Sunday 12 May 2013

"झोप..."

            माझ्या मते असे खूप कमी लोक असतील या पृथ्वीतलावर ज्यांना झोप प्रिय नसेल आणि असे झोप प्रिय नसलेले टिटवीच्या कुळातले लोक सोडले तर मग बाकी सगळे कुंभकर्णाच्या कुळातलेच म्हणावे लागतील . ( निदान  माझ्या पाहण्यातले तरी ) .
             झोप म्हंटल कि हा जसा आपल्या सगळ्यांचा Weak Point बनतो आणि अशातच दुपारची झोप  (वामकुक्षी ) जरा जास्तच प्रिय असते आपल्याला . हा, आता हि वामकुक्षी अगदी रोजच नाही घेता  येत आपल्याला . पण ऑफिस मध्ये बसून रविवारची वाट पाहत या वामकुक्षीच प्लानिंग बरेच जण करतात . मग एकदाचा रविवार आल्यावर विचारूच नका . सकाळी तर बारा वाजे पर्यंत झोपतातच पण दुपारच्या स्पेशल मेनूच जेवण झाल्यावर पुन्हा वामकुक्षी असतेच. पण गंमत म्हणजे अशा वामकुक्षीच्या वेळी कोणी ना कोणी येउन झोपेच खोबर नक्कीच करत. कोणाचा तरी फोन तरी येतो . नाहीतर दारावर सेल्समन येउन बेल तरी वाजवतो किंवा मग औचित पाहुणे तरी येतात . मग अशा वेळी चरफडत मनात अशा  लोकांना शिव्या घालण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही .
            काय एक एक तर्हा असतात लोकांच्या झोपायच्या ! एक किस्सा आठवतो . माझी बहिण आजीकडे राहाते. तिलाही झोप अगदीच प्रिय आहे  आणि गंमत अशी कि ती एकदा झोपली म्हणजे तिला उठवायला ढोल ताशेच वाजवावे लागतात. असच एकदा आजीकडचे सगळे बाहेर गेले होते  आणि बहिण एकटीच घरी होती . हि दुपारी झोपून गेली आणि संध्याकाळी घरचे सगळे बाहेरून आल्यावर दर वाजवताच आहेत , तरी हि उठायलाच तयार नाही . बर खिडकीतून उठवण्याचा प्रश्नच नाही. आजीच घर दुसऱ्या मजल्यावर होत तेव्हा. मग शेवटी शेजाऱ्यांच्या घरातून आजीच्या गच्चीवर जाऊन तिथून एक पाण्याची नळी खिडकीतून आत सोडली आणि बहिणीच्या अंगावर पाणी टाकून तिला उठवल  होत ( ती अजूनही तितकीच गाढ झोपते हे सांगायलाच नको ).
              तुम्हाला तुमचे झोपेचे काही गमतीशीर अनुभव आठवतात का ? असच झोपेच एक उदाहरण द्यायचं म्हंटल म्हणजे सगळ्यांनी आपला अभ्यासाचा काळ आठवावा. अभ्यास करताना पुस्तक हातात घेतल म्हणजे कुठून का होईना झोप येतेच डोळ्यांवर. आणि परीक्षेच्या वेळी तर विचारूच नका! परीक्षा असल्यावर आपण सकाळी साडेचार पाचलाच अभ्यासाला उठतो . पण थोड्यावेळातच पुस्तक हातात घेऊन डुलक्या घ्यायला सुरुवात  होते.पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एखादी छान कथा किंवा कादंबरी वाचताना ती पूर्ण केल्याशिवाय मुळीच झोप येत नाही ( मला.).
             आता मला खर सांगा मित्र - मैत्रिणींनो तुमच्या पैकी किती जण कॉलेजमध्ये एखाद्या बोरिंग लेक्चरला शेवटच्या बाकावर जाऊन बसतात आणि झोप काढतात किंवा काढायचे ? ऑफिसमध्ये जर एखादी बोरिंग मिटिंग चालू असेल तर तेव्हा सुद्धा आपल्याला झोप आल्याशिवाय राहत नाही , बरोबर ना ?
              असा झोपेचा विषय निघाला म्हणजे मला लहानपणापासून नेहेमीच अस वाटायचं कि सुट्ट्या ह्या उन्हाळ्या ऐवजी हिवाळ्यात असाव्यात. कारण काय कि माझी शाळा सकाळी सात वाजता असायची आणि मग हिवाळ्यात माऊ गोधडीतून  बाहेर निघायचा  मला भारी कंटाळा यायचा ( खर तर रागच यायचा ).
              या झोपेच मला एका बाबतीत नेहेमीच नवल वाटत कि एक दिवस जर तुम्ही एका विशिष्ट वेळी झोपलात तर दुसऱ्या दिवशी त्याच वेळी तुम्हाला झोप आलीच म्हणून समजा !थोडक्यात काय तर बाकी कुठल्याही गोष्टीची सवय व्हायला वेळ लागतो . तस झोपेच्या बाबतीत होत नाही. आणि झोपेच नाव काढल्यावर सुद्धा लगेच झोप येते किंवा झोपावस वाटत. (निदान मला तरी )
              आता झोपेवरच हे भाष्य मी जरा आटोपतच घेते. कारण झोपेबद्दल इतक बोलल्यामुळे मलाच झोप यायला लागलीय . 
                                     ..................................................…………………

                 माझा हा लेख माझ्या सगळ्या झोपाळू मित्र - मैत्रीणीना .



No comments:

Post a Comment