Tuesday 8 March 2022

'तो इन मर्दो को किस बात का गुरुर?’


‘सर्व स्तरांतील महिलांचे प्रश्न सारखेच असतात, असं म्हणून सगळ्याच महिलांना तू एकाच पारड्यात कसं बसवते?’ हा प्रश्न काही वर्षांपूर्वी मला माझ्या ‘व्हायवा’च्या वेळी विचारला गेला होता. आज अडीच-तीन वर्षं उलटून गेल्यावरही या प्रश्नाचं वेगळं काही उत्तर मला सापडत नाही. आर्थिक परिस्थितीवरून किंवा शैक्षणिक पात्रतेवरून महिलांचं होणारं दमन वेगळं आहे, किंवा ती शिकली म्हणून पूर्ण स्वतंत्र झाली, असं अजून तरी कुठे बघायला मिळालेलं नाही.
दरवर्षी ‘जागतिक महिला दिन’ जवळ आल्यावर महिलांचा उदोउदो करण्यासाठी सज्ज झालेल्या अनेकांना पाहून मला पुन्हा हा प्रश्न आठवतो आणि जाणवते ती पुरुषी विचारांनी, पुरुषप्रधान संस्कृतीने कुठे न कुठे फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी बाईची केलेली गळचेपी. अशी घुसमट, गळचेपी अनादी काळापासून थोड्याफार फरकानं सारखीच असल्याचे दिसते. यासाठी ‘महाभारता’तील द्रौपदीचं उदाहरण पाहता येईल. लग्नानंतर पाच पुरुषांचा पती म्हणून तिला स्वीकार करायला लावताना जसा तिच्या भावनांचा विचार केला गेला नाही, तसाच सारीपाटात तिची बाजी लावतानाही केला गेला नाही. पुढे झालेले वस्त्रहरणसुद्धा स्त्री उपभोगाची आणि विजय मिळवण्याची ‘वस्तू’ समजूनच झाले.  
आज काळाबरोबर चांगली नोकरी, उत्तम पगार, घरची श्रीमंती हे सगळं अनेकींना मिळालं आहे. पण नोकरी करायला मिळाली, घरी आर्थिक सुबत्ता आली, म्हणजे आपण स्वतंत्र झालो, हा विचार किती केविलवाणा आहे! तसं पाहता, स्वत:च्या नोकरीतली बढती घ्यायची की नाही, किंवा नव्या नोकरीतून आलेली संधी स्वीकारायची की नाही, हे किती महिला घरातल्या पुरुषांना न विचारता ठरवू शकतात? किंवा अविवाहित, घटस्फोटीत, एकट्या राहणाऱ्या किती महिलांचा समाजाकडून सहज स्वीकार केला जातो, हे वेगळ सांगायला नको!
पुरुषाशिवाय महिलांचं वेगळं अस्तित्व आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीकडून कायम नाकारलं गेलं आहे. पण मुळातच बारकाईनं अभ्यास केला तर लक्षात येतं की, फक्त काही सामाजिक आणि शारीरिक गरजेपोटी बाईलाही पुरुष आयुष्यात हवे असतात. मात्र हा कमीपणा मान्य नसल्यानं पुरुषांकडून तिला निसर्गत:च मिळालेलं श्रेष्ठत्व बळाचा वापर करून दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो.
याचं अजून एक उदाहरण म्हणजे अगदी औरंगाबादसारख्या स्मार्ट सिटी बनू पाहणाऱ्या शहरातही माझ्यासारख्या एकट्या मुलीला राहण्यासाठी घर मिळणं दुरापास्त होतं. हा अर्थात केवळ माझा एकटीचाच अनुभव नसून माझ्यासारख्या एकटीनं नोकरीसाठी मोठ्या शहरात राहणाऱ्या अनेकींचा अनुभव आहे. ‘एकटी मुलगी राहणार’ या विचारानेच अनेक पुरुष आपले कैवारी बनतात. शिवाय एकटी मुलगी म्हणून बदलणाऱ्या सूचक, बोचऱ्या नजरांनाही कित्येक वेळा सामोरं जावं लागतं. ‘ती एकटी काही करू शकत नाही. कमावते, नोकरी करते म्हणून काय झालं, आमच्या मदतीची तिला गरज पडेलच’, हे विचार तर न संपणारे.
पण लॉकडाऊनच्या काळात जेव्हा पुरुष घरात बसून होते, तेव्हा अनेक ठिकाणी महिलांनी घराचा आर्थिक भार कणखरपणे सांभाळला. या काळात सर्वाधिक अत्याचार महिलांवरच झाल्याचे अनेक सर्वेक्षणांतून समोर येऊनही कुठेच न डगमगता खंबीरपणे उभ्या राहिलेल्या या स्त्री जातीला खरंच पुरुषी आधाराची किती गरज असणार आहे!
घरातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. उच्चशिक्षित, लाखोंनी पैसा कमावणाऱ्या महिलांना ‘बाहेरचं जग वाईट आहे, त्याची तुला कल्पना नाही’, हे वाक्य प्रेमाचा टॅग लावून का होईना ऐकवलं गेलं नाही, अशा महिला बोटावर मोजण्याइतक्याच सापडतील. हेच सगळं कमी शिकलेल्या, नोकरी न करता घर सांभाळणाऱ्या महिलांच्या बाबतीतही होतं. मग कोणत्या वर्गातली महिला स्वातंत्र्य उपभोगताहेत असं म्हणायचं?
मुळातच ही जी मोडकीतोडकी मोकळीक मिळाली, त्याला स्वातंत्र्य तरी म्हणता येईल का? तिने सोशिक, समंजस असावं, प्रेमात आणि संसारात जे त्याग करावे लागतील, ते तिनेच करायचे असतात, हेच संस्कार कायम माझ्यासारख्या अनेकींवर पूर्वीपासून होत आले. त्यामुळे मनाला पटत नसतानाही तोंडातून ‘ब्र’सुद्धा न काढता महिला सहज पडती बाजू घेतात. हे औदार्य पुरुषांमध्ये मात्र फारच कमी दिसतं. उलट स्वत:च्या पराभवाचं खापरही अनेक पुरुष घरातील बाईच्या माथी टाकून मोकळे झालेले दिसतात.
दुसरा मुद्दा अत्यंत संवेदनशील आणि क्वचित बोलला जाणारा आहे. खरं तर स्त्रिया जात्याच स्वभावानं फार हळव्या असतात. त्यामुळे जे बाहेरच्या जगात मिळत नाही, ते प्रेम, स्वातंत्र्य, आदर त्या आपल्या जोडीदारात शोधतात. काही अंशी त्यांना ते मिळत असलं तरी चार भिंतीतही जोडीदारासोबत कितपत मोकळ व्हायचं यालाही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. किमान भारतात तरी! त्यामुळेच अजूनही स्वत:च्या लैंगिक भावनांबद्दल बोलण्याचं धारिष्ट्य स्त्रिया करत नाहीत. आपण खूष नाही, हे कळालं की, जोडीदार रागवेल किंवा चांगल्या घरातल्या बायका ‘तसल्या’ भावना बोलून दाखवत नाहीत वगैरे वगैरे. आणि जर बोलून दाखवलंच तरी तिच्या इच्छेचा, अपेक्षेचा किती विचार केला जातो?
आपल्याला जसं जगावंसं वाटत, तसं जमत नसलं तरी, ‘मला असं वाटतं..’, हे सांगणं आजही महिलांना जमत नाही. स्वत:च्या भावना सांगतानाही घाबरणाऱ्या महिला मग समोरच्याचा अंदाज घेत; अंधारात चाचपडत जगत राहतात. मात्र ज्या अशा विषयाला तोंड फोडून खऱ्या स्त्री-मुक्तीची विचारधारा पेरण्याचा प्रयत्न करत, स्वत:च्या मनानं जगण्याचं धारिष्ट्य दाखवतात, त्यांना ही पुरुषी व्यवस्था ‘समाजविघातक’ ठरवून मोकळी होते. याची अनेक उदाहरणं बघायला मिळतात.
‘शक्ती, संपत्ती और सदबुद्धी ये तिनो औरतें हैं, तो इन मर्दो को किस बात का गुरुर?’ अशी स्त्रियांची महती सांगणारा ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमामधला आलिया भटचा एक संवाद सध्या सगळीकडे चर्चेत आहे. खरं तर स्त्री-स्वातंत्र्याचा सगळा मुद्दाच ‘मर्द का गुरुर’, ‘पुरुषी अहंकार’ यावर टिकून आहे. जिथं आपल्या अहंकाराला धक्का बसणार नाही, तेवढंच स्वातंत्र्य या पुरुषसत्ताक समाजानं महिलांना देऊ केलं आहे. पुरुषांमध्ये महिलांना काबुत ठेवण्याची लालसा, हाव तयार होते, ती या अहंकारामुळेच.
गंमत म्हणजे, मी माझ्या बायकोला, मुलीला, प्रेयसीला हवं तसं वागण्याची मोकळीक दिली आहे, हे सांगतानाही पुरुष आपला अहंकार कुरवाळत असतो! आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीकडून जोवर हा अहंकार गोंजारला जातो, तोवरच तीला त्याच्याकडून स्वातंत्र्य मिळतं. एकदा तो दुखावला गेला की, त्याची जागा ‘पुरुषी विकृती’ घ्यायला लागते. या विकृतीचे परिणाम आपण आपल्या आजूबाजूला रोज बघतो. या सगळ्यावर समाजमाध्यमांचाही खूप पगडा असलेला दिसतो.
वर्षातून एकदा ‘जागतिक महिला दिनी’ तिच्या कामाचं, कर्तृत्वाचं, बाईपणाचं कोडकौतुक करून तीला मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव करून देणं, याला ‘पुरुषी अहंकार’ सुखावण्याचाच भाग म्हटला तर खोटं ठरणार नाही. मात्र यात वाईट काही असेल तर ते हे की, महिलांना हे आभासी स्वातंत्र्यच खरं वाटून याची भुरळ पडते. या आभासी पुढारलेपणाच्या पांघरुणाखाली मिळणाऱ्या स्वातंत्र्यात अजून किती काळ त्यांना आपलं अस्तित्व शोधावं लागणार आहे, कोण जाणे!