Saturday 7 May 2016

असुर: एका पराभुताची गोष्ट

           पुराणातील किंवा मग इतिहासातील कोणतेही पुस्तक वाचायला घेतले की मला त्या गोष्टीच्या दोन्ही बाजु समजून घ्यायच्या असतात. तसा माझा अट्टाहासच असतो नेहमी! जशी कृष्णा बद्दल आपल्याला नेहमीच माहिती मिळते. पण रणजित देसाईंच कर्णाच्या आयुष्यावरच कादंबरी स्वरूपातल पुस्तक वाचल आणि कृष्ण सुद्धा चूकू शकतो असं वटल. ( मग तो देव असला तरी!).
            रामायणाच्या बाबतीत सुद्धा माझा असाच विचार होता आणि अजून देखील आहे. राम देव म्हणून तसाच आदर्श व्यक्ती आणि राजा म्हणून सर्वांनाच प्रिय आहे. रामाच देवत्व आपल्या पुढे गोष्टीरुपाने नेहमीच उभं केल गेल.  पण हा राम मला कधीच जवळचा वाटला नाही. देव म्हणून सुद्धा माझी त्याचावर कधीच श्रद्धा नाही. मला आठवतं, जेव्हा पासून समजायला लागलं, त्या वेळापासून जेंव्हा कधी रामायणाच्या गोष्टी ऐकल्या त्या प्रत्येक वेळा रामाच आयुष्य कस होत, त्या पेक्षा रावणाच
आयुष्य कसं होत आणि त्याच्या बद्दल ऐकायला मला उत्सुकता असायची. हीच उत्सुकता मनात ठेवून मी गेली कित्येक दिवस रावणाच्या आयुष्यावरच एखाद तरी पुस्तक भेटतय का याच्या शोधात होते.
              आठ दिवस आधी काही पुस्तक खरेदी करायला गेले होते. त्या वेळी सहजच खडा टाकुन पहावा म्हणून, रावणाच्या जीवनावरचे एखादे पुस्तक भेटेल का असा प्रश्न विचारुन पाहिला आणि उत्तरा दाखल जेव्हा त्यांनी पुस्तकच समोर ठेवले तेव्हाचा माझा आनंद शब्दांत नक्कीच मांडता येणार नाही!
               आनंद नीलकांतन यांनी लिहिलेल आणि हेमा लेले यांनी अनुवादीत केलेलं "असुर" असं त्या पुस्तकाच नाव होत. लेखकाबद्दलच्या पहिल्या काही ओळी वाचल्या त्यावेळी जाणवल की रामापेक्षा रावण जवळचा वाटणारी मी एकटीच नाही.
                  रावणाला दहा तोंड होती असं आपल्याला नेहमी सांगितल जात आणि अशी दहा तोंड शब्दशः 'दहा तोंड' म्हणूनच दाखवली जातात. पण प्रस्तावनेतच या दशाननाची दहा तोंड म्हणजे काय हे समजत. आपल्या अध्यात्मात आपल्याला नेहमीच आपल्या 'स्व'त्वाचा त्याग करायला सांगितले आहे. हे 'स्व'त्व म्हणजेच, राग, गर्व, द्वेष, आनंद, दुःख, भीती, स्वार्थ, अभिलाषा आणि महत्त्वाकांक्षा या नऊ भावना. या सर्व भावनांचा त्याग करून फक्त बुद्धीमत्ता शाबूत ठेवून 'स्व'त्व त्यागावे असेच थोर राजा महाबलीने रावणाला सुद्धा सांगितले होते. पण या सर्व भावनांचा त्याग करणे शक्य नसून, मानवी आयुष्यात त्या भावनांच स्थान किती महत्त्वाच आहे हे सांगताना, ' मला देवत्व नको असून एक परिपूर्ण माणूस म्हणून आयुष्य हवे असल्याचेही रावण सांगतो, तेव्हा आपण तरी या सर्व दहा भावनांशिवाय जगु शकतो का? हा प्रश्न मनात येतोच.
                  गोष्टीची सुरूवातच रावणाच्या पराभवापासून होते. युद्ध भूमीवर मरणासन्न अवस्थेत पडलेला रावण ज्याचा शरीराचे अनेक भाग घुशी, उंदीर, गिधाडं खात असताना आपल्या आयुष्याची गोष्ट सांगताना आपल्यापुढे येतो.
              असुर कुळातील जन्म असल्याने लहान वयातच रावण आणि त्याच्या भावंडांना सावत्र भाऊ कुबेराकडुन मिळत गेलेल्या तिरस्काराच्या वागणूकीमुळे रावण कशा प्रकारे महत्त्वाकांक्षीहोत गेला. याचे वर्णन उत्तम प्रकारे लेखकाने पुस्तकात केला आहे.
पुढे तुटपुंज्या मुठभर सैन्यानिशी कूबेराच्या लंकेवर आक्रमण केल्यानंतर रावणराज्याची स्थापना होत असतानाच, देव जमातीने आपली राज्ये स्थापन करण्यासाठी कशी सुरूवात केली हे वाचतांना देवांनी लोकांवर जे अत्याचार केले त्या बद्दल मनात एक उदासीनता निर्माण होते.
शंकराला देव न मानता ब्रम्हाला देव मानावयास सांगण्याचा देवांचा अट्टाहास चूकीचा वाटतो.
            खरतरं या सगळ्याच गोष्टी वादाच्याच ठरतील. पण खूपच कमी लोकांना माहिती असलेल्या काही गोष्टी या पुस्तकातुन उलगडत जातात तेव्हा पुस्तकाबद्दलची उत्सुकता अजूनच वाढत जाते.
रावणाच्या आयुष्यात वेदवती नावाची ब्राम्हण स्त्री येते तेव्हापासूनच खर्या रामायणाची सूरूवात झाली असे म्हणता येईल.             
                रावणाला अतिशय प्रिय असलेल्या वेदवतीला काही काळानंतर रावणापासून मुलगी झाली. पण रावण वेदवतीच्या आहारी जाऊन राज्याला विसरत असल्याचे लक्षात आल्याने, रावणाचा मामा एका विश्वासू सैनिक भद्रा कडून वेदवतीला आणि बाळाला मारण्याचा कट रचतो. या कटात वेदवती मरते आणि बाळाला जंगलात पुरले जाते. रावणाला हे सर्व समजते तेव्हा उशीर झालेला असतो. पुढे त्याला समजते की आपल्या पुरलेल्या बाळाला जनक राजाने दत्तक घेतले आहे. इथेच वाचकांना प्रश्न पडायला सुरूवात होतात, की मग सीता रावणाची मुलगी होती का? मग तीचेच का अपहरण केले रावणाणे?
               पुढे स्वयंवरानंतर सीता रामाबरोबर सूखात आहे की नाही हे बघण्यासाठी रावण काही सैनिकांना त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगतो. राम वनवासात गेल्यानंतर आपल्या मुलीला ही सहन कराव्या लागणार्या वनवासाने रावणाचे मन उद्वीग्न झाल्याचा उल्लेख देखील पुस्तकात येतो.
लक्ष्मणाने शुर्पणखेच्या कापलेल्या नाकाची गोष्ट तशी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपली मुलगी रामा सोबत सुरक्षित नाही आणि त्याचा वनवास संपेपर्यंत आपण आपल्या मुलीला लंकेत आणुन ठेवू, या एकाच भावनेने रावण तिला पळवतो. आपण जे काही कमावल आहे ते सर्व आपल्या मुलीचच आहे ही रावणाची भावना लेखकाने इतक्या प्रभावीपणे सांगितली आहे की रावण वाईट असूच शकत नाही असा विचार मनात आल्यावाचून रहात नाही.
                 तो हळवा होता, तो महत्त्वाकांक्षी होता, सीतेचे बालपण अनुभवता आले नाही म्हणून स्वतःला दुर्दैवी समजणारा देखील रावण आपल्याला या पुस्तकातून भेटतो.
शेवटपर्यंत सीतेला आपण तिचे वडिल आहोत हे सांगण्याचा तो प्रयत्न तो का करित नाही. हेच प्रश्न पुस्तक वाचताना आपल्याला छळतात.
रामाशी युद्ध करित असताना देखील देवत्व नको असल्याची रावणाची इच्छा तशीच टिकून असल्याचे दिसते.
          खर पाहिल तर तो एक सर्व भावनांनी भरलेला परिपुर्ण माणूस नव्हता का? तो परिपुर्ण 'माणूस' होता म्हणून रामाला देवत्व प्राप्त नाही का झाले? याच देवांच्या जमातीत सीतेला अग्नीपरिक्षा का द्यावी लागली? या पेक्षा असुर जमातीत असलेली स्त्री - पुरुष समानता अशा अग्निपरिक्षे पेक्षा योग्य नव्हती का?
शेवटच्या युद्धाच्या वेेळी सीता आपली मुलगी असल्याचे रावणाने प्रजेला सांगितल्याचा उल्लेख पुस्तकात येतो, मग तरी का आपण रावणाला वासनांनी भरलेला माणूस समजतो? हे पुस्तक वाचल्यावर अनेक प्रश्न मनात येतात.
पण रामाला देव माणणार्यांनी देखील रामायणाच्या दोन्ही बाजू समजुन घेण्यासाठी तरी हे पुस्तक एकदा वाचाव असच आहे.

No comments:

Post a Comment