Friday 16 November 2012

"टिकली बांगडीच स्वातंत्र्य........."

 
                   स्त्रीच विश्व खरतर खूपच वेगळ असत.तिच्या या विश्वाबद्दल आणि त्यात काळानुसार होत गेलेल्या बदलांबद्दल जितका विचार करू तितका थोडाच आहे.कधी मुलगी, कधी पत्नी, तर कधी आई. कोणाची ती सून असते तर कोणाची सासू, मामी, काकू, बहिण, आत्या, मावशी, आजी प्रत्येकच नात्यात तीच रूप वेगळ असत. दुध आपण ज्या आकाराच्या भांड्यात टाकू तसा ते आकार घेत, स्त्रीच सुद्धा तसाच असत, नात्याप्रमाणे ती स्वत:ला बदलते.पण जगाच्या पाठीवर कुठेही गेल तरी स्त्रीच जगणं बदलत नाही. आत्ताच्या या एकविसाव्या शतकात रांधा, वाढा, उष्टी काढा,यांच्या पलीकडे स्त्रीला अस्तित्व आहे.तरी अजून घरात, समाजात, मिळणारी वागणूक  तिला दुय्यम ठरवते. पूर्वी स्त्रीच आयुष्य फक्त चूल आणि मुल इतकाच मर्यादित होत. घरातल्या अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये  तीच मत विचारात घेतलच जात नव्हत. स्त्रीने घराच्या बाहेर निघायला सुद्धा बंदी होती. व्रतवैकल्यानसारखे प्रकार सुद्धा ती करत होती आणि आश्चर्य म्हणजे त्यावेळच्या बऱ्याच स्त्रियांना हे सर्व योग्य वाटत होत!
                             " डोळे असून पहायचं नाही,
                               कान असून ऐकायचं नाही,
                               तोंड आहे म्हणून बोलायचं नाही..."
अशीच स्थिती पूर्वीच्या काळी बायकांची होती. कालांतराने ती स्थिती बदलली. सावित्री बाईंची  हि स्थिती बदलण्यात मोलाच योगदान आहे. आज हीच स्त्री पुरुषांच्या बरोबरीने ( कदाचित पुरुषांपेक्षा जास्त) काम करते.पण नव्वारी नेसायची सोडून जीन्स घालायला लागली असली तरी स्त्रीच पोतेर व्हायचं राहत नाही.
              सुनिता विल्यम्स किंवा सायना नेहेवाल किंवा मग सोनिया गांधींच नाव घेऊन आपल्याला थांबता येणारच नाही. कारण आज छोट्या गावातल्या स्त्रिया सुद्धा घरच सगळं काम करून शेतात सुद्धा राबतात. शहरात सुद्धा स्त्रिया आठ तास नोकरी करून तितकाच वेळ घरीसुद्धा काम करतात.म्हणजेच काय तर बौद्धिक असो व शारीरिक श्रम असो स्त्री पुरुषांच्या बरोबरीने आहे.पण आज सुद्धा तिला या सगळ्या कामांबरोबर व्रत-वैकल्य सुद्धा साम्भालावेच लागतात.
              स्त्री पुरुषांच्या बरोबरीने असली तरी देशातल्या पुरुषप्रधान संस्कृतीपुढे तिची किंमत केली जात नाही. उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर पत्नी जेव्हा नोकरीत पतीपेक्षा जास्त यश मिळवते तेव्हा पतीचा अहंकार दुखावला जातो आणि मग तिच्यावर विनाकारण संशय घ्यायला सुद्धा पती कमी करत नाही.अजूनही काही खेड्यांमध्ये स्त्रीला पायातली चप्पलच समजले जाते.घरात मुलगी जन्माला आली म्हणजे संकट आल असाच विचार काही लोक करतात. यात जर अशिक्षित कुटुंब असेल तर मुळीच जगण कठीण होत.ती लहान असताना तिच्या वाट्याला आलेल टिकली बांगडीच स्वातंत्र्यसुद्धा पुढच्या आयुष्यात तिच्या वाट्याला येत नाही. समाजात स्त्री म्हणजे पिता,पती,पुत्र  यांच्या आधारानेच चालणारी व्यक्ती आहे. तिला स्वत:च कुठलंच स्वातंत्र्य नाही आणि या पिता,पती,पुत्राच्या काटेरी कुमपनातच तिने जगायचे असे समजले जाते. त्यामुळे साहजिकच तिच्या संबंधीचे सर्व निर्णय या तीन व्यक्तीच घेतात.
               आमच्या कुटुंबात सुद्धा आम्ही दोघी बहिणीच आहोत.समाजात वावरताना बऱ्याचदा आई-वडिलांना प्रश्न विचारतात.'मुलगा नाही का?' कुटुंबाला वंशाचा दिवा नाही याचा लोकांना खेद वाटतो .
मुलगा जन्माला आल्यावर लोक पेढे वाटतात.पण हेच मुल मोठे झाल्यावर आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा  रस्ता दाखवतात. तरी लोकांना मुलांचेच कौतुक वाटते.मुलींचं आपल्या आई-वडिलांवर कितीही प्रेम असल तरी त्या नकोशाच असतात.
                समाजात अजूनसुद्धा लहान ( १५-१६ वर्षाच्या) मुलींची लग्न लावली जातात.त्यात त्यांची संमती सुद्धा पहिली जात नाही.यामुळे त्यांना इच्छा नसतानाही शिक्षण अर्धे सोडावे लागते.
फक्त खेड्यातच नाही तर शहरांमध्ये सुद्धा काही वेगळी स्थिती दिसत नाही.बऱ्याचदा रेल्वेत किंवा रस्त्याने चालताना पुरुष मुद्दाम धक्का देतात. किंवा अपशब्द वापरतात. विप्रो सारख्या मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेतलेल्या ज्योती कुमारीला सुद्धा या प्रसंगाला सामोरे जावे लागले. मग परिस्थिती बदलली कुठे? स्त्री काळ सुद्धा असुरक्षित होती आणि आज सुद्धा असुरक्षितच आहे.अस नाही कि तिला स्वत:च्या इच्छेप्रमाणे वागता नाही येत. ती स्वत:च्या इच्छेप्रमाणे वागते. पण समाजात अशा स्त्रिया खूप कमी आहेत.
                सध्याच्या तरुणींमध्ये 'इन ए रिलेशनशिप' ची जास्त 'क्रेझ'दिसून येते. त्यांना वाटे कि लग्न न करताच जर आपण एकत्र राहिलो तर आपल्याला स्वातंत्र्य राहील. आपण आपल्या मर्जीप्रमाणे वागू शकू. पण कालांतराने या नत्याच रुपांतर आपोआपच लग्नात होत आणि मैत्रीच नवरा बायकोत. त्यामुळे प्रत्येक वेळा जोडीदाराकडून दुय्यम स्वरूपाचीच वागणूक तिला मिळते.
                आताचाच एक प्रसंग अजूनही स्मरणात आहे.मी सध्या प्रथम वर्षाला आहे आणि बारावीच्या सुट्टीत आजीकडे गेले होते. नेहेमीच्या सवयी प्रमाणे सकाळी आवरून वृत्तपत्र वाचायला बसले होते. लगेच आजीने येऊन सुनावलं, " पुरुषांसारखी पेपर काय वाचत बसलीये ,पेपर वाचून कोणता देश चालवायचा आहे तुला.ते पुरुषांनाच शोभत सकाळी-सकाळी पेपर वाचत बसण ." आजीच हे वाक्य कानावर पडल आणि आश्चर्यच वाटल. आजच्या या एकविसाव्या शतकात सुद्धा असा विचार केला जातो.खरतर अशा रोजच्या छोट्या छोट्या प्रसंगांमधून स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो.आणि आपल्याकडे तर लहानपणा पासूनच मुलामुलींना शिकवलं जात, हे काम मुलाचं आहे , हे काम मुलींचं आहे. मुलींची काम मुलांनी नाही करायची. खरतर इथूनच स्त्री पुरुष भेदभावाचा पाया रोवला जातो.
              मागे एकदा फादर फ्रान्सिस दिब्रीतोंचा एक लेख वाचनात आला. त्यात त्यांनी त्यांच्या पाश्चिमात्य देशातील प्रवासाचे वर्णन केले होते. ते अमेरिकेत एका घरी जेवायला गेले होते तिथे घरातल्या आईने स्वयंपाक केला होता. तर मुलांनी आणि पुरुषांनी तो वाढला.उष्टी खरकटी सुद्धा सर्वांनी मिळून म्हणजे आई आणि मुलांनी मिळून काढली.आपल्याला या गोष्टीच नवल वाटू शकत. कारण मुलांनी स्वयंपाक घरात मदत करण्याची पद्धत काही अंशी सुद्धा आपल्याकडे नाही.त्यामुळेच मग मुलांमध्ये स्त्री पुरुष भेदभाव निर्माण होतो. म्हणून स्त्रीला नेहेमी दुयाम ठाण मिळत गेले.
               म्हणतात कि जग कितीही बदललं तरी स्त्रीसाठी ते कधीच बदलत नाही, समाजाचा तिच्याविषयीचा दृष्टीकोन कधीच बदलत नाही. स्त्री घर आणि नोकरी अशा दुहेरी भूमिका बजावते.देश चालवण्याची क्षमता सुद्धा तिच्यात आहे. तरी तिला कमीच लेखले जाते. पण हीच स्त्री जन्मापासून तर मरेपर्यंत नेहेमीच कधी कुटुंबासाठी  तर कधी समाजासाठी स्वत:च्या इच्छांचा त्याग करत असते. तिच्या या त्यागांसाठी अनुराधा पाटील यांच्या या ओळी समर्पक ठरतात.
                                                          " सगळ्यांचीच मारत असते
                          
                                                              एक दिवस आई,
                                                        पण तिला माहित नसतो जाताना
                                                              आपल्या मनात तासू तासून
                                                                  होत गेलेला तिचा मृत्यू
                                                                         जन्मापासून......."
                भविष्यातील स्त्री कधी समाजाचे तिच्या भोवती असलेले काटेरी कुंपण तोडून कधी स्वत:साठी जगेल का? कि पूर्वीच्या स्त्रिया सारखीच  तीपण त्यांच्या पावलांवर पाय ठेवत आणि स्वत:च्या इच्छांचा, स्वप्नांचा त्याग करत चालत राहील. पहिले पाढे पंचावन्न म्हणत?
                                                                           "तिला करता येईल
                                                                            टकमक टोकावर उभं राहून
                                                                            हाती न येणाऱ्या
                                                                            झगमगत्या नक्षत्रावर
                                                                            स्वत:ला उधळून प्रेम ?"

No comments:

Post a Comment