Friday 14 December 2012

"भिकाऱ्या सारख जेवण.............."

 


                          "Eat breakfast like a king, lunch like a prince and dinner like a pauper!" 
            मी कशाबद्दल म्हणतेय ते समजल असेलच.रात्रीच जेवण.आजीच्या भाषेत जवळ जवळ लंघन आणि आईच्या भाषेत थोडस चौम्यौ !
            काल रात्री  एका मैत्रिणीशी फेस टू  फेस तोंडाला फेस येई पर्यंत गप्पा चालल्या होत्या,शेवटी ती म्हणाली "चल बाय .....जेवण करायचं !" मेनू विचारला तर म्हणाली "फ्र्यान्की  केलीय "
          आईला सांगितलं तर ती तिच्या जुन्या आठवणीत रमली. मजा होती हं त्यांच्या वेळी(२५-३०वर्षांपूर्वी)-कितीतरी वस्तू ,शब्द, गोष्टी तर आपल्याला माहितच नाहीत .तुम्हालाही ऐकून मजा वाटेल.चला तर मग पाहूयात काय म्हणाली आई ते .........................
            "मऊ मुगाची पिवळी गरमागरम खिचडी त्यावर तुपाची धार (बुटली मधून),सोबत लोणच,पापड (नागली, उडीद,ज्वारी,तांदूळ,पोह्याचा नाहीतर तांदळाचा)   आमच्या लहानपणी वडील आणि आम्ही मुल सकाळी ११ ला जेऊन बाहेर पडायचो ,संध्याकाळी पोहे,सांजा,भेल असा काहीतरी नाश्ता व्हायचा.मग खेळ,शुभंकरोती,अभ्यास आणि ८ वाजता रात्रीच जेवण. यापेक्षा जास्त उशीर नाही.
           ह्या गोष्टी मी काही ६०-७० च्या दशकातल्या नाही सांगत,तर त्या आहेत ८०-९० साल च्या. रात्रीच्या जेवणात पोळी भाजी फारच कमी वेळा असायची (जवळ जवळ नाहीच) भात, खिचडी असे प्रकार जास्त.पण त्यात विविधता खूप. म्हणजे  नुसता भात म्हटलं तरी मुगाची आमटी भात (तूरीच वरण रात्रीच खायचं नाही) पातळ पिठल भात,खिचडी तर अनेक प्रकारची पिवळी, साधी, मुगाची खिचडी, कधी तूप टाकून तर कधी जीरे, मोहरी, लसुन, मिरचीची तेलातली कुरकुरीत फोडणी टाकून,अख्या मुगाची फोडणीची तिखट खिचडी,मसाले भात,बाजरीची खिचडी . सगळे भाताचे प्रकार असूनही प्रत्येकाची वेगळी चव.
               भात नसेल तर भाकरी. थंडीच्या दिवसात बाजरीची,उन्हाळ्यात ज्वारीची आणि खावीशी वाटेल तेव्हा तांदळाची (हि तर अगदी गरम-ताव्यावरचीच खायची) पिठल भातासाठी  एकदम पातळ,भाकरीसाठी थोड घट्ट ,कधी लसणाच्या फोडणीच तर  कधी कांद्याच्या फोडणीच आधणाच. फोडणीची खिचडी किंवा बाजरीची खिचडी असेल तर कढी असायची सोबत.
              मोसमानुसार पण पदार्थात बदल व्हायचा. म्हंजे थंडीच्या दिवसात,पावसाळ्यात शेंगोळे (हुरड्याच्या पीठाचे) चीकोल्या, घावन (बेसनाचे-तांदळाच्या पीठाचे),थालीपीठ असे पदार्थ बनायचे.तर उन्हाळ्यात गुळाच्या पाण्यातल सातूच पीठ, दुध शेवया, आंब्याचा रस शेवया, जेवणात २ घास कमी खाऊन  टरबूज खरबूज खायचं.
              तोंडी लावायला दही, वेगवेगळी लोणची, कार्हळाची,खोबऱ्याची,शेंगदाण्याची चटणी,तळलेली ताकातली मिरची,पापडा  सारख्या खारोड्या.........................अगदी तोंडाला पाणी सुटत अजूनही आठवल तर.
              परत ज्याला भूक नसेल त्याला खायचा आग्रह नाही , लंघन करावस वाटल तर फक्त दुध घ्यायचं थोडस झोपताना.का जेवली नाही म्हणून हजार चौकश्या नाही. 
              पण आजकाल जेवायला लोकांना ९-१० वाजतात. हि पण वेळ कायम पाळलीच जाईल अस नाही सगळे सोबतच जेवतील याचीही खात्री नाही. जेवायला काय तर नुडल्स,पास्ता ,फ्रान्की ,  फ्राईड राईस -चायनीज नाहीतर इटालियन असले पदार्थ.आपल्या शेवया, शेंगोळी हे नुडल्स पेक्षा कधीही चांगले, चीकोल्या म्हणजे इंडिअन पास्ताच ना?आणि आपले भाताचे प्रकार त्या फडफडीत फ्राईड राइसला हरवतील.मऊ भाताचा वेगळा तांदूळ तर खिचडीचा वेगळा तांदूळ  म्हणजे तांदुळाच्या चवीतही वैविध्य आहे आपल्याकडे.
             आणि अजून एक गमत सांगू का? श्रावणातल्या सोमवारी  आमची शाळा लवकर म्हणजे ४लाच सुटायची-उपवास असायचा ना!तर हा उपवास संध्याकाळी लवकर सोडायचा असतो -६ वाजताच. आई लवकर स्वयपाक करायची-  वरण भात भाजी पोळी उपास सोडायला. आम्ही सगळे जण संध्याकाळी ६लाच जेवायचो.काय मस्त वाटायचं- बाहेर पाऊस पडत असायचा आणि घरात आम्ही गरम वाफाळत जेवण जेवायचो.
             आता तर श्रावणी सोमवारी शाळाही लवकर सुटत नाहीत आणि उपवास हि . छे, फार वाईट वाटत कि तुम्हाला हि  मजा  चाखता येत नाही म्हणून."
                   काय, ऐकल न मित्रानो काय धमाल होती आईच्या काळात,पापडाचे प्रकार, चटण्यांचे प्रकार किती होते पहिले न. शिवाय तळण  नाही मळणं नाही. कमी तेलातले पदार्थ. नाही तर आपण खातोय एकच एक उडदाचा पापड आणि कैरीच रेडीमेड लोणच . मी उद्या आईला फिकी खिचडी आणि फोडणीच तेल करायला सांगितलय.मलाही खायचाय तो कुरकुरीत लसुन. तुम्ही पण सांगणार ना तुमच्या मम्मीला?

2 comments: