Friday 5 September 2014

''आयुष्य घडवणारे सर........''

 आज ५ सप्टेंबर , अर्थात शिक्षक दिन …. आपल आयुष्य घडवणारे असे  खूप कमी शिक्षक असतात.  अशाच माझ आयुष्य घडवणाऱ्या माझ्या सरांना माझ हे छोटस गिफ्ट ……. 

आदरणीय चौधरी सर,
                  दीड - दोन वर्षांपूर्वी तुमच्याशी शेवटची प्रत्यक्ष भेट झाली. म्हणजे साधारणत:२०१२ मध्ये. त्यानंतर आज हे पत्र लिहिण्याचा योग येतोय ! ( आणि माझा पुरता गोंधळ उडालाय कि काय लिहू !)
                 माझ्या मते आमची batch २०१० ते २०१२ या वर्षांत तुमच्याकडे होती आणि खरच या वर्षांत तुम्ही आमच्यासारखी उनाड पोर सुधरवलीत! अर्थात तुमच्या हाताखालून अशा अनेक batch गेल्या आहेत आतापर्यंत आणि त्यामुळे तुम्हाला आमच्यासारखे अनेक विद्यार्थी - विद्यार्थिनी भेटले असतील. पण खर सांगू का सर , आम्ही तुमच्या सारखे सर कधीच बघितले नव्हते तुम्हाला भेटण्या आधी .
            माझी '' शिक्षक '' या व्यक्तीची साधी सोपी व्याख्या म्हणजे ' विद्यार्थ्यांना खूप बडवून काढणारा आणि यंत्रासारखा , पुस्तकी ज्ञान देणारा कुणीतरी !' अशीच होती पूर्वी . त्यामुळे अकरावीला जेव्हा मी '' एन्झो -केम'' मध्ये admission घेतल तेव्हा मी थोडी धास्तावले होते कि इथले शिक्षक कसे असतील ? आणि असे बरेच प्रश्न होते मनात. पण कॉलेजच्या पहिल्याच दिवशी हि सगळी भीती ' छूमंतर' झाली !
              सर, विद्यार्थी आपल्या शिक्षकांचं अनुकरण करत असतो अस म्हणतात . त्यामुळे शिक्षकांची स्वत:ची वागणूक चांगली असण खूप गरजेच असत. तुमची वागणूक चांगली असावी या बद्दल तुम्ही नेहेमीच दक्ष होतात. आम्ही विद्यार्थी नव्हतोच तुमच्यासाठी कधी, तुमच्या मुलांसारखी वागणूक मिळाली आम्हाला तुमच्याकडून नेहेमी.
          एका शिक्षकाने विद्यार्थ्याला कस शिकवायचं हे तुमच्या कडून शिकावं कोणीही! तुम्ही वर्गात आले म्हणजे आज काहीतरी नवीन , वेगळ शिकायला भेटणार हे माहिती असायचं आम्हाला. तुमचा विषय account आणि s.p. होता , पण हे दोन विषय शिकवताना तुम्ही आम्हाला इतर किती विषयांच शिक्षण दिलत हे शब्दात सांगता येणार नाही. जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेशी जोडलत तुम्ही. व्यावसायिक शिक्षण हे विद्यार्थ्यांना गरजेच असत हे तुम्ही समजावून सांगितल होत. तुमच्या या शिकवण्याच्या हातोटीमुळे आज आमचे तुम्ही शिकवलेले विषय पक्के झालेत.
                तुमच्याकडे अजून एक कला आहे ती, विद्यार्थ्यांमध्ये  मिसळण्याची आणि त्यांना एक मित्र म्हणून समजून घेण्याची ! तुमच्या या गुणांमुळे आम्हाला तुमची भीती कधीच वाटली नाही. आदर, विश्वास होता . पण भीती नव्हती. कारण आम्ही चुकल्यावर तुम्ही आम्हाला समजावून सांगितलत नेहेमी . तुम्ही रागावलेत किंवा ओरड्लेत अस मला तरी आठवत नाही .
               कॉलेज कॅम्पस मध्ये मित्र - मैत्रिणींसोबत गप्पा माराव्यात तश्या गप्पा सुद्धा आम्ही तुमच्या सोबत मारल्या आहेत आणि या प्रत्येक वेळा तुम्ही आमच्या पेक्षा मोठे आहात हे कधीच जाणवल नाही आम्हाला.
            तुम्हाला आठवत का सर ? तुम्ही आम्हाला एक स्वप्न पाहायला शिकवलं; ' आम्ही जेव्हा मोठे होऊ , मोठ्या पदावर जाऊ तेव्हा आम्हाला परत या कॉलेज मध्ये यायचय , आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचय.'…… आम्ही अजून हे स्वप्न बघतो आहोत सर . ( आणि एक दिवस ते नक्की पूर्ण होईल)
           हे सगळ बोलताना माला एम.पी. गायकवाड आणि एस.मढवई सरांना विसरून चालणार नाही कारण तुम्हा तिघांचाहि समान वाटा आहे आम्हाला घडवण्यात. तुमच्या मुळे आम्हाला आमच ध्येय ठरवता आल. तुम्ही तिघंही आमच्यासाठी '' आदर्श शिक्षक'' आहात .
             तुमच्यासारख्या शिक्षकांच्या  हाताखाली आम्ही घडलो याचा आम्हाला आज अभिमान वाटतो. पण खंत सुद्धा वाटते कि पुढच्या आयुष्यात आम्हाला असे शिक्षक परत नाही भेटणार. पण पुढच्या अनेक batch चे तुम्ही तीघ नेहेमी आवडते शिक्षक राहाल अशी खात्री आहे मला.
          खरतर तुमच्या बद्दल जितक लिहाव तितक थोडच आहे.त्यामुळे पत्राला इथेच पूर्णविराम देते आता !
                             
                                                                                                              तुमची एक विद्यार्थिनी,
                                                                        

No comments:

Post a Comment