Sunday 2 June 2013

''एक कधी न उलगडलेलं नातं ………. ''

             सासू-सून हे नातं कोडया सारखच असत. आता हे फक्त मला वाटत कि तुमच्या सगळ्याचं हेच मत आहे ते मला नाही माहिती. पण सासू- सून हे नातं असत बाकी मज्जेशीर! आपले पूर्वज सांगून गेलेत कि सासू-सून ह्या आई-मुली सारख्या असतात. पण माझ्या पाहण्यात तरी अजून अस घर नाही जिथे सासू-सुना आई आणि मुलीसारख्या राहत असतील ( टि. व्ही. सोडला तर!).
              प्रत्येक घरात सासू आणि सूनेच वेगळच रूप पहायला मिळत . आणि त्यांच्या तितक्याच तऱ्हासुद्धा !
काही  घरांत सासू आणि सून दोघी खाष्ट असतात तर काही घरांत सासू गरीब गाय आणि सून चंडीकेच दुसर रूप असते. काही घरांत याच्या उलट चित्र असत,सासू कजाग आणि सून मवाळ असते. आणि एकत्र कुटुंब असेल तर मग विचारूच नका! ( रोज घरात रामायण - महाभारत युद्ध !) आता यात गंमत अशी कि या सासू - सुनांच्या भांडणात नवऱ्यांच बिचाऱ्यांच भरीत होत. ( हिची बाजू घेऊ कि तिची!)
                तस काही म्हणा पण या सासू-सुनांना भांडायला कुठलही कारण पुरत बर का ! म्हणजे अगदी भाजीत मीठ कमी घातल इथपासून ते तिने केलेली खरेदी वा अजून कुठलही कारण असो यांची भांडण ठरलेलीच असतात. यांची भांडणाची कारण ऐकून आपल्याला हसू येईल ( नवऱ्यांना) पण या सासू-सुनांसाठी हीच कारण खूप महत्वाची असतात!
             नवऱ्याने हौशीने बायकोला साडी आणली तर आईचा ( सासूचा ) टोमणा ठरलेला असतो. आमचा मुलगा आता आमचा राहिला नाही किंवा मग बायको आली तर आईला विसरला ! सासुच हे वाक्य संपत नाही तर बायको इकडे नवर्याच्या कानात कुजबुजते '' जरा काही हौशीने आणल तर तुमच्या आईला पाहवत नाही!"
तसच बाहेर फिरायला गेल्यावर सुद्धा  बऱ्याच सासवांना वाटत कि मुलाने बाहेर जाताना एकदापण आपल्याला नाही विचारल. ….
            बऱ्याचदा काय होत कि सासू हि दोन्ही घरी ( माहेरी आणि सासरी ) एकत्र  कुटुंबात राहिलेली असते त्यामुळे सर्वाना सांभाळून राहाण आणि मोठ्या प्रमाणात काम करण्याची सवय तिला असते. तिचा हाच स्वभाव तिच्या सुनेकडे असावा अशी तिची इच्छा असते. पण ते शक्य नसत. आजच्या या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात मुलींना एकत्र कुटुंबात राहायची इच्छा  नसते.  त्यामुळे त्यांना अशा मोठ्या घरात राहाण कठीण जात. आणि मग सासू-सुनांचे खटके उडायला सुरुवात होते.
             असे खटके उडायला लागले म्हणजे सासू - सुना एकमेकींना समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाही हा प्रश्न मला नेहेमी पडतो. कुठल्याही नात्यात Understanding महत्वाची असते अस आपणच म्हणतो ना , मग या सासू-सुनांच्या नात्यात ते Understanding का दिसून येत नाही कोणास ठाऊक.माझ्या पाहण्यातल्या सगळ्याच सासवा काही वाईट किंवा कजाग नाहीत. सुनांबद्दल पण मी हेच म्हणेन. मग आता तुम्ही म्हणाल कि दोघी जर वाईट नाहीत तर त्यांची भांडण का होतात? 
            मुलगी लग्न करून जेव्हा सासरी येते तेव्हा तिच्या मनात एकच भीती असते कि आपली सासू कशी असेल. खर म्हणजे होत काय कि लग्ना आधी मुलीमुलींमध्ये सासू या व्यक्तीवर बरीच चर्चा झालेली असते. त्यातच जर एखादी मुलगी आधीच लग्न झालेली असेल तर मग ती तिच्या सासूच्या चहाड्या करते. आणि नको ते ( फुकटचे )उपदेश दुसऱ्या मुलींना करते. आता प्रत्येक सासूचा स्वभाव काय सारखा नसतो कि एकीची सासू अशी वागली म्हणजे दुसरीची पण तशीच वागेल ! 
            हि अशी भूत मुलींच्या डोक्यात घातली म्हणजे लग्नानंतर जर त्या मुलीला सासूला आईचा दर्जा द्यायचा असेल तर ती तो देत नाही. आणि जरी तो दिला तरी नंतर खटके उडायचे ते उडतातच. समजा सासू सुनेशी छान वागतेय सगळ सुरळीत चाललय आणि एखाद दिवशी सासू काही कारणा  वरून सुनेला रागावली तर सून लगेच ती गोष्ट माहेरी सांगते. सासू माझ्याशी छान वागते हे नाही सांगणार पण सासूबाई मला रागावल्या हे आधी सांगेल. या अशा सुनांना मला विचारावस वाटत कि जर सासू ऐवजी तुमची आई तुम्हाला रागावली असती तर तुम्ही एवढा बोभाटा केला असता का? नाही ना ? मग सासू थोड बोललीच तर बिघडत कुठे? ( हे मुलींना त्यांच्या नवऱ्याने समजवायला हव.)
                 काही - काही सुना तर इतक्या पुढच्या असतात न कि त्यांच्या बद्दल बोलायला शब्दच नसतात आपल्या जवळ! एखाद्या सुनेला सासू समजा बोलली कि तू आज भाजीत मीठ जास्त घातलय तर या सुना (सगळ्याच नाही म्हणत मी ) दुसऱ्या दिवशीपासून स्वयंपाक करणच सोडून देतात ! आणि कारण विचारलच तर म्हणतात सासूबाईना माझ्या हातचा स्वयंपाक पटत नाही !  असच घरातल्या इतर कामांच्या बाबतीत सुद्धा होत. मग होत काय कि घरात सून असून पण सासूलाच सगळी कामे करावी लागतात. हे तर एकच उदाहरण झाल एखादी सून जर नोकरी करत असेल आणि सासू जर चांगली असेल तर सुनेला हातभार म्हणून घरातली सगळी काम करून घेत असेल तर या सुनांना बरच होत. उलट सासूने एखाद दिवस काम नाही केल तर त्या चिडचिड करतात.
            एखादी सासू धार्मिक असली तर तिला वाटत कि आपल्या सुनेने सुद्धा उपवास, व्रत वैकल्य करावे. आणि अशा वेळी सून जर आडूनच बसली कि 'मी नाही करणार हे उपवास वगैरे , माझा त्यावर विश्वास नाही' तर भांडण हमखास होतात. माला मान्य आहे कि आजकालच्या मुलींचा अशा धार्मिक गोष्टींवर विश्वास नसतो (माझा सुद्धा नाही!). पण आपल्या उपवास करण्याने किंवा व्रत-वैकल्य केल्याने सासूला चांगल वाटणार असेल तर ते का करू नयेत. अशा वेळी आपण या गोष्टी मानतो कि नाही हे महत्वाच नसतच मुळी, आपण या गोष्टी केल्याने कोणाला तरी समाधान होईल हेच लक्षात ठेवायचं फक्त.दोघींच्या वागण्यात लवचिकता हवी.म्हणजे काय तर बदलांचा स्वीकार. सासूने जून सोडून द्याव सुनेने नवीन शिकव, इतकाच ! थोड तुझ खर थोड माझ खर. (बाजारात भाव टाव करताना नाही का आपण म्हणत "तुझाही जाऊदे आणि माझाही जाऊदे" अस म्हणून मध्यम मार्ग काढतो )समजूतदारपणात दोघींनी एक एक पाउल पुढे याव आणि अहंकारात एक एक पाउल मागे जाव.
                मला अस वाटत कि जश्या सुनांच्या सासू कडून, नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात तशा सासूच्या आपल्या सुनेकडून नसतील का? त्यांना पण तर मोकळीक हवीच असेल ना. त्यांना पण तर वाटतच असेल न कि संसाराच्या या रामरगाड्यातून निवृत्त व्हाव. मग सुनांनी त्यांना ती मोकळीक दिली तर काय होईल?माझ्या मते घरात मोठी माणस असली म्हणजे उलट घरातल्या लहान मुलांवर चांगले संस्कार होतात आणि सुनांना पण सासूची मदत मिळते.आणि कुटुंब बांधून राहते.
                बापरे!! एखादी सून जर हे वाचत असेल तर माझ्या नावाने खडे फोडत असेल नक्कीच कि काय मी सगळ्या सुनांबद्दल वाईट लिहितेय म्हणून ! पण अजून बरच लिहायचय मला ………पण आता जरा सासवांबद्दल बोलूयात. ……( हुश्श ! संपले एकदाचे सुनांचे गाऱ्हाणे करून!)
               घरातली सून जितकी चुकते तितकीच सासू पण चुकते बर का ! काही सासवा अशा सुद्धा असतात ज्यांना सून आली तरी घरातला आपला अधिकार सोडावासा वाटत नाही . सगळ आपल्याच पद्धतीने झाल पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. या साठी त्यांना सुनेचा छळ करावा लागला तरी यात त्यांना काही गैर वाटत नाही!
             अहो, काही काही सासवा तर हद्दच करतात. भाजी माहेरच्या पद्धतीने केली म्हणून सुद्धा सुनेचे गाऱ्हाणे करतात. उलट अशावेळी सुनेला समजवायचं , तिला  शिकवायचं कि ' बाई आपल्या कडे अशी भाजी करत नाही, मी शिकवते तुला ' ते राहत बाजूला, जेवायच्या वेळी मग कटकट करत बसतात. ती वेगळ्या वातावरणात वाढलेली असते. त्यामुळे आपणच थोड Adjust केल तर काय बिघडेल! 
              एवढे वर्ष मुलगा आपल्याला साडी आणतच होताना , मग आणली एखादी साडी बायकोसाठी तर साडीच कौतुक करायचं सोडून उगीच टोमणे काय मारायचे! आणि मुलाला त्याच आयुष्य बायकोसोबतच घालवायच असत त्यामुळे माझा मुलगा आता माझा राहिला नाही अस म्हणून सुद्धा काही उपयोग नसतो. उलट सून घरात आल्यावर स्वखुशीने घराचा ताबा तिच्या कडे देऊन मोकळ व्हायचं. '' मला दोन वेळेच जेवण घाल म्हणजे झाल " अस जर सासू म्हणाली तर सुनेलासुद्धा हुरूप येईल घरात काम करायचा. (administration चा सुद्धा नियम आहे एखाद्याकडे पूर्ण जबाबदारी सोपवली कि तो ती आत्मविश्वासाने पुरी करतो , कारण त्याला जाण असते कि आपल्या कृतीच्या चांगल्या वाईट परिणामांना तोच पूर्णतः जबाबदार राहील)तिला सुद्धा वाटेल कि हे घर आपल आहे. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे सासू बद्दल आदर वाटेल सुनेला! 
               मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला वाटेल कि मी खूपच Over लिहिलंय सासू-सुनांबद्दल, पण ह्या गोष्टी मी स्वत: लोकांच्या घरात घडताना पाहते. त्यामुळे त्यांच्या चुका लक्षात येतात. तुमच्या घरात जर अस घडत असेल तर तुमच्याही लक्षात या चुका याव्यात म्हणून मी हे सर्व लिहील. आणि अजून तुम्हाला हा अनुभव नसेल तर तो आल्यावर या चुका तुम्ही टाळू शकाल!(माझही घोडा मैदान अजून खूप दूर आहे!)
                
                  

5 comments:

  1. Chhan Lihalay Tumhi .....
    Pan mala nakki he kalat nahiye ki tumhi konachya bajune aahat ?
    Sasu ki Sun ?

    ReplyDelete
    Replies
    1. Tumhala lekh aavadla he vachun chhan vatl..... aani maz mhanal tar mi doghinchya bajune aahe... karan kahi vela sasu barobar aste tar kahi vela sun...

      Delete
  2. छान लिहले आहे

    ReplyDelete
  3. आजच्या नविन युगात हे समजने आवश्यक आहे।सासु सुन भांडानामुळे खुप घरे उदवस्त झाले आहेत।

    ReplyDelete
  4. ताई हा लेख तुमच्या नावासहित आणि ब्लॉग संदर्भासहित आमच्या एका व्हाट्सअँप ग्रुप वर पोस्ट करू शकतो का? सध्या गरज आहे त्याची

    ReplyDelete