या पोराची चक्क गर्लफ्रेंड पण आहे! बेन टेन मधले चेहेरे तर इतके विचित्र आहेत कि लहान मुलच काय मोठे पण  घाबरून झोपेतून उठतील. 
            आणि विशेष काय तर  मुलांना हि कार्टून फारच प्रिय आहेत. ( खर म्हणजे त्यांना या कार्टूनच व्यसनच लागलय ). त्यांच्या विरुध्द काही बोलल म्हणजे माझा भाऊ तर खूपच चिडतो.……  आपल्या सुट्ट्या काय सॉलिड असायच्या नाही  का? सुट्ट्या सुरु झाल्या म्हणजे आपला पाय कधी घरात टिकायचाच नाही . आणि घरात असलो तरी भावंडांशी बैठे खेळ खेळायचो.  सागर गोट्या , काचापाणी, बिट्या , आट्या  - पाट्या, लगोऱ्या, डब्बा express, आणि मुलींची भातुकली तर इतकी रंगायची कि विचारूच नका ! आणि एवढे खेळ खेळूनही पुढच्या वर्षाचा अभ्यास असायचा तोही पूर्ण करायचो आपण . 
          आताच्या या मुलांना तर ह्या खेळांची नाव सुद्धा माहित नाही. त्यांच्या सुट्टीच जग फक्त टि.व्हि. आणि कॉम्प्यूटर पुरतच मर्यादित झालाय. आपण टि. व्ही. बघायचो नाही अस नाही म्हणत मी . पण त्याला सुद्धा मर्यादा होत्याच कि! आपण पाहायचो ते कार्टून अगदी नेहेमी स्मरणात राहील असच असायचं . मोगली , सिम्बा , स्पायडर मन यांचे गाणे सुद्धा आईकायला किती छान वाटायचे . 
           आता बरेच आई - बाबा नोकरी करतात म्हणून मग मुलांना कुठल्या - कुठल्या शिबिरांना पाठवतात. त्यामुळे मुलांना सुट्टीत मामाच्या गावी जायची किंवा अजून कुठल्या गावी जायची मज्जासुद्धा नाही अनुभवता येत. 
           गम्मत अशी कि माझ्या भावाला आणि त्याच्या मित्रांना मी ह्या गोष्टी सांगितल्या तर ते काय म्हणतात माहितीय ? म्हणे '' तुमची जनरेशन वेगळी होती, आमची जनरेशन वेगळी.  त्यामुळे  थोडा तरी बदल व्हायला हवा ना !'' ( म्हणजे आम्ही दिवसभर त्या टि.व्हि.लाच चिकटून बसणार! )
           दुसर अस कि हे मुल परीक्षेत नेहेमी पहिले असतात . पण परीक्षा संपल्यावर त्यांना काही विचारल तर त्यांना सांगता नाही येत. या उलट चित्रपटांचे गाणे किंवा एखाद्या कार्टून बद्दल विचारल तर लगेच उत्तर देतात !  म्हणजे त्यांच्या अर्थाने त्यांना जी प्रगती वाटतेय ती खरतर अधोगतीच म्हणायला नको का? 
           आता या अधोगतीतून या मुलांना बाहेर कस काढायचं हा प्रश्न बऱ्याच आई - बाबांना  पडताना दिसतो. कारण काय आहे कि मुलांना जर टि.व्हि. पाहू नकोस अस रागावल तर ते खूप चिडचिड करतात. बाहेर खेळायला तर हकलावच लागत त्यांना. या तंत्रज्ञानामुळे निसर्गापासून सुद्धा खूप लांब गेलेल्या या मुलाचं भविष्य काय असेल ते सांगता येन कठीण झालय. पण ते अंधारात नसेल अशीच आशा आपण करू शकतो.



Sunday 12 May 2013

"झोप..."

            माझ्या मते असे खूप कमी लोक असतील या पृथ्वीतलावर ज्यांना झोप प्रिय नसेल आणि असे झोप प्रिय नसलेले टिटवीच्या कुळातले लोक सोडले तर मग बाकी सगळे कुंभकर्णाच्या कुळातलेच म्हणावे लागतील . ( निदान  माझ्या पाहण्यातले तरी ) .
             झोप म्हंटल कि हा जसा आपल्या सगळ्यांचा Weak Point बनतो आणि अशातच दुपारची झोप  (वामकुक्षी ) जरा जास्तच प्रिय असते आपल्याला . हा, आता हि वामकुक्षी अगदी रोजच नाही घेता  येत आपल्याला . पण ऑफिस मध्ये बसून रविवारची वाट पाहत या वामकुक्षीच प्लानिंग बरेच जण करतात . मग एकदाचा रविवार आल्यावर विचारूच नका . सकाळी तर बारा वाजे पर्यंत झोपतातच पण दुपारच्या स्पेशल मेनूच जेवण झाल्यावर पुन्हा वामकुक्षी असतेच. पण गंमत म्हणजे अशा वामकुक्षीच्या वेळी कोणी ना कोणी येउन झोपेच खोबर नक्कीच करत. कोणाचा तरी फोन तरी येतो . नाहीतर दारावर सेल्समन येउन बेल तरी वाजवतो किंवा मग औचित पाहुणे तरी येतात . मग अशा वेळी चरफडत मनात अशा  लोकांना शिव्या घालण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही .
            काय एक एक तर्हा असतात लोकांच्या झोपायच्या ! एक किस्सा आठवतो . माझी बहिण आजीकडे राहाते. तिलाही झोप अगदीच प्रिय आहे  आणि गंमत अशी कि ती एकदा झोपली म्हणजे तिला उठवायला ढोल ताशेच वाजवावे लागतात. असच एकदा आजीकडचे सगळे बाहेर गेले होते  आणि बहिण एकटीच घरी होती . हि दुपारी झोपून गेली आणि संध्याकाळी घरचे सगळे बाहेरून आल्यावर दर वाजवताच आहेत , तरी हि उठायलाच तयार नाही . बर खिडकीतून उठवण्याचा प्रश्नच नाही. आजीच घर दुसऱ्या मजल्यावर होत तेव्हा. मग शेवटी शेजाऱ्यांच्या घरातून आजीच्या गच्चीवर जाऊन तिथून एक पाण्याची नळी खिडकीतून आत सोडली आणि बहिणीच्या अंगावर पाणी टाकून तिला उठवल  होत ( ती अजूनही तितकीच गाढ झोपते हे सांगायलाच नको ).
              तुम्हाला तुमचे झोपेचे काही गमतीशीर अनुभव आठवतात का ? असच झोपेच एक उदाहरण द्यायचं म्हंटल म्हणजे सगळ्यांनी आपला अभ्यासाचा काळ आठवावा. अभ्यास करताना पुस्तक हातात घेतल म्हणजे कुठून का होईना झोप येतेच डोळ्यांवर. आणि परीक्षेच्या वेळी तर विचारूच नका! परीक्षा असल्यावर आपण सकाळी साडेचार पाचलाच अभ्यासाला उठतो . पण थोड्यावेळातच पुस्तक हातात घेऊन डुलक्या घ्यायला सुरुवात  होते.पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एखादी छान कथा किंवा कादंबरी वाचताना ती पूर्ण केल्याशिवाय मुळीच झोप येत नाही ( मला.).
             आता मला खर सांगा मित्र - मैत्रिणींनो तुमच्या पैकी किती जण कॉलेजमध्ये एखाद्या बोरिंग लेक्चरला शेवटच्या बाकावर जाऊन बसतात आणि झोप काढतात किंवा काढायचे ? ऑफिसमध्ये जर एखादी बोरिंग मिटिंग चालू असेल तर तेव्हा सुद्धा आपल्याला झोप आल्याशिवाय राहत नाही , बरोबर ना ?
              असा झोपेचा विषय निघाला म्हणजे मला लहानपणापासून नेहेमीच अस वाटायचं कि सुट्ट्या ह्या उन्हाळ्या ऐवजी हिवाळ्यात असाव्यात. कारण काय कि माझी शाळा सकाळी सात वाजता असायची आणि मग हिवाळ्यात माऊ गोधडीतून  बाहेर निघायचा  मला भारी कंटाळा यायचा ( खर तर रागच यायचा ).
              या झोपेच मला एका बाबतीत नेहेमीच नवल वाटत कि एक दिवस जर तुम्ही एका विशिष्ट वेळी झोपलात तर दुसऱ्या दिवशी त्याच वेळी तुम्हाला झोप आलीच म्हणून समजा !थोडक्यात काय तर बाकी कुठल्याही गोष्टीची सवय व्हायला वेळ लागतो . तस झोपेच्या बाबतीत होत नाही. आणि झोपेच नाव काढल्यावर सुद्धा लगेच झोप येते किंवा झोपावस वाटत. (निदान मला तरी )
              आता झोपेवरच हे भाष्य मी जरा आटोपतच घेते. कारण झोपेबद्दल इतक बोलल्यामुळे मलाच झोप यायला लागलीय . 
                                     ..................................................…………………

                 माझा हा लेख माझ्या सगळ्या झोपाळू मित्र - मैत्रीणीना .



Saturday 11 May 2013

'' माझी क्रोश्याची ABCD....''

   आपण सगळेच आयुष्यात एकदातरी ABCD शिकत असतो. बरोबर ना?मला वाटत कि प्रत्येकच गोष्टीची  ABCD हि असतेच. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा पाया हो!
     आजची माझी हि ABCD क्रोश्याच्या विनकामाची आहे. म्हणजे काय आहे कि सध्या सुट्ट्या सुरु आहेत . मग काय करायचं  हा खूप मोठ्ठा प्रश्न दत्त म्हणून समोर उभा असतो . म्हणून म्हंटल कि काहीतरी हटके करूयात.
      आईच्या मागे लागून क्रोश्याची ABCD शिकून घेतली . मग काय विचारता , आता तर क्रोश्याची प्रत्येक गोष्ट बनून पहायचा सपाटाच लावलाय मी . आणि तस पाहिलं तर क्रोश्याची ABCD आली म्हणजे पुढच्या गोष्टी आपोआपच सुचत जातात . (अस मला वाटत .)
        या काही मी बनवलेल्या छोट्या पर्स चे नमुने इथे देत आहे . या पर्स मी अगदी एका दिवसात एक अशा बनवल्या आहेत . तुम्हालाही ह्या नमुन्यांवरून नवीन नवीन कल्पना नक्की सुचतील. तुम्ही बनवून पहा. आणि मलाही तुमची कल्पना नक्की सांगा . ……






Friday 10 May 2013

'' तुम्हाला आता कस वाटतंय ?''

            नाशिकच्या चिखलीकरांच संपत्ती प्रकरण चांगलच गाजलंय  सध्या . आता हे एवढ सगळ झालय म्हंटल्यावर मिडियावाले त्याच्या घरी गेले नाहीत म्हणजेच नवल.… चिखलीकरांच्या आई - वडिलांना काय प्रश्न विचारावा या मिडियावाल्यांनी? '' तुम्हाला आता कस वाटतंय ?''  
             आता हा प्रश्न  हास्यास्पद आहे …..... आता तुम्ही सांगा काय वाटणार आहे त्या चिखलीकरांच्या आई - वडिलांना ( आनंदाने पेढे वाटतील का ते! ). हे मिडियावाले कुठे आणि कोणत्या क्षणी  कोणाला '' तुम्हाला आता कस वाटतंय ?'' विचारतील काही सांगता नाही येत .
               अहो, शेतकऱ्याने  आत्महत्या केली तर हे त्याच्या बायकोला जाऊन विचारतात कि '' तुम्हाला आता कस वाटतंय?'' आता ज्या बाईच्या नवऱ्याने आत्महत्या केलीय तिला आनंद तर होणार नाही !
              असे प्रश्न या मिडियावाल्यांनाच सुचतात बर का फक्त.. परीक्षेत यश मिळवलेल्यांना पण सगळ्यात आधी '' तुला आता कस वाटतंय ?'' हाच  प्रश्न विचारतात आणि मग बाकीच्या चौकश्या करतात .
            तुम्हाला आठवत असेल कि काही दिवसांपूर्वी मुंबईत  इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली . तेव्हा हे मिडियावाले हॉस्पिटल मध्ये गेले आणि तिथे एका जखमीला ( ज्याचे हात - पाय आधीच मोडले होते!) हे जाऊन विचारताय कि ''तुम्हाला आता कस वाटतंय?''.   तीच गत बॉम्बस्पोटाच्या वेळीही बघायला मिळते.  आपले पोलिस जखमी अवस्थेतही लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत असतात आणि हे मधेच जाऊन त्यांना विचारतात '' तुम्हाला आता कस वाटतंय ?''
           पत्रकारितेच शिक्षण घेतानाच असा प्रश्न विचारायचा हे शिकवतात कि काय कोण जाणे ! एखाद्या अभिनेत्याला पुरस्कार भेटला तरी '' तुम्हाला आता कस वाटतंय?" आणि पुरस्कार नाही भेटला तरी यांच आपल '' आता कस वाटतंय ?'' आता बिचाऱ्यांना वाईट वाटत असल तरी काय सांगतील. मग तोंड देखल काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात.( मग काय करतील म्हणा!) दुसऱ्याच्या मनाचा विचारच करत नाहीत हे त्यामुळे '' तुम्हाला आता कस वाटतंयची?'' यांची लामणच संपत नाही.
                 मला तर वाटत कि या मिडियावाल्यांनाच  कोपच्यात घ्याव एक दिवस आणि मग त्यांनाच विचारावं "आता तुम्हाला कसं वाटतंय ?''


Tuesday 16 April 2013

कापूस पिंजून ठेवलाय जसा …….

                 हि गोष्ट तशी आता फार जुनी झालीय. आता मी प्रथम वर्षाला आहे. आणि मी जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या अगदीच लहानपणीची आहे. तरी माझ्यासाठी खूप जवळची आहे .
                   माझा असा अनुभव आहे कि माणसाला माणस जशी जवळची वाटतात ना तितकेच प्राणी पक्षी सुद्धा जवळचे वाटतात. आणि अशा वेळी ते प्राणी पक्षी पाळण साहजिक असत. माझ म्हणाल तर मला माणसांपेक्षा प्राणी पक्षीच जास्त जवळचे  वाटतात.
                   या सगळ्याची सुरुवात मी ३-४ वर्षांची असताना झाली बहुतेक. झाल अस कि पप्पांचा एक मित्र सशे पाळायचा तेव्हा. तो त्याच काय करायचा हे मला नाही माहित. पण पप्पांनी त्याच्याकडून एक अगदीच छोटस सश्याच पिल्लू आणल होत आम्हा दोघी बहिणींसाठी.
                      तुम्हाला सांगते मित्र मैत्रिणींनो ते पिल्लू इतक छोटस होत कि पप्पांच्या तळ हातावर अगदीच सहज मावायचं . खरच सांगायचं तर त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर मी आणि माझी बहिण खूप घाबरलो होतो बर का !
             आता हे पिल्लू आणल म्हणजे ते आमच्या घराचाच एक सदस्य बनणार हे नक्की होत . पण आमच्या या नवीन सदस्याला हात लावायला सुद्धा घाबरायचे मी ( तो चावेल अशी भीती वाटायची). पण तुम्हाला सांगते त्याच ते कापसासारख रूप पाहूनच मी त्याच्या जवळ जाण्याची हिम्मत केली आणि काय गंमत अगदी दोन तीन दिवसांतच माझी आणि त्याची गट्टी जमली !
            या आमच्या गोंडस पिल्लाच नाव आम्ही ''ससुली'' ठेवल . या आमच्या ससुलीचे जितके किस्से सांगेल मी तितके कमीच म्हणायचे . माझ्या आयुष्यातले लहानपणीचे सगळ्यात चांगले क्षण मी या ससुली सोबतच घालवलेत अस म्हंटल तर ते चुकीच नाही .
            ससूला आमच्या घरात रुळायला जास्त वेळ नाही लागला . काही दिवसांतच तो आमच्या सगळ्यात अगदी छान मिसळला. तस या शहाण्याचे नखरे सुद्धा काही कमी नव्हते बर का !  साधारण पणे  तो घास- गवत खाणार असच आपण गृहीत धरतो. पण याने घास खाण्याबरोबरच अजून भरपूर पदार्थ सुद्धा खाल्ले.(Chocolate,  बिस्कीट, जेम्स, कणिक , पोळी )
              ससुच्या खाण्याचे एक एक किस्से खूप विचित्र आणि गमतीचे होते. मम्मी पोळ्या करायला किचन मध्ये गेली म्हणजे या पठ्ठ्याला ते कस समजायचं कोणास ठाऊक पण हा मम्मीच्या आधी किचन मध्ये जाऊन पोहोचायचा आणि मग मम्मी त्याला कणकेचा तुकडा देत नाही तोपर्यंत तिच्या पायात घुटमळायचा तो. असच पप्पांच्या बाबतीत सुद्धा करायचा तो. आपण कस लहान असताना पप्पांना म्हणायचो ते बाहेरून आल्यावर कि 'पप्पा मला काय खाऊ आणला?' तसच हा लबाड पप्पा येण्याची वेळ झाली म्हणजे दारात जाऊन बसायचा आणि पप्पा आल्यावर जोपर्यंत ते त्याला काही खाऊ ( जेम्स, बिस्कीट)देत नाही तोपर्यंत त्यांना घरात नाही येऊ द्यायचा . तो खाऊ त्याच्या पुढे टाकण्या  इतका सुद्धा दमधीर नसायचा त्याला. पप्पांच्या अंगावर उड्या मारून मारून बेजार व्हायचा तो . आम्ही जेवायला बसल्यावर सुद्धा तीच गत ह्याची. पहिले याला जेवायला द्यायचं आणि मग तो आमच्या सगळ्यांच्या मधेच बसून जेवणार (एकट्याने तर तो कधीच नाही जेवला).
                असच आम्ही सगळे जर पलंगावर बसलेले असलो तर याने कधीच खाली थांबू नये. उड्या  मारून धडपडत तोसुद्धा वर येऊन बसणारच. आता तुम्ही म्हणाल कि ससा पाळला म्हणजे घरात घाणच घाण  होत असणार ……… तर तस काहीच नाहीय . कारण या ससुला आम्ही एक जागा ठरवून दिली होती. त्याने तिथेच जाऊन घाण करायची हे त्याला शिकवायला आम्हाला जास्त वेळ नाही लागला . ( तसा तो जात्याच हुशार होता) दुसर सांगायचं म्हणजे आम्ही त्याला त्याचे कान पकडून कधीच नाही उचलल. लहान बाळाला जस उचलतो आपण तसच उचलून घ्यायचो आम्ही त्याला .
                ससूची अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे त्याला घरातली माणस  बरोबर ओळखता यायची आणि त्यांना तो कधीच चावायचा सुद्धा नाही . पण जर बाहेरच कोणी घरी आल तर या पठ्याने त्यांना बाहेरच्या बाहेरच त्यांच्यावर ओरडून, त्यांना चावायची भीती दाखवून पळवून लावाव.
              तस आम्ही त्याला खूप जपायचो. मांजर वगैरे तर घराच्या आसपास पण फिरकू नाही द्यायचो. पण एकदा चुकून  ससू घराच्या बाहेर राहिला रात्री. बर ते त्याच्या ओरडण्याने वेळीच लक्षात आल आमच्या आणि आम्ही सगळे बाहेर पळालो. नाहीतर मांजराने तिथेच संपवलं असत त्याला . पण त्यानंतर तो कधीच एकटा घराच्या बाहेर नाही पडला एवढ मात्र नक्की .
          माझ्या सोबत खेळायलाही याला खूप आवडायचं बर का ! त्याचा एक लाल रंगाचा बॉल होता,तो आपण त्याच्याकडे लोटायचा मग तो बॉल तो परत माझ्याकडे लोटत आणायचा . आणि जर मी निवांत बसलेली असेल तर हा येऊन माझ्या जवळ बसायचा आणि माझा हात पूर्ण चाटून काढायचा .
          ससुला एकट  सोडून आम्ही कधीच  गावाला नाही गेलो आणि तशी जाण्याची वेळ आलीच तर आम्ही सगळे दार खिडक्या व्यवस्थित बंद केली आहेत कि नाही हे पाहायला आर्ध्या रस्त्यातून परत यायचो . (नाहीतर मग त्यालाच सोबत न्यायचो. ) मी अगदी पाचवी - सहावीत जाईपर्यंत होता तो आमच्या घरी . या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या . तो माझा भाऊ - मित्र सगळच होता.
            अस म्हणतात कि सश्याच आयुष्य कमीच असत . हाही असाच एकदा आजारी पडला . दवाखान्यात नेल तर ताप आला होता. घरी आणल्यावर मात्र त्याने लगेचच शेवटचा श्वास घेतला . त्यावेळा मी खूपच  एकटी पडले होते . आणि त्याच्या जाण्यामुळे तितकीच रडले सुद्धा होते . तो अजूनही बऱ्याचदा आठवतो मला. त्याचा तो मऊ स्पर्श आठवतो आणि मग मन पुन्हा आठवणींच्या गावी जात .
              त्यानंतर माझ हे प्राणी पक्षी प्रेम वाढत गेल. मी रोज झाडावरच्या कावळ्यांना सुद्धा पोळी खायला द्यायचे( आता कावले क्वचित दिसतात तो भाग वेगळा).   पुढे मग मागच्या वर्षी आम्ही एक आफ्रिकन पोपट सुद्धा पाळला होता . त्याच्या पोटावर छान लाल रंगाचा पट्टा होता . त्याच्या बद्दलही सांगेल तुम्हाला पुन्हा कधीतरी . तो जास्त दिवस नव्हता आमच्या सोबत.  पण तो सुद्धा असाच जीव लाऊन गेला आम्हाला .
             खर म्हणजे माझ अजूनही मन भरत नाही आणि मला अजून अजून प्राणी पक्षी हवे आहेत . आता मी लव बर्डस आणायचे म्हणून पप्पांच्या मागे लागलेय . ते कधी घरी येतील ते तर माहिती नाही मला पण मी पुढेही अशीच प्राणी पक्ष्यांसाठी वेडी राहील हि मात्र खात्री आहे .………
                  तुम्ही पाळलाय का कधी असा कुठला प्राणी? तुमच काय मत आहे या पाळीव प्राण्यांबद्दल ? तुम्हाला आवडतात का ते ?








Tuesday 9 April 2013

माझे स्वयंपाकाचे कुटाणे !

                  बऱ्याच दिवसांपासून मी या विषयावर लिहायचा विचार करत होते . पण काही न काही करणा मुळे  ते जमत नव्हत . शेवटी आज या विषयावर लिहायचा योग आला . पण विषयाला हात घालण्या आधी जरा अर्पणपत्रिका का काय म्हणतात ती द्यावीशी वाटली म्हणून देतेय . तर मी हा लेख माझ्या मम्मीला अर्पण करतेय. कारण मी आज जे स्वयंपाकाचे कुटाणे शिकलेय ते तिच्या मुळेच. मम्मी पाककलेत निपुण आहे हे सांगायलाच नको.
                     खर म्हणजे आता स्वयंपाक करण हा सुद्धा शिक्षणाचा भाग बनलाय आणि मुल मुली दोघेही या क्षेत्रात यायला उत्सुक असल्याचे दिसून येते. आपल्याला नेहेमीच वाटत कि स्वयंपाकाच शिक्षण घ्यायचं म्हणजे Hotel Management करायला हव. पण मला अस मुळीच नाही वाटत , कारण माझ म्हणाल तर मी Hotel Management कराव अशी माझी मुळीच इच्छा नाही. पण हो, स्वयंपाकात निपुण होण्याची मात्र आहे. 
मी मुलगी आहे म्हणजे मला स्वयंपाक शिकण  गरजेच आहेच. त्यात काय नवीन ? अस तुम्ही नक्की म्हणाल. पण अस मुळीच नाही. कारण आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. पूर्वी  पंधरा सोळाव्या वर्षी पर्यंत मुलीना सगळा स्वयंपाक यायचा. पण आता जर तुम्हाला हौस असेल आणि काही नवीन पदार्थ बनवण्याची आवड असेल तरच तुमची पाऊल किचन कडे वळू शकतात . कारण आता मुलीना आपल शिक्षण आणि करिअर या गर्तेतून वेळच भेटत नाही त्यामुळे सुद्धा आणि आता पूर्वी सारख लग्न जमवताना मुलीला स्वयंपाक आलाच पाहिजे अशी आट  सुद्धा कमी झालीय. म्हणजे थोडक्यात काय तर बऱ्याच जणांना चमचमीत खाण्याची आवड तर असते पण बनवता मात्र काहीच येत नाही. याच जिवंत उदाहरण जर तुम्हाला हव असेल तर ते म्हणजे माझी बहिण . माझी बहिण  माझ्या पेक्षा १ वर्षाने मोठी आहे . तिलासुद्धा चमचमीत खायला भयंकर आवडत पण बनवता मात्र काहीच येत नाही आणि आवड्सुद्धा नाही त्यामुळे ती किचन कडे वळतच नाही . ( मला कधी कधी प्रश्न पडतो कि पुढे हीच कस होणार ?)
                      खर म्हणजे आपण आयुष्यात कधी ना कधी काही बनवण्यासाठी किचन मध्ये जातच असतो . कोणी स्वइच्छेने जात तर कोणी नाईलाजाने जात…… तुम्ही जर शिक्षणासाठी रूम घेऊन बाहेर राहत असाल तर स्वयंपाक करण्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल . बर्याचदा हे अनुभव मजेशीर असतात . माझ्यावर अजून तरी अस बाहेर राहण्याची वेळ आलेली नाही पण माझे स्वत:चे सुद्धा  काही अनुभव आहेत. काही मजेशीर तर काही खूप काही शिकवून जाणारे ……… 
                     माझी मम्मी माझ्या या स्वयंपाकाला बऱ्याचदा '' कुटाणे'' म्हणते म्हणून मग आजच्या लेखाला नावही तेच दिलय मी . 
                   मी बनवलेली पहिली वहिली डिश म्हणाल तर ती मला मुळीच आठवत नाही. खरतर मी स्वयंपाक करायला कधी सुरुवात केली तेच आठवत नाही. पण सातवी - आठवीत गेले तेव्हा मम्मी किचन मध्ये असली म्हणजे मी तिच्या मागे मागेच असायचे एवढ मात्र नक्की आठवत.  हे काय आहे ? त्याने काय होत ? मग हि भाजी अशीच का करायची ? कणिक भिजवताना मीठच का घालायचं ?एक ना अनेक प्रश्न असायचे माझे आणि त्या सर्वाना मम्मीची योग्य उत्तर सुद्धा मिळायची. मुळातच आई स्वयंपाकात, नवीन पदार्थ शिकण्यात खूप हौशी. त्यामुळे संडे स्पेशलचा आमचा मेनू काहीतरी नवीनच असतो नेहमी. खरतर मी स्वतः चायनीज फूडची शोकीन आहे. त्यामुळे म्यागी सारख्या नुडल्स मी सुरवातीला बनवायला शिकलें. नंतर हाक नुडल्स,फ्राईड  राइस यात हात अजमावला. त्यात इतकी तरबेज झालेय कि आता त्यातहि चीज, वाटाणे अस  काहीही घालून पाहण्याचे प्रयोग चालू आहेत (अर्थात स्वतःवर)
                   आईच्या नोकरीमुळे तिला बर्याचदा माझ्यासाठी काही बनवायला वेळ नसायचा . मी शाळेतून आले कि ती घरी नसायचीं. नेहमीच्या भाज्यांचा कंटाळा यायचा (त्याला तिचे ऑप्शन असे कि साखरांबा पोळी, लोणच पोळी खा किंवा पापाडचा खुडा पोळी खा मी कितवीत तर आठवीत, नववीत)मग मीच मला हव ते बनवायचे. Gas  वर सांभाळून काम करून (हि  आईची सूचना). याच काळात माझ स्वयंपाकाच प्याशन वाढत गेल. 
                     नाश्त्याचे सगळे पदार्थ, पोळीचा चुरमा, कोरड्या भाज्या, फुलके असे बरेच प्रकार मी या काळात शिकले. पण अजूनही बऱ्याच गोष्टी शिकायच्या बाकी आहेत ( अजूनही मला घडीच्या पोळ्या आणि ओल्या भाज्या जमत नाहीत बर का )!
                    आपल्या पैकी बऱ्याच जणांना काही भाज्या खाण्याचा कंटाळा नक्कीच असतो. मग त्यात काही हटके का करू नये?जस बघा जर तुम्ही नॉन - व्हेज खात असाल तर मग तुम्ही कुठल्याही कोरड्या भाजीत अंडे टाकून परतल्यावर ती भाजी पोळीसोबत खाऊ शकतात.  उदा. जर घरात भेंडीची कोरडी भाजी बनवली असेल आणि तुम्हाला त्यात काहीतरी नवीन हव असेल तर ती भाजी कढईत एका अंड्यासोबत परतून घ्या. ( अर्थातच हा प्रयोग मी स्वत: करून पहिला आहे. ) 
                    काही महिन्यापूर्वीचा एक अनुभव अजूनही स्मरणात आहे .मुंबई साईडला कच्या केळ्या ची भाजी तशी नेहेमीच केली जाते . आपल्याकडे म्हणजे नाशिक औरंगाबाद साईडला फार क्वचित हि भाजी माहिती असते . मी मुंबईला आज्जी कडे गेले होते तेव्हा हि भाजी खाल्ली होती. ( पण तिने ती कशी केली हे मात्र माहित नव्हत ) घरी परत आल्यावर हट्टाने मम्मीला कच्ची केळी आणायला सांगितली आणि माहिती  नसताना आपण उपवासाला बटाट्याची भाजी करतो तशी भाजी केली. अर्थातच ती भाजी आज्जी सारखी नव्हती तरी एक वेगळी छान भाजी शिकण्याचा तो अनुभव मस्त होता ……
                  असच काही दिवसांपूर्वी पराठे बनवताना पण झाल होत . रोजच्या भाजी पोळीचा कंटाळा आला होता म्हणून मग पराठे बनवायचे अस ठरवल . आपण पराठे पुरणाच्या पोळीसारखे सारण  भरून बनवतो हे मला माहित होत. म्हणून मग पहिले पराठ्याच पीठ भिजवून घेतल आणि बटाटे वाफवायला म्हणून बटाटे आणायला टोपलीकडे  वळले तर बटाटे संपलेले होते . आता काय ? हा प्रश्न दत्त म्हणून समोर उभा राहिला . मग थोड डोक चालवलं  आणि वाटाणे, कोथिंबीर, मिरची , आल , मीठ आणि जिरे पावडर अस मिक्सर मध्ये वाटून घेतल आणि ते मग त्या कणकेत टाकून पुन्हा कणिक एकजीव केली ( म्हणजे ते सारण भरायचा ताण  नको) आणि त्याचे पराठे लाटून ते फुलक्यासारखे भाजून घेतले म्हणजे तेल पण कमी लागते.  घरातल्या सगळ्यांनाच ते फार आवडले आणि मला एक नवीन रेसिपी शिकता आली . 
                  आपण अजून असे बर्याच भाज्यांचे पराठे बनवू शकतो बर का ! म्हणजे ते पुरण भरण्या एवजी त्या मिश्रणातच पीठ भिजवायचं ( बटाटे, कोबी , मुळा  अश्या भाज्या बारीक वाटून घ्यायच्या आणि मग त्यात पीठ भिजवायचे ) जरा काही हटके हव असेल तर तुमची एखादी रेसिपी बनवू शकता तुम्ही अशीच . 
                    अंड्याची चटणी  करताना त्यात थोडी भाजीची शेव घालायची. ते सुद्धा छान लागत . इडली फ्राय किंवा अंडा फ्राय सुद्धा माहिती असेल बऱ्याच जणांना. चिकन थोड्या तेलात आणि भरपूर साऱ्या लसुन आणि मिरचीच्या तुकड्यासोबत वरती शिजवल्यावर त्याची सुद्धा वेगळी चव लागते. 
                    असे तुमचे सुद्धा इनोव्हेशन असतील ना ? आणि तुम्ही जर पदार्थ बिघडेल या भीतीने अजूनही काहीच केल नसेल तर करून बघा. भरपूर नवीन गोष्टी शिकता येतील तुम्हाला ………… 
         

Sunday 3 March 2013

एक कटिंग चाय ……

         '' भैया,एक कटिंग देना !!"…हे कॉलेज जवळच्या कुठल्याही टपरीवर एकू येणार वाक्य ….बरोबर ना ? एक कटिंग चाय म्हणजे नुसतीच एक कटिंग ( खासकरून अस्सल मुंबईकरांसाठी ) दमलेल्या , थकलेल्या जीवांची हि रोजची सोबतीण असते ! याच कटिंगच्या सोबत आपण काय काय गोष्टी करत असतो,ठरवतो, बिघडवतो, घडवतो आणि अजून बरच काही करत असतो .  कधी टिंगल टवाळी  करतो, तर कधी थट्टा मस्करी करतो  आणि कधी कधी फुल टू असलेल टेन्शन याच कटिंग चाय बरोबर उडवून लावतो ! वडा-पाव आणि एक कटिंग चाय या दोघांनी अनेकांची भूक शमवली आहे. रिमझिम पाऊस  आणि सोबत मित्र ( किंवा कधी ती किंवा कधी तिच्या आठवणी )
          गरमा - गरम भजी आणि एक स्पेशल कटिंग चाय हे समीकरण आपल्याला गणिताच्या समीकरणापेक्षा  लवकर समजत !  नाक्या - नाक्यावरल्या टपऱ्या आणि तिथली लोकांची गर्दी हा खरतर संशोधनाचा विषय बनलाय.मी अस का म्हणतेय हे पहायचं असेल तर  औरंगाबादच ''अझहर टी हाउस'' आणि कोलकताच  ''इंडिअन टी हाउस '' यांना एकदा नक्की भेट द्या . मित्र-मैत्रिणींनो बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कि ''कटिंग चाय''म्हणजे असत तरी काय? खरतर हा शब्द मुंबईतच पहिल्यांदा वापरला गेला.… दुध, साखर, आल्याचा मसाला आणि हिरवा चहा  एका मोठ्या किटलीत  उकळवतात  आणि गरमा गरम प्यायला देतात , यालाच ''कटिंग'' म्हणतात कारण या चहाची चव खूप कडक ( strong) असते . बऱ्याच  शहरांमध्ये या कटिंग चायची स्पेशल दुकाने असतात आणि अशा या दुकानांचे काही खास बिस्कीट किंवा बन ( मस्का) असतात जे या कटिंग चाय सोबत दिले जातात. किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे sandwich सुद्धा असतात .
            तर मित्र-मैत्रिणींनो, या कटींगच आणि आपल सुत जमत खरतर कॉलेजला असताना. कॉलेजमधली आख्खी तरुणाई या टपरीवर आणि एका कटिंगवर जीव ओवाळून टाकत असते  ! परिक्षेच टेन्शन, पोरीची लफडी किंवा मग सिनियर - जुनियरमधल टशन या सगळ्यावर एक कटिंग चाय हा एकच उतारा असतो!
            अनेक कवी - लेखकांची हि जवळची मैत्रीण असते बर का! हिच्या सोबतीने कवी आपल्या कविता रचतात आणि लेखकांना लेखनाचे नवे विषय हिच्या सोबतीत सापडतात . बऱ्याचदा या कटिंगच्या घोटासोबत कोणाला आपल पाहिलं  प्रेम प्रकरण सांगायचं असत तर कोणाला आपण आणखी एका लफड्यातून  कसे ( सुखरूप) सुटलो हे सांगायचं असत .
            कोणी बायकोची सहन न होणारी कटकट सांगत तर कोणी आयुष्याला शिव्या देत देत तीन-चार कटिंग रिचवत ……… कोणी नुकत्याच वाढलेल्या पगाराची पार्टी म्हणून किंवा नुकत्याच लागलेल्या नोकरीची पार्टी म्हणून '' हवी तेवढी प्या रे !!'' अस म्हणून सगळ्यांना खिजवत असतो .



           
                कारण अनेक असतात पण जागा आणि कटिंग एकच असते. हि कटिंग चाय कधी ना कधी आपल्या आयुष्यात येत असते आणि आपल्याला तिच्या प्रेमात पाडत असते.…. तुम्ही पडलाय का कधी अशा कटिंगच्या प्रेमात?














Sunday 10 February 2013

खजिना........

          आमच्या घरी प्रत्येक रविवारी काही ना काही पसारा निघतच असतो... आता तुम्ही म्हणाल कि रविवारी बऱ्याच घरात साफसफाई होतच असते त्यामुळे पसारा निघणारच! पण आमच्या घरातला हा पसारा आम्ही मुद्दाम साफसफाईसाठी काढतो अस नाही..... तो काही ना काही कारणामुळे आपोआपच निघत असतो.......
          आज सुद्धा असच झाल. आज हा पसारा निघण्याच कारण होत कुंडली .... माझ्या मोठ्या बहिणीला तिची कुंडली पहायची होती .........आता हि कुंडली इतक्या वर्षांत कुठे ठेवली गेलीय हे कोणाच्याच लक्षात राहिलेलं नाही.... सगळ्यांनी आपल्या आपल्या शकला लढवल्या, आईने कपाटात शोधलं, बाबांनी सगळे ड्रॉवर धुंडाळून काढले.....पण कुंडली सापडली नाही....आता हि शोधाशोध सुरु असताना मी त्यात सहभाग घेणार नाही हे शक्यच नसत...... आता हि कुंडली जिथे सापडेल अशी जागा मी सुचवली.अशी एकच जागा घरात उरली होती जिथे हि कुंडली सापडली असती आणि ती जागा म्हणजे आमच्या माळ्यावर वर्षानुवर्ष ठाण मांडून असलेल्या काही पेट्या आणि सुटकेस...... आता या पेट्या आणि सुटकेस उघडायच्या म्हणजे माझ्यासाठी ते एखादा खजिना सापडायसारखच  आहे. फक्त माझ्यासाठीच नाही तर ज्यांना अशा जुन्या वस्तू , कागद पाहण्याची आवड आहे त्यांना सगळ्यांनाच अशा जुन्या वस्तू आणि कागदांनी भरलेल्या पेट्या खजिनाच वाटतात.......
आणि या अशा जुन्या कागदांच्या आणि वस्तूंच्या मागे बऱ्याच मजेशीर, काही भावनिक गोष्टीसुद्धा असतात बर का....!
             " आपण या पेट्या फक्त कुंडली शोधायची आहे म्हणून उघडत आहोत. बाकीच समान उचकून पाहत बसायचं नाही." पेट्या उघडण्यापूर्वीच आईने हि सूचना केली आणि साहजिकच ती सूचना माझ्यासाठी होती...
आईची हि सूचना अगदी निमुटपणे मी मान्य केली आणि सर्व पेट्यापासून थोड लांब बसले.
             आईने त्या पेट्यामधून वस्तू एकेक करून बाहेर काढून ठेवल्या तशी माझी चुळबुळ सुरु झाली आणि नंतर नेहेमीप्रमाणेच आईचे लक्ष नसताना हळूच या पसाऱ्यात  घुसले.
            तुम्हाला सांगते मित्र-मैत्रिणिनो , या सगळ्या पसाऱ्यात आईने अगदी १९९० वगैरे पासूनच्या वस्तू आणि कागद सांभाळले आहेत! आणि काही तर अगदी ती शाळेत असतानापासूनचे समान आहे! या सगळ्या वस्तू तिला कोणी कोणी भेट म्हणून दिल्यायत. काही तिला भेटलेली बक्षीस आहेत, तर काही कागदांवर आम्ही लहान असताना आमच्या मोठ्या मोठ्या अक्षरांत आजीला लिहिलेली पत्र......., दिवाळीला आप्तांनी दिलेली भेट कार्ड आहेत. प्रत्येक वेळा रांगोळी स्पर्धेत नंबर मिळवल्यावर वृत्तपत्रात त्याबद्दल आलेल्या बातम्यांचे कागद असोत कि आईने लिहिलेल्या वृत्तपत्रांतल्या लेखांचे कागद असोत....तिच्या विणलेल्या विणकामाचे patern असोत कि तिने काढलेल्या चित्रांचे पेंटिंग असोत. सगळ तिने या पेट्यामध्ये वर्षानुवर्ष सांभाळून ठेवलय.....( तिची हीच सवय आम्हाला लागलीय....तिच्यासारखच मीसुद्धा अशा बऱ्याच गोष्टी आठवणी म्हणून सांभाळून ठेवल्यायत आणि सांभाळतेय)......
            तर आता मी या पसाऱ्यात उडी टाकली म्हणजे मी तिला प्रत्येक कागद आणि छोट्या छोट्या वस्तूबद्दल प्रश्न विचारत होते आणि ती सगळ्या गोष्टी सांगत होती......थोडक्यात काय तर आम्ही दोघी कुंडली शोधायला बसलोय हे विसरून गेलो होतो..........असच असत नाही का मित्रानो, खरतर आताच्या पिढीला या सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवण म्हणजे मूर्खपणा किंवा गबाळ वाटत. पण अशा सांभाळून ठेवलेल्या वस्तू आणि कागदांमध्ये ज्या आठवणी असतात त्या आपल्याला आठवणींच्या गावी घेऊन जातात.......जिथे आपण पुन्हा ते शाळेचे दिवस किंवा मग आपल्याला आनंद देणारे क्षण जगात असतो......बरोबर बोलतेय ना मी?
      आता तुम्हीच सांगा कि आजच्या या संगणक आणि मोबाईलच्या जमान्यात वाढलेल्या मुलांना भेट कार्डाच किंवा आप्तांच्या पत्रांच महत्व कस समजेल?  आपण सगळेच कधी ना कधी या आठवणींच्या गावी जाताच असतो आणि पुढेही जातच राहणार आणि हा आठवणींचा खजिना अनुभवत राहणार.......



Friday 25 January 2013

तोंडी लावणे.....

         आपले भारतीय लोक जगण्यासाठी नाही खात तर खाण्यासाठी जगतात.आपण सगळेच खाण्याच्या बाबतीत खूप चोखंदळ आहोत,आपल्या जीभा फार चाटूरया आहेत. पूर्ण भारतात सगळ्या राज्यात प्रांत प्रांतात जेवण मसालेदार,चमचमीत बनत,म्हणून दिल्लीत चांदणी चौक, इंदोरमध्ये खाऊ गल्ली तर हैद्राबादमध्ये उस्मानिया बिस्कीट प्रसिद्ध आहेत.पाश्चिमात्यांच्या मिळमिळीत चवि आपल्याला मानवत नाहीत, मग आपण पिझा, चायनीज फूडला भारतीय चवीचा तडका देतोच.   बरोबर ना? ............. सकाळी नाश्त्याला उपम्यासोबत लिंबाच गोड लोणच असल म्हणजे उपमा अजून छान लागतो, पोह्यावर ओल खोबर पेरायलाच हव,फोंडणीच्या खिचडीसोबत पापड आणि लोणच  हव,
             रोजच्या जेवणात तोंडी लावायला लोणच किंवा चटणी किंवा कोशिंबीर हवी,.......... आणि बरच काही. आपण आपल्या रोजच्या जेवणातल्या भाज्यांमध्ये टाकल्या जाणाऱ्या मसाल्यांबद्दल जितके आग्रही असतो तितकेच रोजच्या जेवणात चटणी, कोशिंबीर आणि लोणच्यासारखे विविध तोंडी लावण्याचे प्रकार असावेत यासाठीही तितकेच आग्रही असतो.
          खर तर अस कोणीच नसेल ज्यांना लोणच  किंवा कोशिंबीर सारखे प्रकार आवडत नसतील.तोंडाला पाणी सुटल ना.मी कोशिंबीर आणि लोणच्या बद्दल बोलतेय म्हणजे तुमच्या नजरेसमोर नक्कीच आपल उन्हाळ्यात बनवले जाणार लोणच किंवा लिंबाच गोड लोणच आणि दही आणि काकडीची कोशिंबीर आली असेल.....बरोबर ना?
           पण अशा या उन्हाळी लोणच्या बरोबरच रोज बनवता येतील असे सुद्धा लोणच्याचे प्रकार आहेत  बर का.......!! आणि वेगवेगळ्या कोशींबीरींचे सुद्धा ....!!
          आणि अशी लोणची बनविण्याची कृती सुद्धा खूप सोपी असते.........
          आपल्या पैकी बऱ्याच जणांना फ्लॉवर  आवडत नाही ( मला सुद्धा ..). पण याच फ्लॉवरच  झटपट लोणच अगदी चविष्ट लागत. या लोणच्या साठी लागणार साहित्य नेहेमी आपल्या घरात उपलब्ध असत. तस या लोणच्या साठी आपल्याला फक्त तेलाच्या  फोडणीची  गरज असते ( तेल + मोहोरी + हिंग+ +हळद+तिखट). बारीक चिरलेल्या फ्लॉवरमध्ये  हि फोडणी गार करून ओतायची आणि वरतून लिंबू आणि मीठ टाकून कालवायचे. म्हणजे हे रुचकर लोणच तयार होत.
          या लोणच्या सारखच आपण आंब्याच्या दिवसांत कैरीच सुद्धा झटपट लोणच बनवू शकतो. वरच्या सारखीच फोडणी बनवून त्यात बारीक चिरलेली कैरी टाकायची..... असच आपण गाजर  किंवा काकडीच लोणचही बनवू शकतो बर का.........
           आपल्या भारतीय संस्कृतीत अगदी पूर्वीपासूनच तोंडीलावायच्या पदार्थांना खूप महत्व दिले गेले आहे. आणि तितकच महत्व हे पदार्थ ताजे, प्रत्येक दिवशी नवे बनवलेले असायलासुद्धा ............
           कोशिंबीर  तशी आपल्या सगळ्यांनाच खूप आवडते. पण काहीना दही आवडत नाही म्हणून कोशिंबीर पण  नाही आवडत. पण मग आपण सगळे पदार्थ खावेत म्हणून आपल्या आईने आपल्यासाठी बिन दह्याच्या कोशिंबिरीचे प्रकार शोधून काढले आहेत. त्यातली एक म्हणजे गाजराची कोशिंबीर. किसलेल्या गजरात जीऱ्याची फोडणी टाकून वरतून साखर, लिंबू, तिखट, मीठ, आणि वाटल्यास शेंगादाण्याचा कुट टाकायचा म्हणजे हि कोशिंबीर तयार. असाच एक पदार्थ मी माझ्या आई कडून शिकले तो मेथीचा खुडा. निवडलेल्या मेथीची पण थोडी चिरून त्यात तेल, मीठ , तिखट टाकायचं आणि पोळी सोबत किंवा नुसत खायचं. असच आपण कुठल्याही पालेभाजीसोबत करू शकतो.....हवा असल्यास त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा आणि टमाटा  घातला तरी चालतो.कोथिंबीर +बारीक कापलेली हिरवीमिरची+थोड लाल +तिखट+कच्च तेल मीठ हे सगळ एकत्र करून हाताने चांगल कुस्करून घ्या, बघा कसा झणझणीत खुडा होतो ते.आणि पापडाचा खुडा तर बहुतेकांनी लहानपणी खाल्लाच असेल, त्यात आता मोठेपणी कोथिंबीर कांदा घालून खा .
                हे सगळेच पदार्थ अगदी पूर्वीपासूनच खाल्ले जातात बर का.....म्हणजे थोडक्यात काय तर आपण अगदी पूर्वीपासूनच आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचा समावेश आपल्या जेवणात करतो.मग आताच त्याला सलाड सलाड म्हणून का नावाजा ?









Wednesday 9 January 2013

अस्वस्थ मनाची स्पंदने....

   

   आजकाल घडत असलेल्या प्रत्येक घटनेचा विचार केला तर अस लक्षात येईल कि प्रत्येक घटनेचा परिणाम सगळ्यात जास्त तरुणाईवरच होतो. चांगला-वाईट दोन्ही प्रकारे. या तरुणाईचे मन नेहेमी अस्वस्थ, भांबावलेले, द्विधा मनस्थितीत असते........
      शिक्षण क्षेत्राचा जर विचार केला तर या क्षेत्राबद्दल  तरुणाईच्या मनात मोठ्या प्रमाणात नैराश्य दिसून येते शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना भरमसाठ डोनेशन आणि फी भरावी लागते. पण शिक्षणाचा दर्जा अगदीच खालावलेला असतो. छोट्या शहरातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना हुशार असून सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे त्यांच्या हुशारीला योग्य दिशा मिळत नाही. शिक्षकांचेही योग्य मार्गदर्शन त्यांना मिळत नाही.  पुस्तकी शिक्षण पद्धती आणि प्रात्यक्षिक-व्यवसायाभिमुख शिक्षणाचा अभाव  यामुळे या तरुणाईला आपले भविष्य अंधकारमय दिसते .
       फक्त पुस्तकी अभ्यास शिकवण्यापेक्षा प्रात्यक्षिक स्वरुपात तरुणाईला अभ्यासाची ओळख करून दिली तर त्यांना त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल... साध उदाहरणच घ्यायचं म्हंटल तर शाळा-महाविद्यालयात आपल्याला संगणकाचे जे प्रशिक्षण दिले जाते त्याचा काहीच उपयोग आपल्याला पुढील आयुष्यात नोकरीच्या ठिकाणी होत नाही. प्रत्यक्षात प्रत्येक कंपनीचे,कार्यालयाचे,बँकांचे स्वतः चे वेगळे सोफ्टवेअर असते. त्याचे प्रशिक्षण कुठेच मिळत नाही.तसेच पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत सुद्धा घडते. प्रत्यक्ष पाठ वेगळा शिकतो आणि व्यवहार वेगळा असतो.
     राजकारणी नेत्यांच्या शिक्षणसंस्थांमध्ये  प्रवेश घेण्यासाठी भरलेली भरमसाठ फी आणि डोनेशन तशाच मार्गाने परत मिळविण्यासाठी हि तरुण पिढी आपल्या व्यवसायात गैरमार्गाचा अवलंब करते.
      आपल्या पैकी बऱ्याच जणांनी टि.व्ही. वर लागणारी एक जाहिरात पहिली असेल........वर्गात वाद-विवाद स्पर्धा सुरु आहे आणि तिचा विषय आहे '' राजकारणी आणि भ्रष्टाचार .'' विषयाच्या दोन्ही बाजूंनी बोलणारे विद्यार्थी अचानक उठून एकमेकांना मारायला लागतात, खुर्च्या - टेबल तोडतात, अगदी शिक्षकांच्या समोरचा माईक उचलून त्याने सुद्धा एकमेकांना मारतात.......आपल्या संसदेत अशा प्रकारचे चित्र आपल्याला नेहेमी पाहायला मिळते. त्यावर हि जाहिरात काढली आहे. तरुण पिढी जे बघते तेच शिकते म्हणून नेत्यांना व्यवस्थित वागण्याचे आवाहन या जाहिरातीतून सरकारने केले आहे. नेत्यांनी केलेले करोडोंचे घोटाळे, भ्रष्टाचार यामुळे राजकारणाकडे तरुणपिढी वळत नाही आणि राजकारणात पदार्पण केले तरी तिथेही नैराश्याच त्यांच्या पदरी पडते.या सगळ्याला वैतागून या विरुद्ध आवाज उठवते. पण त्यांचा आवाज ऐकणारा या राजकारणात कोणीच नाही हे लवकरच लक्षात येउन मनातल्या मनात आपल्या व्यवस्थेला कोसणं फक्त त्यांच्या हाती राहत.याचंच उदाहरण म्हणजे श्री.अण्णा  हजारेंच भ्रष्टाचार विरूद्धच आंदोलन.... अशा आंदोलनांमध्ये तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला . पण याची निष्पत्ती  काय? या नेत्यांमध्येच दुफळी दिसल्यावर तरुणाईने त्याकडे पाठ फिरवली.
        बऱ्याचदा हे लक्षात येते कि आपल्या राजकारण्यांपेक्षा हि तरुण पिढी समजदार आहे आणि तिने ते वेळोवेळी दाखवूनही दिले आहे....... पण राजकारणात घुसलेली हि तरुणपिढी ज्या राजकारण्यांच्या आधारे राजकारणात येते त्यांनी पक्ष बदलला कि हे तरुण वाऱ्यावर सोडले जातात.दिशाहीन होतात. आणि मग त्यांची उर्जा अनाठाई खर्च होताना दिसते.
         या सगळ्याला कंटाळून हि पिढी एक तर परदेशी जाण्याचा मार्ग निवडून भौतिक सुखांचा आनद लुटण्याचे स्वप्न पाहते  किंवा मग आध्यात्माकडे वळते.पण इथे तरी काय वेगळ आहे?............ रोज उठून एक साधू, बापू, गुरु, महादेवी तयार होतात. पण लोकांना गीता, रामायण-महाभारत आणि अध्यात्माच ज्ञान देणाऱ्या यातल्या किती साधू आणि बाबा-बुवांना खरच गीतेचा अर्थ समजलाय?
हा प्रश्न माझाच नाही तर सगळ्या तरुण पिढीचा आहे....अशा अध्यात्माकडे वळल्याने तरुणाईची ऊर्जा वाया  जात आहे. त्यांच्या या उर्जेला योग्य दिशा, उद्द्येश्य मिळाले तर उद्याचा आदर्श नागरिक घडू शकेल.
          सध्या या बाबा-बुवांमध्ये राजकारणात जाण्याची 'क्रेझ' भरपूर दिसून येते. त्यामुळे आध्यात्माकडे बघण्याचा तरुणाईचा दृष्टीकोन उदासीनतेने भरलेला असतो.
          का प्रत्येक क्षेत्राबद्दल असे घडते या तरुण पिढीचे? कुठे चुकतो आपण त्यांना समजून घ्यायला?
          विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि त्यात जर मुल एकटेच असेल आणि आई-बाबा दोघेही नोकरी करणारे असतील तर मुलांना सोबतीची, एखाद्या समवयस्क माणसाची कमतरता नेहेमीच जाणवते. ज्यांच्या जवळ ते आपल मन मोकळ करू शकतील, आपले मत व्यक्त करू शकतील.....आणि अशातच ज्या अवस्थेत मुलांना आई-वडिलांची जास्त गरज असते तेव्हा आई- बाबा मुलांना आपले निर्णय स्वत: घ्यायला सांगतात.त्यामुळे काय बरोबर आणि काय चूक ह्याचा गोंधळ उडतो आणि मुलांची द्विधा मनस्थिती होते.अशा वेळी दिशा भूल होऊन हि पिढी वाईट मार्गाला जाते.
        मित्रानो आणि मैत्रिणिनो, आपण जर इतिहास पहिला तर सुभाषचंद्र बोस असो(यांनी राष्ट्रप्रेमाचे स्वप्न तरुणाई समोर ठेवले),स्वामी विवेकानंद (यांनी बलशाली भारत उभा करण्यास तरुणांना आव्हान केले) किंवा महात्मा गांधी (यांनी अहिंसेने स्वराज्य मिळवण्याचे प्रत्यक्ष उदाहरणच घालून ठेवले)असोत, सगळ्यांना जास्त पाठींबा होता तो तरुण पिढीचाच! आणि या महान लोकांनासुद्धा माहिती होते कि हि तरुण पिढीच देशाला पुढे नेऊ शकेल .......... मग आता का हे लक्षात येत नाही कि भविष्य तरुणाईच्या हातात आहे.....या अन अनुभवी पिढीला हवी योग्य दिशा,योग्य मार्गदर्शन आणि योग्य मार्गदर्शक नेतृत्व !
         या तरुण पिढीची होत असलेली घुसमट, अस्वस्थ करणारे प्रश्न कधी एकले जातील? कधी एकली जातील हि अस्वस्थ मनाची स्पंदने?