Monday 10 December 2012

एक पत्र तुमच्यासाठी..

                                                                          ।। श्री ।।
प्रिय,
मित्र आणि मैत्रिणींनो,
         आज तुम्हाला सगळ्यांना पत्र लिहिण्याची इच्छा झाली.म्हणून पत्र लिहायला बसलेय.आपल्यासाठी अनभिज्ञ आहे हा पर्याय, म्हणून हा खटाटोप.आता तुम्ही म्हणाल कि एवढीच आठवण येत होती, तर फोन करायचा, एस.एम.एस.पाठवायचा. पत्राची काय गरज ? हो, आहे गरज.... म्हणूनच पत्र लिहायचं ठरवल.
         आपण लिहायचो ना शाळेत असताना,तसच...खोट खोट का होईना पण लिहायचो कि नाही? म्हंटल आता खर खर लिहू.
         मज्जा यायची ना अस खोट  खोट पत्र लिहायला .कधी घरी, कधी मित्र-मैत्रिणींना. तेव्हा वाटायचं कि अस खर खर पत्रही लिहाव कधीतरी....पण मग आपण मोठे होत गेलो,शाळेतल्या त्या खोट्या पात्रांशी असलेला संबंध पण तुटला. आता कॉलेज मध्ये आपण लिहितो व्यावसायिक पत्र, पुस्तकांची मागणी करणारे किंवा मग समारंभाचे आमंत्रण देणारे. तेही खोटेच.माझी आई सांगते कि पूर्वी नळाला जसे दिवसातून दोनवेळा पाणी यायचे, तसाच पोस्टमन सुद्धा दिवसातून दोनदा यायचा! हि गोष्ट तशी फार जुनी नाही, २० वर्षांपूर्वीपर्यंत असच होत. मग आपण मोठे होत गेलो तस फोन, एस.एम.एस यांच्याशी जवळचा संबंध आला आणि मनाच्या कोपऱ्यात असलेले, ते पत्रसुद्धा नाहीसे झाले....आणि नात्यांमधली जवळीक सुद्धा!
       आता आलीच आठवण तर टाकायचा एखादा मेसेज, इमेल किंवा करायचा फोन...हेच करतो न आपण आता?पण यात कुठलीच भावनिक गुंतागुंत नसते.
       पूर्वी जर पत्र पाठवायचे असेल किंवा कुणाचे पत्र आले तर घरात किती उत्साह दिसायचा ! पत्र म्हणजे नुसते कागदावरचे शब्द नसायचे ते... त्यातून खूप काही व्यक्त व्हायचं, प्रेम, आदर, नाती सगळच व्यक्त व्हायचं ! मोठ्यांच्या साष्टांग नमस्कारापासून तर किलबिल पार्टीच्या गोड-गोड पाप्या पर्यंत सगळ असायचं या पत्रांमध्ये. आता आपण पत्रापेक्षा जास्त कुरिअरचा, इमेलचा वापर करतो..कोणी गेलय का कधी आपल्या पैकी पोस्ट-ऑफिस मध्ये ? लिहिलंय का कधी आंतरदेशीय पत्र?
        पूर्वी पत्र म्हणजे आपल्या भावना व्यक्त करायचं साधनच होत! आपल्या माणसांना लिहिलेलं पत्र हे ठरवून नाही लिहील जायचं, त्यावेळी जे सुचेल जसे सुचेल तेच पत्रात उतरवायचे लोक आणि हो, ह्या पात्रांचे महत्वही खूप असायचं बरका !
        पोस्टमनने पत्र हातात दिल्यावर जर ते वरच्या कोपऱ्यात फाटलेले असेल तर वाचायच्या आधीच समजायचे कि पत्रात काहीतरी दु:खद घटना लिहिलेली आहे. किंवा जर पत्रावर हळद-कुंकू शिंपडलेले असेल तर कोणाचे तरी लग्न ठरले अस समजायचं.
        अगदी सण-समारंभांना पण लोक आप्तांच्या भेटकार्ड, शुभेच्छा पत्रांची आवर्जून वाट पहायचे.आता तसे लोक पण नाहीत आणि पत्रसुद्धा नाहीत..
        आज हे अस ब्लॉगवर का होईना पत्र लिहिताना त्या जुन्या शाळेत लिहिलेल्या खोट्या पात्रांची आठवण झाली...तुम्हीसुद्धा लिहून पहाल असच कुणाला तरी पत्र ? आता कोणाला पत्र लिहील तर लोक काय म्हणतील? असाच विचार करताय ना तुम्ही?
        कोणी काहीही म्हणाले तरी काय फरक पडतोय....आपल्या मनाला जो आनंद मिळेल त्या आनंदासाठी कोणाला तरी नक्कीच पत्र लिहा (आई - बाबांना, आजी-आजोबाना नाहीतर काका-मामांना आश्चर्याचा सुखद धक्का द्या).अगदी निसंकोच मनाने लिहा. फोन आणि मेसेजेसच्या जगातून थोड बाहेर निघून.कारण आता आमच्याकडे पाणी दिवसातून दोनदा यायच्या ऐवजी चार दिवसा आड येते  आणि पोस्टमन दिवसातून एकदाच काय कधीच येत नाही..!
        आपल्या आजच्याच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची हि अवस्था आहे तर पुढच्या पिढीला तर वस्तूसंग्रहालयात नेउनच दाखवावे लागेल कि पत्र काय असते आणि कसे दिसते!
                                                                                                                        तुमची मैत्रीण,
                                                                                                                              अपूर्वा
       
                                                                                                                                                                                                                                                                 

No comments:

Post a Comment