Saturday 24 November 2012

गोष्ट : 'तिची' आणि 'त्याची' ....

        म्हणतात कि चोरून लपून गाठी-भेटी झाल्याशिवाय खऱ्या प्रेमच शिक्कामोर्तब होत नाही.म्हणूनच अशा भेटींचा ठेवा त्या दोन जीवांसाठी खाजीण्याहूनही जास्त मोलाचा असतो आणि वाढत्या वयाबरोबर तो ठेवा एखाद्या जुन्या लोणच्यासारखा मुरत जातो. 
        तिला त्याची वाट पाहत तास न तास ताटकळत उभी राहिलेली अनेकांनी पाहिलीय.आणि आज दोन मुलींची आई होऊन फिरतानाही बघतायत.सार कस लख्ख आठवत तिला अजूनही.....
        तिचा नोकरीच गाव तिच्या गावापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावरच होत.ऑफिस तस पाच वाजता सुटायचं पण तीच मन पहिलेच बस स्टोपवर पोहोचलेल असायचं.त्याच्या प्रेमात अशी कोणती जादू होती कोणास ठाऊक कि त्याला भेटल्याशिवाय ती stand वरून जागची हलायची नाही.
       त्याची वाट पाहत असताना तिला सारख वाटायचं कि लोकांच्या नजर तिच्यावरच खिळल्या आहेत. एखाद्या चप्पल तुटलेल्या माणसाला वाटतना कि सगळे त्याच्याकडेच बघतायत अगदी तसच. खरतर अशा सार्वजनिक ठिकाणी रोज नवी माणस येणार आणि निघून जाणार. तिच्याकडे कोण कशाला पहातय? पण तिला आपल अस वाटायचं खर. तो कोपऱ्यावरून वळताना दिसतोय का हे पाहण्यासाठी तिची मान उंचावून उंचावून दुखायला लागलेली असायची.पण तो आपला खुशालचेंडू सारखा त्याला यायचं तेव्हाच यायचा. 
        प्रेम करण म्हणजे समाजासाठी गुन्हा आहे. या विचाराने तीच मन कातर व्हायचं. अनेक शंका कुशकांनी तीच मन भरून जायचं अगदी तो आपल्याला फसवणार तर नाही ना या विचारांपर्यंत ती येऊन पोहोचायची. पण कोपऱ्यावरून तो येताना दिसला आणि त्याच्या मिशीतल हसू पाहिलं कि तिचा जीव भांड्यात पडायचा.त्याच्यासोबत तिला त्या टोचणाऱ्या नजरांच सुद्धा भान रहायचं नाही.
         स्त्री प्रेम करते ते भरभरून! पुरुषांसारख तिला फुलपाखरू नाही होता येत.ती बेल वाहणार तो एकाच महादेवाला! 
          तशी या दोघांची भेट तरी किती....तो तिला तिच्या परतीच्या प्रवासात बसमध्ये सोबत करायचा. तेवढ्यात जे बोलन होईल तेच. बस मध्ये जर गर्दी असली तर मग नुसती नजर भेट.तिला तिच्या गावी सोडून हा परतीच्या बसने लगेच परत फिरणार.त्या दोघांनी कधी एकमेकांना दोन बोटांची चिठी कधी लिहिली नाही कि बागेत किंवा हॉटेल मध्ये भेटण्याची त्यांना गरज वाटली नाही. आणि शेवटी या प्रेमाच रुपांतर लग्नात झाल.
         पण प्रेम म्हंटल कि समाजाचा विरोध हा आलाच.ती रात्र त्या दोघांसाठी वादळी ठरली.त्या वादळात तीच माहेर पाचोळ्यासारख उडून गेलं. प्रेमाची गोड शिरशिरी देणाऱ्या मनाला बाहेरून धैर्याची कवच-कुंडले लाऊन त्यांनी समाजाचा वज्राघात परतून लावला.
         आता त्याचा 'आहो'झालाय आणि तिची 'अग'. प्रियकर-प्रीयसिच्या पदावरून त्याचं प्रमोशन झालय. जे त्यांना त्यांच्या मुलींनी दिलय.आई-बाबांचं प्रमोशन. पण अजूनही तिला लग्नाच्या आधीचे दिवस आठवतात.आणि तीच मन हलक होत. आठ- आठ वर्ष प्रेम संबंध ठेऊनही लोकांना जे साधत नाही ते त्यांना दोन महिन्यांच्या भेटीत साधल होत.
         पण एखादी माळ तुटून सगळे मनी निखळून जावेत तशीच दोघांची सगळी अगदी सगळी नाती निखळून गेली. दोघेही एकाकी झाले आणि म्हणूनच त्या दोघांच प्रेम दृढ होत गेल.त्यांना दु:ख वाटत ते एकाच गोष्टीच कि त्यांच्या मुलींसाठीही ह्या सगळ्या नात्याची दार बंद झाली. एकच नात त्या सांगू शकतात.आई-बाबांचं नात. 
         त्यांच्या मुली समजू शकतील का या दोघांच नातं? त्याही शिकतील का जीव ओतून, समरसून प्रेम करायला? 
         या दोघांसाठी ज्या वाटा काट्यांच्या वाटा ठरल्या, त्याच वाटा त्यांच्या मुलींसाठी फुलांचा गालीचा ठराव्यात हीच त्या दोघांचीही इच्छा आहे.

                                        ------------------------------------------------------------

     मित्रानो , हि कुठलीही काल्पनिक कथा नाही. ह्या कथेतले 'ती' आणि 'तो' खरच अस्तित्वात आहेत आणि आपल आयुष्य एकमेकांसोबत आनंदाने जगतायत...!!

2 comments: