Wednesday 8 January 2020

'ती'चं अस्तित्व

                कुठल्याश्या मराठी चित्रपटाचा एक सिन इंटरनेटवर सर्फिंग करताना समोर आला. त्यात नायिका आरश्यासमोर उभी असते आणि तिच्या ब्राची पट्टी टॉपच्या बाहेर येऊन खांद्यावर स्पष्ट दिसत असते. त्याचवेळी मागून नायिकेची आई येऊन रागाने तिच्याकडे बघते आणि तिचा टॉप खसकन खांद्यावर ओढून ती पट्टी झाकते. बस एवढाच सिन. पण हाच क्षण मनात मात्र किती वेळा रिवाईंड झाला. त्याच्या बरोबरीने विचारांचं चक्रसुद्धा फिरायला लागलं. मग जाणवलं की जिथं बाईच शरीरच एवढं लपवून ठेवलं जातं आपल्याकडे तर तिथे तिच्या अंतरवस्त्रांची काय बात! आपल्या पारंपारिक संस्कृतीचा मोठा वारसा असलेल्या पुरुषप्रधान देशात बाईचा डोक्यावरचा पदर आणि छातीवरची ब्रेसीयर हे तीच चरित्र ठरवण्याचं प्रमाण बनलं आहे. त्यामुळे डोक्यावरचा पदर ढळला म्हणून किंवा खांद्यावर ब्लाउज किंवा टॉपच्या आतून ब्रेसीयरची पट्टी डोकावल्यावर बाईला चवचाल ठरवणारे महाभाग आपल्याकडे सर्रास बघायला मिळतात. मुख्य म्हणजे स्त्रियासुद्धा यात मागे नसतात ही किती गंमत आहे ना! 
                "स्त्री ही जन्मत नाही तर ती घडवली जाते" असं सिमोन दि बुवा जे म्हणते ते अशावेळी मला फार खरं वाटत. किती विचार करून स्त्रीला या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात बघा ना, की ती स्वतः एक बाई असून दुसऱ्या बाईच चरित्र तिच्या वागण्यावरून ठरवायला निघते. आपल्याकडे मुलगी वयात आली आणि तिच्या शरीरात विशिष्ट बदल दिसायला लागले की तिला तिची आई, आज्जी आणि अशाच इतर बायका वागणुकीचे धडे द्यायला लागतात. नीट बसायचं, हळू बोलायचं, हळू हसायचं, सैल फारशे अंग प्रदर्शन होणार नाही, असे कपडे घालायचे आणि आपले अंतरवस्त्र कोणाला दिसू द्यायचे नाही. जीन्स- टॉप घालायची मुभा जरी मिळाली असली तरी ब्राची पट्टी कोणाला दिसायला नको हे फार ठासून मुलींच्या मनावर बिंबवलं जातं. मग हे आपल्या एवढं डोक्यात बसतं की कधी चुकून जरी आपल्या ब्रेसीयरची पट्टी टॉपच्या बाहेर आली तर आपण एवढं ओशाळतो की आता धरणी फुटावी आणि आपण त्यात गायब होऊन जावं असं काही तरी फिलिंग मनात यायला लागतात. शिवाय आपल्या आजूबाजूच्या मुलीसुद्धा याच वातावरणात वाढलेल्या, त्यामुळे अस ब्राची पट्टी बाहेर डोकवायला लागली की हळूच खाणाखुणा करून एकमेकींना सतर्क केलं जातं आणि हेच जर गर्दीच्या ठिकाणी झालं तर आपल्या ब्राची पट्टी दिसतेय याची काळजी तिथे असलेल्या सगळ्याच बायकांना आणि मुलींना वाटायला लागते. मग कसंही करून कोडवर्ड मध्ये आपल्याला त्याबद्दल सांगितलं जातं. बर अशावेळी एखाद्या पुरुषाचं त्याकडे लक्ष गेलंच तर त्याची नजर त्या ब्राच्या पट्टीवरच खिळून राहिलीय हे जाणवत. असं का? आणि मुळातच हा खरंच एवढा बाऊ करण्याचा विषय आहे का? स्त्री असो वा पुरुष अंतरवस्त्र प्रत्येकजणच वापरत असतो. मग पुरुषाच्या बनियनचा का नसेल बर असं बाऊ होत? किंवा त्यांना का नाही कोणी सांगताना दिसत की बाबा तुझ्या बनियनचा पट्टा बाहेर आलाय बघ. 
            चित्रपटांमध्ये बिकिनी घालून नाचणारी नायिका आम्हाला फालतू, वाईट चालीची वाटते. पण त्याचवेळी शर्ट उतरवून बनियनवर नाचणाऱ्या नायकाला आम्ही 'माचो मॅन' चा टॅग लावतो ! म्हणजे बाईच शरीर, तिचे कपडे हे काय फक्त कामेच्छा जागृत करण्यासाठीचं साधन आहे का? त्या पलीकडे तीच काहीच अस्तित्वच नाही आपल्या नजरेत? अगदी स्वतः बाईच्या सुद्धा ! माझे अंतरवस्त्र माझ्या कापड्यांमधून दिसले तर मला कोणीतरी वाईट म्हणेल, माझ्या कॅरॅक्टरवर प्रश्न उभे करेल अशी भीती कायम मनात असते आपल्या प्रत्येकीच्या, माझ्या सुद्धा. असं का बरं व्हावं? एवढं का आपण या स्वतःला ब्रेसीयरच्या पट्टी सोबत बांधून घेतलंय?
                काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियामधल्या स्त्रियांनी हॅशटॅग #नोब्रा ही मोहीम राबवली होती. यात या स्त्रियांनी ब्रा न घालता सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आणि ब्रा न घालता रस्त्यावर सुद्धा उतरल्या होत्या. असं करताना त्यांना जाणवलं असेल का, की आपलं अस्तित्व हे आपलं शरीर, आपले स्तन आणि त्यावरच्या ब्रेसीयर पुरत नसून त्या पलीकडे आहे?  करण असं काही करायचं म्हणजे धाडसच दाखवावं लागतं आणि आपल्या देशात जोवर स्वतः बायकांनाच आपल्या अस्तित्वाची जाणीव होत नाही, तसच खांद्यावर रुळणाऱ्या ब्राच्या पट्टीसोबत त्या निसंकोच पणे वावरू शकत नाही, तोवर आपल्या समाजालासुद्धा "ती"च्या अस्तित्वाची जाणीव होणार नाही. मात्र तोपर्यंत स्वतःच्या शरीराला आणि अंतरवस्त्रांना लपवून ठेवण्याचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे.       
                                              

No comments:

Post a Comment