Tuesday 16 April 2013

कापूस पिंजून ठेवलाय जसा …….

                 हि गोष्ट तशी आता फार जुनी झालीय. आता मी प्रथम वर्षाला आहे. आणि मी जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या अगदीच लहानपणीची आहे. तरी माझ्यासाठी खूप जवळची आहे .
                   माझा असा अनुभव आहे कि माणसाला माणस जशी जवळची वाटतात ना तितकेच प्राणी पक्षी सुद्धा जवळचे वाटतात. आणि अशा वेळी ते प्राणी पक्षी पाळण साहजिक असत. माझ म्हणाल तर मला माणसांपेक्षा प्राणी पक्षीच जास्त जवळचे  वाटतात.
                   या सगळ्याची सुरुवात मी ३-४ वर्षांची असताना झाली बहुतेक. झाल अस कि पप्पांचा एक मित्र सशे पाळायचा तेव्हा. तो त्याच काय करायचा हे मला नाही माहित. पण पप्पांनी त्याच्याकडून एक अगदीच छोटस सश्याच पिल्लू आणल होत आम्हा दोघी बहिणींसाठी.
                      तुम्हाला सांगते मित्र मैत्रिणींनो ते पिल्लू इतक छोटस होत कि पप्पांच्या तळ हातावर अगदीच सहज मावायचं . खरच सांगायचं तर त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर मी आणि माझी बहिण खूप घाबरलो होतो बर का !
             आता हे पिल्लू आणल म्हणजे ते आमच्या घराचाच एक सदस्य बनणार हे नक्की होत . पण आमच्या या नवीन सदस्याला हात लावायला सुद्धा घाबरायचे मी ( तो चावेल अशी भीती वाटायची). पण तुम्हाला सांगते त्याच ते कापसासारख रूप पाहूनच मी त्याच्या जवळ जाण्याची हिम्मत केली आणि काय गंमत अगदी दोन तीन दिवसांतच माझी आणि त्याची गट्टी जमली !
            या आमच्या गोंडस पिल्लाच नाव आम्ही ''ससुली'' ठेवल . या आमच्या ससुलीचे जितके किस्से सांगेल मी तितके कमीच म्हणायचे . माझ्या आयुष्यातले लहानपणीचे सगळ्यात चांगले क्षण मी या ससुली सोबतच घालवलेत अस म्हंटल तर ते चुकीच नाही .
            ससूला आमच्या घरात रुळायला जास्त वेळ नाही लागला . काही दिवसांतच तो आमच्या सगळ्यात अगदी छान मिसळला. तस या शहाण्याचे नखरे सुद्धा काही कमी नव्हते बर का !  साधारण पणे  तो घास- गवत खाणार असच आपण गृहीत धरतो. पण याने घास खाण्याबरोबरच अजून भरपूर पदार्थ सुद्धा खाल्ले.(Chocolate,  बिस्कीट, जेम्स, कणिक , पोळी )
              ससुच्या खाण्याचे एक एक किस्से खूप विचित्र आणि गमतीचे होते. मम्मी पोळ्या करायला किचन मध्ये गेली म्हणजे या पठ्ठ्याला ते कस समजायचं कोणास ठाऊक पण हा मम्मीच्या आधी किचन मध्ये जाऊन पोहोचायचा आणि मग मम्मी त्याला कणकेचा तुकडा देत नाही तोपर्यंत तिच्या पायात घुटमळायचा तो. असच पप्पांच्या बाबतीत सुद्धा करायचा तो. आपण कस लहान असताना पप्पांना म्हणायचो ते बाहेरून आल्यावर कि 'पप्पा मला काय खाऊ आणला?' तसच हा लबाड पप्पा येण्याची वेळ झाली म्हणजे दारात जाऊन बसायचा आणि पप्पा आल्यावर जोपर्यंत ते त्याला काही खाऊ ( जेम्स, बिस्कीट)देत नाही तोपर्यंत त्यांना घरात नाही येऊ द्यायचा . तो खाऊ त्याच्या पुढे टाकण्या  इतका सुद्धा दमधीर नसायचा त्याला. पप्पांच्या अंगावर उड्या मारून मारून बेजार व्हायचा तो . आम्ही जेवायला बसल्यावर सुद्धा तीच गत ह्याची. पहिले याला जेवायला द्यायचं आणि मग तो आमच्या सगळ्यांच्या मधेच बसून जेवणार (एकट्याने तर तो कधीच नाही जेवला).
                असच आम्ही सगळे जर पलंगावर बसलेले असलो तर याने कधीच खाली थांबू नये. उड्या  मारून धडपडत तोसुद्धा वर येऊन बसणारच. आता तुम्ही म्हणाल कि ससा पाळला म्हणजे घरात घाणच घाण  होत असणार ……… तर तस काहीच नाहीय . कारण या ससुला आम्ही एक जागा ठरवून दिली होती. त्याने तिथेच जाऊन घाण करायची हे त्याला शिकवायला आम्हाला जास्त वेळ नाही लागला . ( तसा तो जात्याच हुशार होता) दुसर सांगायचं म्हणजे आम्ही त्याला त्याचे कान पकडून कधीच नाही उचलल. लहान बाळाला जस उचलतो आपण तसच उचलून घ्यायचो आम्ही त्याला .
                ससूची अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे त्याला घरातली माणस  बरोबर ओळखता यायची आणि त्यांना तो कधीच चावायचा सुद्धा नाही . पण जर बाहेरच कोणी घरी आल तर या पठ्याने त्यांना बाहेरच्या बाहेरच त्यांच्यावर ओरडून, त्यांना चावायची भीती दाखवून पळवून लावाव.
              तस आम्ही त्याला खूप जपायचो. मांजर वगैरे तर घराच्या आसपास पण फिरकू नाही द्यायचो. पण एकदा चुकून  ससू घराच्या बाहेर राहिला रात्री. बर ते त्याच्या ओरडण्याने वेळीच लक्षात आल आमच्या आणि आम्ही सगळे बाहेर पळालो. नाहीतर मांजराने तिथेच संपवलं असत त्याला . पण त्यानंतर तो कधीच एकटा घराच्या बाहेर नाही पडला एवढ मात्र नक्की .
          माझ्या सोबत खेळायलाही याला खूप आवडायचं बर का ! त्याचा एक लाल रंगाचा बॉल होता,तो आपण त्याच्याकडे लोटायचा मग तो बॉल तो परत माझ्याकडे लोटत आणायचा . आणि जर मी निवांत बसलेली असेल तर हा येऊन माझ्या जवळ बसायचा आणि माझा हात पूर्ण चाटून काढायचा .
          ससुला एकट  सोडून आम्ही कधीच  गावाला नाही गेलो आणि तशी जाण्याची वेळ आलीच तर आम्ही सगळे दार खिडक्या व्यवस्थित बंद केली आहेत कि नाही हे पाहायला आर्ध्या रस्त्यातून परत यायचो . (नाहीतर मग त्यालाच सोबत न्यायचो. ) मी अगदी पाचवी - सहावीत जाईपर्यंत होता तो आमच्या घरी . या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या . तो माझा भाऊ - मित्र सगळच होता.
            अस म्हणतात कि सश्याच आयुष्य कमीच असत . हाही असाच एकदा आजारी पडला . दवाखान्यात नेल तर ताप आला होता. घरी आणल्यावर मात्र त्याने लगेचच शेवटचा श्वास घेतला . त्यावेळा मी खूपच  एकटी पडले होते . आणि त्याच्या जाण्यामुळे तितकीच रडले सुद्धा होते . तो अजूनही बऱ्याचदा आठवतो मला. त्याचा तो मऊ स्पर्श आठवतो आणि मग मन पुन्हा आठवणींच्या गावी जात .
              त्यानंतर माझ हे प्राणी पक्षी प्रेम वाढत गेल. मी रोज झाडावरच्या कावळ्यांना सुद्धा पोळी खायला द्यायचे( आता कावले क्वचित दिसतात तो भाग वेगळा).   पुढे मग मागच्या वर्षी आम्ही एक आफ्रिकन पोपट सुद्धा पाळला होता . त्याच्या पोटावर छान लाल रंगाचा पट्टा होता . त्याच्या बद्दलही सांगेल तुम्हाला पुन्हा कधीतरी . तो जास्त दिवस नव्हता आमच्या सोबत.  पण तो सुद्धा असाच जीव लाऊन गेला आम्हाला .
             खर म्हणजे माझ अजूनही मन भरत नाही आणि मला अजून अजून प्राणी पक्षी हवे आहेत . आता मी लव बर्डस आणायचे म्हणून पप्पांच्या मागे लागलेय . ते कधी घरी येतील ते तर माहिती नाही मला पण मी पुढेही अशीच प्राणी पक्ष्यांसाठी वेडी राहील हि मात्र खात्री आहे .………
                  तुम्ही पाळलाय का कधी असा कुठला प्राणी? तुमच काय मत आहे या पाळीव प्राण्यांबद्दल ? तुम्हाला आवडतात का ते ?








8 comments:

  1. छान लिहिले आहेस...
    "माझ म्हणाल तर मला माणसांपेक्षा प्राणी पक्षीच जास्त जवळचे वाटतात." छान वाटले ही ओळ वाचून.
    keep it up !

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyavad Pratik. Tumhala lekh aavdla he vachun aanand zala...

      Delete
  2. सश्याच माहित नहीं पण माला मांजर आवडते ...

    ReplyDelete
    Replies
    1. hahah.. ho ashe gondas prani saglyanach aavadtat...

      Delete
  3. prani aavadnare lok kami distat aaj kal..

    ReplyDelete
    Replies
    1. ho, karan ya tantradnyanachya yugat mansachya sanvedna haravlya aahet...

      Delete
  4. ससा घरात पळू नये अस लोक का सांगतात ,मी पण ससा पाळतो पण खूप लोक सांगतात की ससा घरात पळू नये असं का

    ReplyDelete
  5. ससा घरात पळू नये अस लोक का सांगतात ,मी पण ससा पाळतो पण खूप लोक सांगतात की ससा घरात पळू नये असं का

    ReplyDelete